![]()
लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयलला येरवडा महिला कारागृहात कथितरीत्या ‘व्हीआयपी ट्रीटमेंट’ दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपांची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करावी आणि दोषी आढळणाऱ्या कारागृह अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाने केली आहे. बुधवारी (२६ ऑगस्ट) पुण्यातील पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी हा आरोप केला. केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास कोणत्याही बाह्य दबावाशिवाय पूर्ण करून न्यायालयात भक्कम पुराव्यांसह दोषारोपपत्र दाखल करावे, तसेच खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या पत्रकार परिषदेला रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाचे राहुल डंबाळे, अपर्णा दुबे, अॅड. जावेद जमादार, रुद्राणी जावळकर, कैलास देवकर, उषा आवळे आणि राहुल नागटिळक उपस्थित होते. सिया गोयलला विशेष सुविधा मिळत आहेत का?; चौकशीची मागणी केतन अग्रवालच्या कुटुंबीयांकडून तसेच विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांकडून सिया गोयलला कारागृहात विशेष सुविधा दिल्या जात असल्याचे आरोप करण्यात आले आहेत. मात्र, या आरोपांची अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही. त्यामुळे कारागृह प्रशासनाने या आरोपांची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आरोपीला नियमबाह्य सुविधा किंवा विशेष वागणूक दिली जात असल्याचे तपासात आढळल्यास संबंधित कारागृह अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी भूमिका रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाने मांडली आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एखाद्या गंभीर हत्येच्या प्रकरणातील आरोपीला प्रभाव किंवा पैशांच्या बळावर कारागृहात विशेष सवलती मिळत असतील तर हा केवळ एका प्रकरणाचा मुद्दा राहत नाही, तर संपूर्ण न्यायव्यवस्था आणि कारागृह प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवा केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास ठराविक कालमर्यादेत पूर्ण करून शक्य तितक्या लवकर दोषारोपपत्र दाखल करावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. या प्रकरणात दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि त्यासाठी खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा, अशी भूमिका कुटुंबीय आणि त्यांच्या समर्थनार्थ पुढे आलेल्या संघटनांनी घेतली आहे. ‘जोपर्यंत केतनच्या मारेकऱ्यांना फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा होत नाही, तोपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील’, असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर तांत्रिक आणि डिजिटल पुरावे गोळा केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुढील काळात न्यायालयीन प्रक्रियेत हे पुरावे महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता आहे. ‘गुलाबो गँग’कडूनही आंदोलन सिया गोयलला कथित व्हीआयपी सुविधा दिल्या जात असल्याचे आरोप सर्वप्रथम संगीता तिवारी यांच्या नेतृत्वाखालील ‘गुलाबो गँग’ आणि ‘पायल तिवारी बिटिया फाउंडेशन’कडून करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या संघटनांनी पुण्यातील मार्केट यार्ड परिसर तसेच सिया गोयलच्या घरासमोर आंदोलन केले होते. कारागृहात आरोपीला कोणत्याही प्रकारच्या नियमबाह्य सवलती दिल्या जात असतील तर त्या तातडीने बंद कराव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली होती. त्यानंतर आता रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षानेही या आरोपांच्या चौकशीची मागणी केल्याने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. नेमकं काय आहे केतन अग्रवाल हत्या प्रकरण? केतन अग्रवालचा १८ जून रोजी लोहगडावर मृत्यू झाला होता. सुरुवातीला तो पाय घसरून दरीत पडल्याने मृत्युमुखी पडल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, त्याच्या मृत्यूबाबत कुटुंबीयांनी सुरुवातीपासूनच संशय व्यक्त केला. केतनचा मृतदेह दरीतून बाहेर काढणाऱ्या शिवदुर्ग रेस्क्यू टीमशी पोलिसांनी केलेल्या चौकशीतूनही काही प्रश्न उपस्थित झाले. त्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे केतनचा मृत्यू अपघाती नसल्याचा दावा केला. अंत्यविधीनंतर २१ जून रोजी कुटुंबीय लोहगडावर गेले. त्यानंतर सिया गोयल केतनच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी घरी आली होती. त्यावेळी केतनची बहीण संजना हिने सियाला लोहगडावरील घटनाक्रमाबाबत अनेक प्रश्न विचारले. लोहगडावर नेमके काय झाले? कोणत्या ठिकाणी फोटो काढले? फोटो काढताना केतनचा पाय नेमका कसा घसरला? त्या वेळी सिया स्वतः फोटो काढत होती का? अशा प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली. या प्रश्नांना मिळालेल्या उत्तरांमुळे कुटुंबीयांचा संशय अधिक बळावल्याचे सांगण्यात आले. सिया आणि चेतनच्या संपर्काची पोलिसांकडून तपासणी कुटुंबीयांच्या जबाबांमध्ये चेतन चौधरीचे नाव समोर आल्यानंतर पोलिसांनी सिया आणि चेतन यांच्यातील संपर्काचीही चौकशी केली. दोघांच्या दूरध्वनी संपर्काचा तपशील तपासण्यात आला. तपासात सिया आणि चेतन यांच्यात मागील वर्षभरात तब्बल २,००० हून अधिक फोन कॉल्स झाल्याची माहिती समोर आली. या कॉल्समध्ये ३०० हून अधिक तासांचा संवाद झाल्याचेही सांगण्यात आले आहे. या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशनचाही तपास करण्यात आला. लोहगड परिसरातील सीसीटीव्हीमध्ये भर उन्हात हुडी, हेडफोन आणि मास्क घातलेला एक तरुण दिसून आला होता. पुढे तो तरुण सियाशी काहीतरी बोलताना किंवा तिला काहीतरी सांगताना दिसल्याचे तपासात समोर आले. मात्र, या तरुणाचा संबंध चेतनशी आहे का, याचा तपास करताना पोलिसांसमोर मोबाईल लोकेशनचे वेगळेच चित्र आले. चेतनचा फोन लोहगडाऐवजी मार्केट यार्ड परिसरात असल्याचे लोकेशन दाखवत होते. दुसरा फोन वापरल्याचा संशय कसा निर्माण झाला? तपासादरम्यान चेतनचा फोन एका दुकानातील कामगाराने उचलला असल्याचे समोर आल्याचे सांगितले जाते. त्यानंतर चेतनने त्या कामगाराचा फोन घेऊन लोहगडावर गेल्याचा तपास यंत्रणेला संशय आला. या तपासानंतर २२ जूनच्या रात्री पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने तेजसला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीनंतर या प्रकरणातील तपासाला महत्त्वाचे वळण मिळाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर सिया गोयलविरोधातील तपासाची दिशाही स्पष्ट होत गेली. सिया आणि चेतन दोघेही येरवडा कारागृहात केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी हे दोघेही सध्या येरवडा कारागृहात असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी तपासासाठी कोठडी वाढवण्याची मागणी केली होती; मात्र न्यायालयाने ती मागणी फेटाळली होती. दरम्यान, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्यास मंजुरी दिल्याची माहिती यापूर्वी समोर आली आहे. पॉलीग्राफ चाचणीलाही आरोपींचा नकार या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी या दोघांची पॉलीग्राफ म्हणजेच ‘लाय डिटेक्टर’ चाचणी करण्याचा पोलिसांचा प्रयत्न होता. मात्र, दोन्ही आरोपींनी या चाचणीला नकार दिल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर मॅजिस्ट्रेट न्यायालयानेही पॉलीग्राफ चाचणीसाठी पोलिसांचा अर्ज फेटाळला. त्यामुळे आता पोलिसांचा भर डिजिटल आणि तांत्रिक पुराव्यांवर असल्याचे सांगण्यात येत आहे. कॉल डिटेल रेकॉर्ड, मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर डिजिटल पुरावे तपासाचा महत्त्वाचा भाग बनले आहेत. ‘ही लढाई केवळ केतनसाठी नाही’ केतन अग्रवालच्या कुटुंबीयांनी या प्रकरणात केवळ आपल्या मुलाला न्याय मिळावा यासाठीच नव्हे, तर गुन्हेगारांच्या मनात कायद्याचा धाक निर्माण व्हावा यासाठी लढा सुरू असल्याची भूमिका मांडली आहे. आता सिया गोयलला येरवडा कारागृहात कथित व्हीआयपी सुविधा मिळत असल्याच्या आरोपांमुळे या प्रकरणाला आणखी एक नवे वळण मिळाले आहे. हे आरोप खरे आहेत का, कारागृह नियमांचे उल्लंघन झाले आहे का आणि झाले असल्यास त्यासाठी जबाबदार कोण, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान, या आरोपांबाबत कारागृह प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरण किंवा चौकशीचा निष्कर्ष समोर येणे बाकी आहे. हेही वाचा… मुंबईच्या सायन रेल्वे स्थानकात हाय व्होल्टेज ड्रामा: नोकरी गेल्याच्या रागातून डॉक्टर टॉवरवर चढला, गळफासही घेतला; अग्निशमन दलाच्या तत्परतेने वाचला जीव सायन रेल्वे स्थानकात गुरुवारी (२७ ऑगस्ट) सकाळी एका डॉक्टरने टॉवरवर चढून टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. नोकरीवरून काढून टाकल्याच्या रागातून संबंधित डॉक्टरने रेल्वे स्थानकातील उच्चदाब वीज टॉवरवर चढून गळफास घेण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी पोहोचून बचावकार्य केल्याने त्याचा जीव वाचला. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला नवे वळण:सिया गोयलला तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट? रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीकडून उच्चस्तरीय चौकशीची मागणी
