Headlines

Crime News: अर्धा दुधी, जळालेल्या बांगड्या अन् काबा; बांगलादेशात हिंदू कुटुंबाला संपवलं, गूढ उलगडलं


एकाच कुटुंबातील चौघांना निर्घृणपणे संपवण्यात आलं. यानंतर आरोपी त्या कुटुंबाच्या घरात ६ ते ७ तास वास्तव्यास होते. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

hindu family murder
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ढाका: बांगलादेशात एका हिंदू कुटुंबाला निर्घृण हत्या केल्याप्रकरणी दोघांना अटक झाली आहे. रंगपूर जिल्हा शाळेचे निवृत्त शिक्षक गणपती चक्रवर्ती, त्यांच्या पत्नी प्रीतिलता चक्रवती, मुलगी प्रार्थी चक्रवर्ती आणि मुलगा प्रियम चक्रवर्ती यांचे शव त्यांच्या घरात सापडले.

रंगपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अफसर नजमुल कादर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडे अकराच्या आसपास दासपारा परिसरातून चोघांचे शव सापडले. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. चौकशीत त्यांनी गु्न्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्यात एका टोळीचा समावेश असल्याची शंका चक्रवर्ती कुटुंबाच्या नातेवाईकांनी बोलून दाखवली.

पोलिसांनी गणपती यांचा चुलत भाऊ मुग्धो दास आणि सिद्धार्थ दास यांना अटक केली आहे. सिद्धार्थ रंगपूर शहर बाजारात माशांचा व्यापार करतो. तर मुग्धो सोनाराकडे मदतनीस म्हणून कार्यरत आहे. दोघे दासपारामध्येच वास्तव्यास आहेत. पोलीस अधिकारी सुबीर चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातील सामान अस्तावस्त पडलेलं होतं. घरफोडी झाली होती. आरोपींकडून सोन्याचे दागिने सापडले आहेत.

हेर विभागाचे प्रमुख सनातन चक्रवर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री ते शुक्रवार सकाळच्या दरम्यान गुन्हा घडला. आरोपी शेजाऱ्याच्या घराच्या छतावरून गणपतीच्या घरी पोहोचले. ते गणपतीच्या छतावर कफ सिरपनं (स्थानिक भाषेत काबा) नशा करत होते. गणपतीला छतावर कोणीतरी असल्याचा संशय आला. त्यानं छतावर जाऊन पाहिलं. तेव्हा आरोपींसोबत त्याचा वाद झाला. यानंतर आरोपींनी त्याच्याच गमछानं त्याचा गळा आवळला.

छतावरून आवाज ऐकू येऊ लागताच गणपती यांची पत्नी प्रीतिलता तिथे पोहोचली. आरोपींनी तिलाही गळा आवळून संपवलं. यानंतर आरोपी खाली गेले. तिथे त्यांना प्रार्थी दिसली. आरोपींनी तिचाही जीव घेतला. यानंतर त्यांना गणपती यांचा लहान लेक प्रियम दिसला. प्रियम आरोपींपैकी एकाच्या भावाचा मित्र होता. त्यामुळे ओळख जाहीर होण्याच्या भितीनं आरोपींनी त्याचाही जीव घेतला.

संपूर्ण कुटुंबाला संपवल्यावर आरोपी घरातून पळाले नाहीत. ते ६-७ तास घरातच होते. त्यांनी घरात कफ सिरपच्या सहाय्यानं नशेचा डोस घेतला. मग त्यांनी प्रीतिलता यांच्या बांगड्या जाळण्याचा प्रयत्न केला. पण त्या पूर्ण जळाल्या नाहीत. यानंतर त्यांनी फ्रिजमधून जेवण काढलं. अर्धा दुधी त्यांनी फ्रिजच्या बाहेरच ठेवला. यानंतर बराच वेळ अंघोळ केली. मग त्यांनी घरातील वीज कापली आणि मौल्यवान वस्तू लुटल्या.

गणपती यांच्या कुटुंबाशी संपर्क न झाल्यानं नातेवाईकांना चिंता वाटू लागली. कुटुंबाचा फोन गुरुवारपासूनच बंद होता. त्यामुळे नातेवाईक शनिवारी त्यांच्या घरी पोहोचले. तेव्हा मुख्य गेट बंद होता. नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत चौघांचे शव ताब्यात घेतले. गणपती यांचे मोठे बंधू गोपीनाथ यांनी रंगपुरात हत्येचा गुन्हा दाखल केला.