Headlines

सीईओ गांधींकडून शाळांमधील सुविधांची पाहणी:प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश




जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुविधायुक्त शैक्षणिक वातावरण मिळावे, यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांनी गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यातील शाळांची पाहणी सुरू केली आहे. विद्यार्थी सुरक्षा, स्वच्छता, पायाभूत सुविधा आणि इतर आवश्यक सोयी या चार प्रमुख बाबींवर त्यांनी विशेष भर दिला असून, संबंधित अधिकाऱ्यांना उपाययोजनांचे निर्देश दिले आहेत. गांधी यांनी सुरुवातीला भातकुली, चांदूरबाजार आणि अमरावती या तीन तालुक्यांतील शाळांची पाहणी केली. त्यानंतर सोमवारी त्यांनी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील दाभा, जळू, माहुली चोर आणि धानोरा गुरव येथील शाळांना भेट दिली. या पाहणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींवर बांधकाम आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या. सीईओ गांधी यांची पहिली भेट चांदूर बाजार तालुक्यातील आसेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला होती. येथे त्यांनी शाळेतील सीसीटीव्ही कॅमेरे, टीव्ही संच, विद्युत सुविधा, क्रीडांगण, क्रीडा साहित्य, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आणि शाळेच्या इमारतीची पाहणी केली. आवश्यक दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यानंतर त्यांनी पंचायत समिती भातकुली अंतर्गत पूर्णानगर येथील मुलांची व कन्यांची शाळा अशा दोन्ही ठिकाणी भेट दिली. किरकोळ दुरुस्तीची कामे करण्यासोबतच प्रत्येक वर्गखोलीत दोन सीलिंग पंखे बसवण्याच्या सूचना दिल्या. पंचायत समिती अमरावती अंतर्गत जि.प. माध्यमिक उर्दू शाळा, वलगाव येथेही त्यांनी चार प्रमुख निकषांच्या आधारे पाहणी केली. विशेषतः विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याची स्वच्छता व सुरक्षितता याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. जि.प. उच्च प्राथमिक डिजिटल उर्दू शाळा, नांदगाव पेठ येथे भेट देऊन गांधी यांनी शाळेच्या शैक्षणिक, भौतिक व क्रीडा क्षेत्रातील कामगिरीचा आढावा घेतला. मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधून शाळेच्या गरजा व उपलब्ध सुविधांची माहिती घेतली. शाळेची जागा मर्यादित असून नवीन बांधकामासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याचे यावेळी निदर्शनास आले. कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून कार्यालयापर्यंत सुमारे १५० मीटरच्या रस्त्यावरून ये-जा करताना विद्यार्थ्यांना अडचणी येत असल्याने, तेथे पेव्हिंग ब्लॉक बसवून रस्ता सुस्थितीत करण्याबाबत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. या पाहणी दौऱ्यावेळी अनुपस्थित राहिल्याबद्दल चांदूर बाजार आणि भातकुली येथील गटशिक्षण अधिकारी (बीईओ) यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. इतर अधिकाऱ्यांना कामे केवळ कागदावर न ठेवता, ती प्रत्यक्ष पूर्णत्वास न्यावीत, असे बजावत तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे स्पष्ट निर्देशही सीईओ गांधी यांनी दिले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत