Headlines

ठाण्याला १६.५४ किमी लांबीचा ‘आनंद ग्रीन बेल्ट’; दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या नावावरून आनंदवन उभारण्याचा महापालिकेचा प्रयत्न


Thane News:संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनक्षेत्रात १६,५४ किमी लांबीचा आनंदवन ग्रीन बेल्ट प्रकल्प प्रस्तावित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या नावावरून हे आनंदवन उभारण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे .

आनंद हरित पट्टा
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
श्रीकांत सावंत, ठाणे : महापालिकेच्या हद्दीलगत असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनक्षेत्रात १६.५४ किमी लांबीचा ‘आनंदवन ग्रीन बेल्ट’ प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या वन व वन्यजीवविषयक वैधानिक मंजुरींची प्रक्रिया राबवण्यासाठी सल्लागार नियुक्त करण्याची तयारी महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे. या प्रस्तावित प्रकल्पासाठी १०० कोटी रुपयांचा अंदाजित खर्च असून, विविध वन व वन्यजीव मंजुरींसाठी सल्लागार नियुक्त करण्याकरिता महापालिकेने ७० लाख ७७ हजार ११२ रुपयांची निविदा काढली आहे.

आनंदवन ग्रीन बेल्टचे नियोजन

ठाणे शहरालगत संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असून, महापालिकेकडून त्यांच्या मदतीने आनंदवन ग्रीन बेल्टचे नियोजन करण्यात येत आहे. ठाण्यातील दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या नावावरून हे आनंदवन उभारण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. या प्रकल्पासाठी वनक्षेत्राशी संबंधित विविध परवानग्यांची आवश्यकता आहे.

सल्लागारांकडून तपासणी केली जाणार

त्यामुळे प्रकल्पाच्या प्रत्येक प्रस्तावित घटकाचा अभ्यास करून या हरितपट्ट्यात नेमके काय करता येईल, त्यासाठी स्वतंत्र परवानगी आवश्यक आहे का, एखादा घटक बदलणे, अन्यत्र हलविणे किंवा वगळणे आवश्यक आहे का, तसेच त्याचा वन्यजीव व पर्यावरणावर विपरीत परिणाम होऊ शकतो का, हे सल्लागाराकडून तपासले जाणार आहे.

वन्यजीव मंजुरीची जबाबदारी.

या प्रक्रियेत केवळ वन विभागाच्या मंजुरीबरोबरच आवश्यकतेनुसार वन्यजीव मंजुरी, राष्ट्रीय वन्यजीव मंडळाशी संबंधित प्रक्रिया, पर्यावरणीय नियम, भरपाई वनीकरण, भरपाई वनीकरण निधी व्यवस्थापन व नियोजन प्राधिकरण, वृक्षतोड किंवा पुनर्लागवड आणि महसूलविषयक परवानग्यांची तपासणी केली जाणार आहे. वनमंजुरीच्या प्रक्रियेत वनहक्क कायद्यांतर्गत आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठीही सल्लागाराला मदत करावी लागणार आहे. त्यात वनहक्कांची ओळख, त्यासंदर्भातील सहमती आणि प्रमाणपत्रे तयार करून ऑनलाइन प्रसिद्ध करावी लागणार आहेत.

Maharashtra TimesWestern Railway: पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी मोठी अपडेट! आजपासून लोकलचे नवे वेळापत्रक; विरारकरांना लाभ, बोरिवलीकर नाराज, कसे आहे नियोजन?

वनजमिनीच्या वापरासाठी प्रयत्न

बिगर-वनीकरणासाठी वापर करण्यासंदर्भातील सविस्तर प्रस्ताव तयार केले जाणार आहेत. त्यासाठी वनजमिनीची कायदेशीर स्थिती, सर्व्हे क्रमांक, हद्दी, मालकी आणि वनवर्गीकरण यांची पडताळणी केली जाणार आहे. प्रकल्पाचा काही भाग राष्ट्रीय उद्यान, पर्यावरण संवेदनशील क्षेत्र किंवा संरक्षित क्षेत्रात येतो का, याचीही तपासणी होणार आहे.

सल्लागाराची मदत

डीसीएफ ठाणे, सीसीएफ ठाणे, पीसीसीएफ नागपूर, राज्य सरकार, प्रादेशिक कार्यालय भोपाळ आणि केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय, नवी दिल्ली या स्तरांपर्यंत प्रस्ताव पोहोचवण्यासाठी सल्लागाराची मदत घेतली जाणार आहे. अंतिम मंजुरीसह संबंधित प्रक्रिया १०० दिवसांत पूर्ण करण्याचे आणि १२० दिवसांत अंतिम अहवाल सादर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Maharashtra TimesVoter List: महाराष्ट्रात तब्बल २ कोटी मतदार वगळले; नवी यादी जाहीर, तुमचं नाव नसेल तर काय करावं लागणार? जाणून घ्या प्रक्रिया

आक्षेपांना उत्तरे आणि आवश्यक सुधारणा

महत्त्वाची बाब म्हणजे सल्लागाराला कोणतीही वैधानिक मंजुरी मिळण्याची हमी देता येणार नाही. मंजुरी द्यायची अथवा नाकारायची, याचा अंतिम अधिकार संबंधित वैधानिक प्राधिकरणांकडे राहणार आहे. मात्र, प्रस्तावातील कागदपत्रांची अचूकता, पूर्णता, वेळेवर सादरीकरण, सरकारी यंत्रणांच्या आक्षेपांना उत्तरे आणि आवश्यक सुधारणा करण्याची जबाबदारी सल्लागाराची असेल.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.आणखी वाचा