ओटवणे : सावंतवाडी तालुक्यातील अति दुर्गम घारपी गावाला अखेर थेट एसटी बससेवेची सुविधा उपलब्ध झाली आहे. अनेक दशकांपासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण होत सावंतवाडी आगारातून बांदा-डेगवे मार्गे तांबोळी-घारपी अशा तीन बसफेऱ्या मंगळवारपासून सुरू करण्यात आल्या. त्यामुळे घारपीसह परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
सावंतवाडी तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष भाऊसाहेब देसाई आणि जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस केतनकुमार गावडे यांनी या बससेवेसाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन अखेर सावंतवाडीहून घारपीपर्यंत थेट बससेवा सुरू झाली आहे.
2024 पासून सुरू होता पाठपुरावा
घारपीला थेट बससेवा सुरू करण्यासाठी भाऊसाहेब देसाई आणि केतनकुमार गावडे यांनी 2024 मध्ये सावंतवाडी आगार प्रमुखांकडे निवेदन दिले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वन विभागाच्या आवश्यक परवानग्या घेण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली. संबंधित पत्रव्यवहार एसटी महामंडळाच्या कणकवली कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता.
परवानग्या आणि आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर सावंतवाडी बसस्थानकातून घारपीपर्यंत दररोज तीन बसफेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दररोज तीन बसफेऱ्या
नवीन वेळापत्रकानुसार सावंतवाडीहून घारपीसाठी दररोज तीन बस धावणार आहेत.
- सकाळी 7:35 वाजता
- दुपारी 12:30 वाजता
- सायंकाळी 3:30 वाजता
या बस बांदा, डेगवे आणि तांबोळी मार्गे घारपीपर्यंत जाणार आहेत.
बांदा आणि डेगवे येथे शुभारंभ
मंगळवारी या बससेवेचा शुभारंभ सुरुवातीला बांदा बसस्थानकात, त्यानंतर डेगवे ग्रामपंचायत येथे करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांच्या हस्ते बससेवेचा शुभारंभ झाला.
यावेळी पंचायत समिती सदस्य सदानंद राणे, डेगवे सरपंच तथा भाजपचे बांदा मंडळ अध्यक्ष मधुकर देसाई, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस रवींद्र म्हापसेकर, केतनकुमार गावडे, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष भाऊसाहेब देसाई, शिवसेना उपतालुका प्रमुख तथा डेगवेचे माजी सरपंच मंगलदास देसाई, शिवसेना विभागप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य विजय देसाई यांच्यासह ग्रामस्थ आणि प्रवासी उपस्थित होते.
शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन प्रवासासाठी फायदा
अति दुर्गम भागात असलेल्या घारपी गावातील नागरिकांना आतापर्यंत वाहतुकीच्या मर्यादित सुविधांमुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. थेट बससेवा सुरू झाल्यामुळे शिक्षण, आरोग्य, शासकीय कामे तसेच दैनंदिन गरजांसाठी सावंतवाडी आणि इतर बाजारपेठांमध्ये ये-जा करणे अधिक सुलभ होणार आहे.
अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याने घारपी आणि परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. बससेवा सुरू करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या एसटी महामंडळासह जिल्हा व तालुका काँग्रेस पदाधिकारी आणि डेगवे ग्रामस्थांचे भाऊसाहेब देसाई यांनी आभार मानले.
