Headlines

मराठवाड्यात भीषण पाणीसंकट! तहानलेल्या गावांसह टँकरच्या संख्येत वाढ, ४७७ विहिरी अधिग्रहित


मराठवाड्यात पाणीटंचाईचे संकट गडद होत जात आहे. यंदा अपेक्षित पाऊस न पडल्यामुळे अनेक गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे पाणी पुरवठ्यासाठी तब्बल ४७७ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

Water Shortage
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
छत्रपती संभाजीनगर : ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला तरी मराठवाड्यात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाने मोठा खंड दिल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. सात दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरसह अन्य तीन जिल्ह्यांतील मिळून एकूण ५१ गावे आणि ४८ वाड्यांना ११४ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. तर आता तहानलेल्या गावांच्या संख्येसह टँकरच्या संख्येतही वाढ झाली आहे. आजघडीला चार जिल्ह्यांतील तहानलेली १०५ गावे आणि ५५ वाड्यांना १८१ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. याशिवाय मराठवाड्यात ४७७ विहिरीही अधिग्रहित करण्यात आल्याची माहिती विभागीय आयुक्तालया प्रशासनातर्फे देण्यात आली. तर उर्वरित चारही जिल्हे टँकरमुक्त आहेत.

पावसाच्या मोसमातही टँकरने पाणी पुरवठा

उन्हाळा सुरू होताच यंदाही मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील तहानलेल्या गावात टप्प्याटप्याने टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू झाला. पावसाळा सुरू झाल्यावर टँकरचा प्रश्न निकाली लागेल, अशी अपेक्षा होती. परंतु सर्वदूर अपेक्षित पाऊस झाला नाही आणि जलस्रोत आटलेल्या गावांची तहान भागविण्यासाठी ग्रामस्थांना जूननंतर देखील टँकरचा आधार घ्यावा लागला.

आतापर्यंत किती टँकरचा पुरवठा सुरु?

जून, जुलै महिन्यात यात वाढ झाल्याने एकही जिल्हा टँकरमुक्त नव्हता. विशेष म्हणजे जून अखेर छत्रपती संभाजीनगरातील टँकर बंद करण्यात आले होते. परंतु ग्रामस्थांनी मागणी केल्याने टँकर पुन्हा सुरू करावे लागले. १४ जुलैदरम्यान विभागातील तहानलेल्या गावांना ३०३ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. तर जुलैच्या शेवटच्या आठवड्यात परभणी वगळता विभागातील उर्वरित सात जिल्ह्यांतील एकूण २५७ गावे आणि १३० वाड्यांना ४२८ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू होता.

जुलै महिन्यात झालेल्या पावसानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात टँकरच्या संख्येत घट झाली होती. परंतु जुलै महिन्यात काही प्रमाणात दिलासा देणाऱ्या पावसाने ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत केवळ प्रतीक्षाच करायला लावली. परिणामी, पाण्याचा प्रश्न अधिक तीव्र होत गेल्याचे चित्र आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती टँकरने पाणी पुरवठा?

१८ ऑगस्ट दरम्यान छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांतील एकूण ५१ गावे, ४८ वाड्यांना मिळून ११४ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. तर आजघडीला तहानलेल्या गावांच्या संख्येत दुप्पटीने वाढ झाल्याचे चित्र आहे. सात दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ११ गावे आणि १० वाड्यांना २५ टँकरने पाणी पुरवठा केला जात होता. सध्या ६२ गावे आणि १७ वाड्यांना ९० टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. तर जालन्यातील १६ गावे, १३ वाड्यांना २८ टँकरने, बीडमधील २० गावे, २५ वाड्यांना ५४ टँकरने तर धाराशिव जिल्ह्यातील सात गावांना नऊ टँकरद्वारे अशा प्रकारे एकूण १०५ गावे, ५५ वाड्यांना मिळून १८१ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाने दिली.

४७७ विहिरींचे अधिग्रहण

संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन परभणी, हिंगोली, नांदेड हे तीन जिल्हे वगळून मराठवाड्यातील उर्वरित पाच जिल्ह्यांतील खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. २४ ऑगस्टच्या अहवालानुसार, एकूण ४७७ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३१, जालना ३०, बीड १५, लातूर २१७, तर धाराशिव जिल्ह्यातील १८३ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.