हणजूण : हणजूण समुद्रकिनाऱ्यावर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेला जीवरक्षकाच्या सतर्कतेमुळे वाचवण्यात यश आले. ही घटना समुद्रकिनाऱ्यावरील जीवरक्षक मनोऱ्याजवळ घडली.
संबंधित महिला समुद्रात आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याचे लक्षात येताच तेथे तैनात असलेल्या जीवरक्षकाने तातडीने हस्तक्षेप करत तिला सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर जीवरक्षकाने तातडीने आपत्कालीन मदत क्रमांकावर संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
महिलेने आपले नाव मेघा चोप्रा, पुणे असे सांगितले. मात्र, याबाबत अधिक माहिती देण्यास तिने नकार दिला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर महिलेला पुढील मदत आणि आवश्यक कार्यवाहीसाठी हणजूण पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले.
जीवरक्षकाच्या प्रसंगावधानामुळे महिलेचा जीव वाचला. या घटनेनंतर समुद्रकिनाऱ्यावर तैनात असलेल्या जीवरक्षकांच्या सतर्कतेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.
