Headlines

कट्टा-पेंडुर-काळसे मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; तातडीने दुरुस्ती न झाल्यास रास्ता रोकोचा ठाकरे शिवसेनेचा इशारा


कट्टा : मालवण तालुक्यातील कट्टा-पेंडुर-काळसे मार्गाची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली असून, या मार्गावरून प्रवास करणे वाहनचालकांसाठी धोकादायक बनले आहे. रस्त्यावर खड्डे की खड्ड्यांमध्ये रस्ता, अशी परिस्थिती निर्माण झाली असून, तातडीने खड्डे बुजविण्यात न आल्यास रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा ठाकरे शिवसेनेने दिला आहे.

या मार्गावर दुचाकी, तीनचाकी तसेच चारचाकी वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. खड्डे चुकविताना अनेक वाहनचालकांचे अपघात झाले असून, काही वाहने नादुरुस्त झाल्याचा दावा ठाकरे शिवसेनेकडून करण्यात आला आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठे नुकसान होत असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही रस्त्याची दुरवस्था

2025-26 मध्ये वार्षिक देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी या मार्गावर लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, निधी खर्च करूनही रस्त्याची अशी दुरवस्था झाली असल्याने हा निधी नेमका रस्त्याच्या दुरुस्तीसाठी होता की ठेकेदाराच्या फायद्यासाठी, असा सवाल ठाकरे शिवसेनेने उपस्थित केला आहे.

गणेश चतुर्थीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असताना या महत्त्वाच्या मार्गाची झालेली दुरवस्था अधिक चिंताजनक असल्याचे पक्षाने म्हटले आहे. सणासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी आणि नागरिक गावाकडे येत असतात. त्यामुळे या काळात रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढण्याची शक्यता आहे.

कुडाळकडे जाणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय

कट्टा-पेंडुर-काळसे मार्गाचा वापर करून नागरिकांना कुडाळ शहरात जावे लागते. आरोग्याच्या सुविधा, रेल्वे प्रवास, बाजारपेठ तसेच विविध जीवनावश्यक वस्तूंसाठी नागरिक कुडाळवर अवलंबून आहेत. त्यामुळे या मार्गाची दुरवस्था झाल्याने सर्वसामान्य नागरिक, प्रवासी, चाकरमानी आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

खड्ड्यांमुळे प्रवास करताना अपघात होण्याची शक्यता वाढली असून, ऐन सणासुदीच्या काळात एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवालही ठाकरे शिवसेनेकडून करण्यात आला आहे.

‘तारीख पे तारीख’ नको, तातडीने खड्डे बुजवा

रस्त्याच्या दुरवस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे विचारणा केली असता खड्डे बुजविण्याच्या कामासाठी वारंवार तारीख सांगितली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचे पक्षाचे म्हणणे आहे.

जिल्ह्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांसह आमदार आणि खासदार सत्ताधारी आघाडीच्या ताब्यात असतानाही प्रमुख शहराकडे जाणाऱ्या रस्त्याची अशी अवस्था होणे हे सत्ताधाऱ्यांचे अपयश असल्याची टीका ठाकरे शिवसेनेने केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कट्टा-पेंडुर-काळसे मार्गावरील सर्व खड्डे तातडीने बुजवावेत. अन्यथा ठाकरे शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत