किणे : गेल्या महिन्याभरापासूनश्रृंगारवाडी आणि परीसरात हत्तीने तळ ठोकला आहे. रविवारी रात्री हत्तीने थेट गावातूनच रपेट मारली. चाळू इलगे यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या आजरा येथील त्रिभुवणे यांच्या चार चाकीचे हत्तीने नुकसान केले आहे. गावात हत्ती दाखल झाल्याने ग्रामस्थ भितीच्या छायेखाली वावरत आहेत. हत्तीकडून ऊस व भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात आहे.
बबन सावंत, परसूसावंत, पांडूरंग सावंत तसेच दशरथ जोशिलकर यांच्या भात व ऊस पिकाचे हत्तीने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. तर उचंगी मार्गावर असलेल्या रवळनाथ कॅश्यू फॅक्टरीच्या मालकांच्या चारचाकीचेही हत्तीने नुकसान केले.
काजू फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या महिलांना रविवारी सायंकाळी श्रृंगारवाडी येथे सोडल्यानंतर त्रिभुवणे यांनी नेहमीप्रमाणे इलगे यांच्या घरासमोर चारचाकी लावली व दुचाकी घेऊन आजरा येथे आले. रविवारी रात्री हत्ती थेट श्रृंगाबाडी गावात आला आणि इलगे यांच्या घरासमोर उभी असलेली चारचाकी हत्तीने भिरकावून लावली. यामध्ये चारचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या महिन्याभरापासून गावच्या सभोवताली असलेल्या शेतामध्ये नुकसान करणारा हत्ती रविवारी रात्री दुसऱ्यांता गावात आला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे बातावरण पसरले आहे.
