Headlines

Eyebrow Hair Loss Causes, Symptoms, Treatment & Home Remedies For thick, dark, black eyebrows; भुवयांचे केस का गळतात? कारणे, लक्षणे, संकेत आणि भुवया जाड, काळ्या करण्यासाठी घरगुती उपाय


भुवयांचे केस गळणे ही केवळ सौंदर्याची समस्या नसून थायरॉईड, पोषक तत्त्वांची कमतरता, हार्मोन्समधील बदल, ताणतणाव किंवा ऑटोइम्यून आजारांचे सुरुवातीचे लक्षण असू शकते. वारंवार थ्रेडिंग, वॅक्सिंग आणि चुकीच्या घरगुती उपायांमुळेही भुवया विरळ होऊ शकतात. एरंडेल तेल, खोबरेल तेल यांसारख्या उपायांबाबत वैज्ञानिक सत्य काय आहे, कोणती लक्षणे गंभीर मानावीत आणि डॉक्टरांकडे कधी जावे, यासह भुवयांचे आरोग्य टिकवण्यासाठी आहार, योग्य काळजी आणि आधुनिक उपचारांविषयी तज्ज्ञांनी दिलेली महत्त्वाची माहिती जाणून घ्या.

thick eyebrows remedies
thick eyebrows remedies
भुवया केवळ सौंदर्य वाढवण्याचे काम करत नाहीत, तर त्या डोळ्यांचे धूळ, घाम आणि कचऱ्यापासून रक्षण करतात. तसेच चेहऱ्यावरील हावभाव व्यक्त करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे भुवयांचे केस पातळ होणे किंवा गळणे ही अनेकांसाठी चिंतेची बाब ठरते. रोज १-२ केस गळणे सामान्य आहे, परंतु भुवयांचे केस वेगाने विरळ होणे, ठिकठिकाणी चट्टे पडणे किंवा त्यांची घनता कमी होणे हे शरीरातील अंतर्गत आजारांचे संकेत असू शकतात.

भुवया विरळ होण्याची मुख्य कारणे

भुवया विरळ होण्याची मुख्य कारणे
  • अति-पार्लर ट्रीटमेंट्स : वारंवार थ्रेडिंग, वॅक्सिंग किंवा प्लकिंग केल्याने केसांची मुळे (Hair Follicles) कायमची खराब होतात, ज्यामुळे तिथे नवीन केस उगवणे बंद होते.
  • पोषक तत्त्वांची कमतरता : शरीरात लोह, व्हिटॅमिन D, व्हिटॅमिन B12, झिंक, बायोटिन आणि प्रथिनांची कमतरता असल्यास भुवयांचे केस गळतात.
  • हार्मोन्स इनबॅलन्स : थायरॉईडची (Hypothyroidism) समस्या असलेल्या व्यक्तींमध्ये भुवयांचा बाहेरील एक-तृतीयांश भाग पातळ होणे हे या आजाराचे सुरुवातीचे प्रमुख लक्षण मानले जाते. याशिवाय (PCOS), गर्भधारणा आणि रजोनिवृत्तीदरम्यान (Menopause) केस विरळ होतात.
  • ताणतणाव आणि ऑटोइम्यून आजार : तीव्र मानसिक ताणामुळे केसांची मुळे विश्रांतीच्या टप्प्यात जातात आणि केस गळू लागतात. तसेच ‘ॲलोपेशिया अरेटा’ (Alopecia Areata) या ऑटोइम्यून आजारात शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चुकीने स्वतःच्याच केसांच्या मुळांवर हल्ला करते, ज्यामुळे भुवयांचे केस चकत्यांच्या स्वरूपात गळतात.​

गंभीर चेतावणी देणारी लक्षणे

गंभीर चेतावणी देणारी लक्षणे

जर भुवयांचे केस अचानक वेगाने गळू लागले असतील, त्या भागात लालसरपणा, तीव्र खाज, खवले जपणे किंवा वेदना होत असतील, तर त्वरित त्वचाविकार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तसेच भुवयांच्या केसगळतीसोबत अत्यंत थकवा जाणवणे, अचानक वजन वाढणे किंवा कमी होणे, मासिक पाळीत अनियमितता किंवा खूप थंडी वाजणे अशी लक्षणे दिसत असल्यास रक्तातील थायरॉईड किंवा पोषक तत्त्वांच्या चाचण्या करून घेणे अनिवार्य आहे.

घरगुती उपाय, गैरसमज आणि त्यांची सत्यता

घरगुती उपाय, गैरसमज आणि त्यांची सत्यता

सोशल मीडियावर भुवयांचे केस पुन्हा उगवण्यासाठी अनेक घरगुती उपायांचा दावा केला जातो, ज्यांना कोणताही वैज्ञानिक आधार नाही:

  • एरंडेल तेल : यात रिसिनोलिक ॲसिड, व्हिटॅमिन ई आणि फॉलिक ॲसिड असते, जे केसांच्या मुळांना पोषण देतात आणि केसांच्या निरोगी वाढीस मदत करतात. रात्री झोपण्यापूर्वी कापसाचा गोळा किंवा स्वच्छ मस्कारा ब्रश वापरून तुम्ही तुमच्या भुवयांवर एरंडेल तेल लावू शकता. हे तेल रात्रभर तसेच राहू द्या आणि सकाळी धुवून टाका. आठवड्यातून साधारण तीन वेळा ही कृती करा.
  • खोबरेल तेल : हे तेल भुवयांच्या केसांना ओलावा देते आणि ते तुटण्यापासून वाचवते. परंतु, यामुळे नवीन केस उगवतात असा कोणताही ठोस वैद्यकीय पुरावा नाही.
  • कोरफड : कोरफड त्वचेची जळजळ कमी करते, परंतु त्यामुळे भुवयांची घनता वाढते हे सिद्ध झालेले नाही.
  • कांद्याचा रस : कांद्यामध्ये सल्फर असते, पण शास्त्रीयदृष्ट्या त्याचे पुरावे कमकुवत आहेत. शिवाय कांद्याचा रस डोळ्यांजवळ लावल्याने डोळ्यांची तीव्र जळजळ होणे, पाणी येणे आणि त्वचा लाल होण्याचा मोठा धोका असतो.
  • अंड्यातील पिवळा बलक : अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये प्रथिने (प्रोटीन) आणि बायोटिन असतात, जे दोन्ही केसांच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. यामुळे केस दाट आणि भरगच्च होण्यास मदत होते. मस्कारा वाँडच्या (ब्रशच्या) साहाय्याने तुमच्या भुवयांवर अंड्याच्या पिवळ्या बलकाचा एक पातळ थर लावा आणि १५ मिनिटांनंतर त्या स्वच्छ धुवा. ही प्रक्रिया आठवड्यातून फक्त एकदाच करा.
  • ऑलिव्ह ऑईल : ऑलिव्ह ऑईलमध्ये ‘व्हिटॅमिन ई’ आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे केसांच्या आरोग्यासाठी आणि वाढीसाठी अत्यंत फायदेशीर असतात. दररोज रात्री झोपण्यापूर्वी भुवयांना ऑलिव्ह ऑईलने मालिश केल्याने त्या भागातील रक्ताभिसरण सुधारते आणि भुवयांची वाढ होण्यास चालना मिळते.

या प्रेशर पॉइंट्सची करा मसाज

या प्रेशर पॉइंट्सची करा मसाज
  • युयाओ पॉईंट : हा बिंदू भुवईच्या मध्यभागी, विशेषतः जिथे भुवईचा कमानदार भाग आहे, तिथे असतो. या भागावर सुमारे ३० सेकंद बोटाने दाब द्या आणि ही प्रक्रिया पाच वेळा पुन्हा करा.
  • जैन जू पॉईंट : हा पॉईंट भुवईच्या आतील टोकाला, नाकाजवळ असतो. येथे दाब दिल्याने डोळ्यांवरील ताण कमी होण्यास मदत होते आणि त्या भागातील रक्तसंचार सुधारतो. या बिंदूवर ३० सेकंद असं पाच वेळा दाब द्या.
  • तैयांग पॉईंट : हा पॉईंट भुवईच्या बाहेरील टोकाजवळ, म्हणजेच कानशिलाच्या (temple) भागात असतो. बोटांनी गोलाकार हालचाल करत या भागाची मालिश करा. एक मिनिटापर्यंत असे केल्याने रक्ताभिसरण सुधारते आणि केसांच्या वाढीस चालना मिळते.​​​

वैद्यकीय उपचार आणि शास्त्रीय पर्याय

वैद्यकीय उपचार आणि शास्त्रीय पर्याय

भुवया विरळ होण्यावर उपचाराची दिशा ही त्याच्या मूळ कारणावर अवलंबून असते:

  • पोषक घटक आणि औषधे : तपासणीनंतर पोषक तत्त्वांची कमतरता आढळल्यास योग्य सप्लिमेंट्स दिले जातात आणि थायरॉईड असल्यास त्यावर वैद्यकीय उपचार केले जातात.
  • टार्गेटेड थेरपी : ॲलोपेशिया किंवा त्वचेच्या संसर्गासाठी डॉक्टर विशिष्ट टॉपिकल कॉर्टिकोस्टिरॉईड्स किंवा कॅल्सिन्युरिन इनहिबिटर्स लिहून देतात.
  • प्रगत पर्याय : काही निवडक रुग्णांमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ‘मिनॉक्सिडिल’ किंवा कायमस्वरूपी केस गेलेल्यांसाठी ‘आयब्रो ट्रान्सप्लांट’ सारख्या प्रगत प्रोसिजर्सचा वापर केला जातो. डोळ्यांच्या नाजूक भागाजवळ स्वतःच्या मनाने कोणतेही प्रॉडक्ट वापरणे टाळावे.

भुवयांचे आरोग्य जपण्यासाठी दैनंदिन काळजी

भुवयांचे आरोग्य जपण्यासाठी दैनंदिन काळजी

भुवयांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी खालील गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे:

  • मर्यादित प्लकिंग : सतत थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग करणे टाळा.
  • संतुलित आहार : आहारात भरपूर प्रथिने, हिरव्या भाज्या, फळे आणि सुकामेवा यांचा समावेश करा.
  • सौम्य स्वच्छता : रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावरील मेक-अप अत्यंत हलक्या हाताने आणि योग्य क्लिन्झरने साफ करा. भुवयांचे केस जोरात घासू नका.
  • तणावमुक्त जीवन : पुरेशी झोप आणि ताणतणावाचे व्यवस्थापन केसांच्या चांगल्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहे.
    भुवयांचे केस पातळ होणे हा केवळ सौंदर्याशी जोडलेला विषय नसून तो शरीरातील अंतर्गत आजारांचा संकेत असू शकतो. घरगुती उपायांवर किंवा इंटरनेटवरील दाव्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवण्याऐवजी डॉक्टरांच्या सल्ल्याने मूळ कारणाचा शोध घ्या. या उपायांबरोबरच, दाट आणि निरोगी भुवया मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहाराकडेही लक्ष दिले पाहिजे. भुवयांचे केस वाढण्यास मदत करण्यासाठी प्रथिने (प्रोटीन), लोह (आयर्न), झिंक, बायोटिन आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिड्सचे सेवन वाढवा. तथापि, जर तुमच्या भुवयांचे केस अचानक आणि वेगाने गळत असतील, ठराविक भागातील केस गळत असतील (पॅची हेअर लॉस), केस गळताना खाज येत असेल किंवा डोक्यावरील केसही वेगाने गळत असतील, तर तुम्ही त्वचारोगतज्ज्ञांचा (डर्मेटोलॉजिस्ट) सल्ला घेतला पाहिजे.
आम्ही या लेखाचे पुनरावलोकन कसे केले

आमची टीम आरोग्य आणि वेलनेसविषयी सतत नवे व उपयुक्त लेख तयार करते. प्रत्येक लेख वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने लिहिला जातो, त्यामुळे दिलेली माहिती विश्वासार्ह आणि अचूक असते.

  • नवीन आवृत्ती
  • Jul 27, 2026, 01:23 PMMedically Reviewed byDr. Dr Shweta V. Nakhawa
  • Jul 27, 2026, 01:23 PMWritten byप्रतीक्षा सुनील मोरेमहाराष्ट्रटाइम्स.कॉम