![]()
छत्रपती संभाजीनगर येथे शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करण्यासाठी 2 हजार विद्यार्थ्यांच्या सहभागातून भव्य मानवी साखळी आणि रॅलीचे आयोजन करण्यात आले. शहागंज परिसरात झालेल्या या उपक्रमात, तरुणांनी व्यसनांपासून दूर राहून नशामुक्त जीवनाचा संकल्प करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी केले. या उपक्रमाचे आयोजन जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग (माध्यमिक व प्राथमिक) आणि सारा नवजीवन बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या मोहिमेत समाज कल्याण विभाग, जिल्हा आरोग्य विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका यांसह विविध शासकीय विभागांनी सक्रिय सहभाग घेतला. शहरातील तब्बल 2 हजार शालेय विद्यार्थ्यांनी एकत्र येत मानवी साखळी तयार केली आणि रॅली काढून जनजागृती केली. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी “नशा छोडो, परिवार जोडो – नशा छोडो, भारत जोडो” अशा घोषणा दिल्या, ज्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी 500 विद्यार्थ्यांनी एकत्र येत मैदानावर ‘नशामुक्त छत्रपती संभाजीनगर’ अशी भव्य मानवी रांगोळी साकारली. या आकर्षक रांगोळीचे ड्रोनद्वारे विशेष चित्रण करण्यात आले. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पी. एम. मिन्नू यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. नशामुक्त भारत अभियानाचे मास्टर ट्रेनर डॉ. कृष्णा रामचंद्र भावले यांनी उपस्थित विद्यार्थी व नागरिकांना नशामुक्तीची शपथ दिली. याप्रसंगी शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर, उपशिक्षणाधिकारी दिपाली थावरे, निता श्रीश्रीमाळ, गिता तांदळे, विस्तार अधिकारी दिलीप सिरसाठ, जालम चौरे, सुनिता वाघ, ज्ञानेश्वर रोडगे आदी मान्यवर उपस्थित होते. या जनजागृती मोहिमेत शहरातील अनेक शाळा व महाविद्यालयांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यामध्ये राष्ट्रीय हिंदी महाविद्यालय, डॉ. झाकीर हुसेन कनिष्ठ महाविद्यालय व हायस्कूल (रोशनगेट), सर सय्यद महाविद्यालय, मलिकंबर उर्दू हायस्कूल (रजा रोड), अनिसा उर्दू हायस्कूल व विनर्स इंग्लिश हायस्कूल (रविंद्रनगर), खैरुल मोमिनीन उर्दू हायस्कूल (राडपुरा), इकरा बॉईज हायस्कूल (एस.टी. कॉलनी), भारतीय विद्या मंदिर (रोशनगेट), अल्मीर उर्दू हायस्कूल, पी. यू. जैन माध्यमिक विद्यालय, अल्लमा शिब्ली उर्दू हायस्कूल यांचा प्रामुख्याने समावेश होता. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख रशीद रहीमान यांनी केले, तर भाऊ पठाडे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.
Source link
छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 हजार विद्यार्थ्यांची मानवी साखळी:नशामुक्त जीवनाचा संकल्प करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
