महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवीन राजकीय समीकरणे, अनपेक्षित वळणं आणि धक्कादायक राजकीय घडामोडी पाहायला मिळतात. मात्र, काही वेळा राजकीय नेत्यांचे साधे, दोन ओळींचे सोशल मीडिया मेसेजही राजकीय वर्तुळात वादळ निर्माण करण्यासाठी पुरेसे ठरतात. असाच एक प्रकार परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या एका फेसबुक पोस्टमुळे समोर आला आहे.शिवसेना पक्षामध्ये पडलेली फूट, त्यातून निर्माण झालेला संघर्ष आणि राजकीय पुनर्रचना यातच, नुकतेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या खासदार संजय जाधव यांनी शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या. वरवर पाहता ही केवळ एका माजी पक्षाध्यक्षाला दिलेली शिष्टाचाराची शुभेच्छा वाटत होती. परंतु, संजय जाधव यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडताना केलेले आरोप, त्यानंतर ठाकरे गटाकडून झालेला राजकीय हल्लाबोल आणि परभणी जिल्ह्यातील बदललेली राजकीय गणिते यांचा विचार करता, या एका पोस्टची जोरदार चर्चा सुरु झाली. या चर्चेनंतर काही तासांनी संजय जाधव यांच्याकडून ही पोस्ट डिलीटही करण्यात आली. पण मुळात ही पोस्ट करण्यात का आली होती? जुन्या पक्षाध्यक्षांबद्दलची आंतरिक निष्ठा आदर दाखवायचा होता की आगामी काळात गद्दारीच्या शिक्क्यामुळे होणाऱ्या राजकीय नुकसानाची भीती? होती आणि पोस्ट करून मग ती डिलीट करण्याची वेळ बंडू जाधवांवर का आली? तेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात…