Pune News: आषाढी एकादशीनंतर घाऊक बाजारात भाज्यांची आवक वाढल्याने काही भाज्यांचे दर सुमारे दहा टक्क्यांनी कमी झाले . फळभाज्या आणि पालेभाज्यांचे दर स्थिर झाले आहेत. फुलांची आवक आणि मागणी सारखीच असल्याने फुलांचे दर देखील स्थिर आहेत.

फळभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक
गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात रविवारीराज्यातील विविध भागांसह आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि तमिळनाडू येथून सुमारे ९० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. मार्केट यार्डात बटाटा, लसूण, हिरवी मिरची, गाजर, घेवडा, मटार, शेवगा, कोबी, तोतापुरी कैरी यांची परराज्यांतून मोठ्या प्रमाणात आवक झाली
कोथिंबिरीची दोन लाख जुडी आणि मेथीची ७० हजार जुडींची आवक
स्थानिक भागातून टोमॅटो, भेंडी, काकडी, फ्लॉवर, ढोबळी मिरची, गवार, तांबडा भोपळा आणि कांद्याचीही आवक झाली. कोथिंबिरीची दोन लाख जुडी आणि मेथीची ७० हजार जुडींची आवक झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. किरकोळ बाजारात बटाटा (प्रतिकिलो) ३५ ते ४०, कांदा ३५ ते ४०, भेंडी १०० ते १२०, लसूण ३०० ते ३५०, गवार १०० ते १२०, भेंडी १०० ते १२०, टोमॅटो ४० ते ५० रुपये दर आहेत.
फळबाजारात रविवारी लिंबाच्या १४०० गोणी
मार्केट यार्डातील फळबाजारात डाळिंब आणि पपईच्या दरात दहा टक्क्यांनी वाढ झाली. लिंबांच्या दरात घट झाली असून अननस, संत्री, कलिंगड, खरबूज, चिकू आणि पेरूचे दर स्थिर आहेत. फळबाजारात रविवारी लिंबाच्या १४०० गोणी, मोसंबी २० ते २५ टन, संत्री १ टन, डाळींब ४० ते ४५ टन, पपई ८ ते ९ टेम्पो, कलिंगड चार ते पाच टेम्पो, खरबूज दोन ते तीन टेम्पो, चिकू ३०० गोणी, पेरू ६०० ते ७०० के्रट, अननस पाच ट्रक इतकी आवक झाली. किरकोळ बाजारात सफरचंद (प्रतिकिलो) २५० ते ३५०, डाळिंब १८० ते २५०, संत्री १०० ते १४०, चिकू ५० ते ८० या दराने विक्री होत आहे.
फुलांचे दर स्थिर
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मार्केट यार्डातील फुल बाजारात सर्व फुलांची आवक घटली. मात्र, आवक आणि मागणी सारखीच असल्याने दर स्थिर आहेत. आषाढीच्या पार्श्वभूमीवर मागील दोन दिवस फुलांना मोठ्या प्रमाणावर मागणी होती. फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ४०-८०, गुलछडी : १००-१५०, ॲस्टर : गड्डी : २०-३०, सुट्टा १२०-१५०, शेवंती : १२०-१६०, गुलाबगड्डी (गड्डीचे दर) : २०-३०, गुलछडी काडी : १०-२०, डच गुलाब (२० नग) : ६०-१२०, जर्बेरा : ३०-५०, कार्नेशियन : १५०-२००, शेवंती काडी २५०-३५०, लिलियम (१० काड्या) १०००-१२००, ऑर्किड ५००-६००, ग्लॅडिओ (१० काड्या) : १००-१५०, जिप्सोफिला : २००-४००, लिली बंडल : १०-१२, मोगरा : ३००-४००, जुई: ३००-४००.

