Headlines

सहा खासदारांच्या पक्षांतराला मान्यता


उद्धव ठाकरे यांना लोकसभा अध्यक्षांचा मोठा हादरा : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले या निर्णयाचे स्वागत

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

उबाठा शिवसेनेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेल्या सहा लोकसभा खासदारांच्या पक्षांतराला लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता दिली आहे. संसदेचे वर्षाकालीन अधिवेशनाचा प्रारंभ येत्या सोमवारी होत आहे. त्याआधी हा निर्णय आला आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा दणका बसला आहे. आता शिंदे यांच्या शिवसेनेच्या लोकसभा सदस्यांची संख्या 13 झाली आहे.

संजय जाधव, भाऊसाहेब वाक्चौरे, ओमप्रकाशराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, संजय देशमुख आणि नागेश पाटील-अष्टीकर अशी या खासदारांची नावे आहेत. या खासदारांनी 22 जून 2026 या दिवशी उबाठा गट सोडून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनी या निर्णयाची माहिती लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना लेखी कळविली होती. तसेच शिंदे शिवसेनेत झालेले आपले विलीनीकरण मान्य करावे, अशी विनंतीही केली होती. बिर्ला यांनी सर्व कायदेशीर मुद्द्यांचा विचार करुन हे विलीनीकरण आता वैध घोषित केले आहे.

उबाठा गटाचा विरोध

या विलीनीकरणाला उबाठा गटाने विरोध केला होता. लोकसभा अध्यक्षांकडे या गटाने आपला विरोध नोंद केला होता. पक्षाच्या कार्यकारिणीची दोन तृतियांश बहुमताने मान्यता मिळाल्याशिवाय केवळ खासदारांचे पक्षांतर वैध ठरत नाही, असे या गटाचे म्हणणे होते. तथापि, ते ओम बिर्ला यांनी अमान्य केल्याचे दिसत आहे. उबाठा गटाचा युक्तीवाद अमान्य करताना ओम बिर्ला यांनी घटनेच्या 10 व्या परिशिष्टातील पक्षांतरबंदी कायद्यातील तरतुदींचा आधार घेतल्याची माहिती देण्यात आली. एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्षांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

शिंदे गटाचे वाढले बळ

उबाठा गटात पूर्वी असणारे 9 पैकी सहा खासदार आता अधिकृतरित्या शिंदे यांच्या गटात समाविष्ट झाल्याने या गटाचे बळ लोकसभेत वाढले आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शिंदे यांच्या अधिकृत शिवसेनेचे सात खासदार निवडून आले होते. तर उबाठा गटाचे 9 खासदार होते. आता सहा खासदारांनी पक्षांतर केल्याने शिंदे यांच्या शिवसेनेच्या खासदारांची संख्या लोकसभेत 13 झाली आहे. तसेच, सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आता हा पक्ष तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष बनला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे बळही वाढले आहे.

उबाठा गट काय करणार…

लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला उबाठा गट सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ शकतो, असे काही कायदेतज्ञांचे मत आहे. तथापि, घटनेच्या 10 व्या परिशिष्टात स्पष्ट केलेल्या पक्षांतरबंदी कायद्यानुसार एखाद्या पक्षाचे कोणत्याही लोकप्रतिनिधीगृहातील दोन तृतियांश प्रतिनिधी फुटून त्यांनी अन्य कोणत्याही नोंदणीकृत पक्षात प्रवेश केला, तर ही फूट वैध मानण्यात येते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जाऊनही फारसा उपयोग होणार नाही, असे अन्य काही कायदेतज्ञांचे मत आहे.

एनसीपीआयलाही निमंत्रण

पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या 28 पैकी 20 खासदारांनी नॅशनॅलिस्ट सिटीझन्स पार्टी या पक्षात प्रवेश केलेला आहे. या पक्षाला सांसदीय व्यवहार मंत्री किरण रिजीजू यांनी सर्वपक्षीय बैठकीत सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. तसेच या पक्षाच्या नेत्या काकोली घोष यांना पक्षाच्या मुख्य प्रतोद म्हणून या बैठकीसाठी मान्यताही दिली आहे. या पक्षाचे नेते आणि लोकसभा सदस्य सुदीप बंडोपाध्याय यांनी रिजीजू यांनी पत्र पाठविले असून त्यात सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहण्याविषयी आमंत्रण दिले. संसदेच्या वर्षाकालीन अधिवेशनाला उद्या सोमवारपासून प्रारंभ होत असून त्याआधी परंपरेप्रमाणे सर्वपक्षीय बैठक आयोजित केली जाते. या बैठकीत अधिवेशनाच्या कामकाजासंबंधी चर्चा होण्याची प्रथा आहे.

शिंदे शिवसेनेचे मोठे यश

ड शिंदे यांच्या शिवसेनेचे लोकसभेतील संख्याबळ या निर्णयानंतर झाले तेरा

ड लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निर्णयासमवेत एक प्रक्रिया समाप्त

ड संसदेच्या वर्षाकालीन अधिवेशनाला सोमवारी प्रारंभ होण्यापूर्वी हा निर्णय



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत