पावसाळा अनेकांना आवडणारा ऋतू असला, तरी या काळात घरातील दैनंदिन कामांमध्ये काही अडचणी निर्माण होतात. त्यापैकी एक महत्त्वाची अडचण म्हणजे धुतलेले कपडे लवकर न वाळणे. सतत पडणारा पाऊस, सूर्यप्रकाशाचा अभाव आणि वातावरणातील वाढलेला ओलावा यामुळे कपडे बराच वेळ ओले राहतात. त्यामुळे कपड्यांना दुर्गंधी येणे, बुरशी तयार होणे किंवा त्यांची स्वच्छता टिकवणे कठीण होते. अशा परिस्थितीत योग्य पद्धतीने कपडे वाळवणे गरजेचे ठरते. काही सोप्या टिप्स आणि घरगुती उपायांचा अवलंब केल्यास पावसाळ्यातही कपडे लवकर सुकू शकतात आणि त्यांचा ताजेपणा कायम राहू शकतो.

कपडे वेळेवर सुकले नाहीत तर त्यांना कुबट वास येऊ लागतो. एवढेच नाही तर ओलसर कपड्यांमध्ये बुरशी, जीवाणू आणि बुरशीजन्य डाग तयार होण्याचा धोका वाढतो. अशा कपड्यांचा वापर केल्यास त्वचेच्या समस्या, अॅलर्जी किंवा खाज येण्याची शक्यता देखील निर्माण होऊ शकते. त्यामुळे पावसाळ्यात कपडे धुण्याइतकेच त्यांना योग्य पद्धतीने वाळवणेही महत्त्वाचे ठरते.
अनेक जण कपडे घरातच वाळत घालतात, पण योग्य हवा न मिळाल्यामुळे ते लवकर सुकत नाहीत. काही छोट्या चुका, जसे की कपडे एकमेकांना चिकटवून टांगणे किंवा धुतल्यानंतर अतिरिक्त पाणी न काढणे, यामुळेही सुकण्यास जास्त वेळ लागतो. मात्र काही सोप्या सवयी, योग्य नियोजन आणि घरगुती उपाय अवलंबल्यास पावसाळ्यातही कपडे लवकर, स्वच्छ आणि दुर्गंधीमुक्त सुकवता येतात.(फोटो सौजन्य :- @iStock)
डीह्युमिडिफायर किंवा एअर कंडिशनरचा वापर
हवेत जास्त आर्द्रता असल्यामुळे कपडे उशिरा सुकतात. घरात डीह्युमिडिफायर असल्यास तो वापरल्याने वातावरणातील ओलावा कमी होतो. एअर कंडिशनरमधील ‘ड्राय मोड’ देखील यासाठी उपयुक्त ठरतो.
पंख्याचा वापर करा
घरात कपडे वाळत घालताना छतावरील किंवा टेबल फॅन सुरू ठेवावा. सतत वाहणाऱ्या हवेचा प्रवाह कपड्यांवरील ओलावा कमी करण्यास मदत करतो. शक्य असल्यास कपड्यांच्या दिशेने पंखा ठेवावा, त्यामुळे सुकण्याचा वेग वाढतो.
कपड्यांमध्ये योग्य अंतर ठेवा
अनेकदा जागेअभावी कपडे एकमेकांना चिकटून टांगले जातात. त्यामुळे हवा व्यवस्थित फिरत नाही आणि कपडे सुकण्यास अधिक वेळ लागतो. प्रत्येक कपड्यामध्ये थोडे अंतर ठेवल्यास हवा सर्व बाजूंनी खेळते आणि कपडे तुलनेने लवकर सुकतात.
हवेशीर जागेत कपडे वाळत घाला
पाऊस असल्यामुळे कपडे घरातच वाळत घालावे लागतात. अशावेळी खिडकीजवळ, गॅलरीत किंवा जिथे हवा चांगली खेळते अशा ठिकाणी कपडे टांगावेत. नैसर्गिक हवा मिळाल्यास कपड्यांतील ओलावा लवकर कमी होतो.
जाड आणि पातळ कपडे वेगळे धुवा
टॉवेल, जीन्स, ब्लँकेट किंवा जाड कपडे सुकण्यासाठी अधिक वेळ घेतात. हे कपडे पातळ कपड्यांपासून वेगळे धुतल्यास आणि स्वतंत्रपणे वाळत घातल्यास दोन्ही प्रकारचे कपडे अधिक चांगल्या प्रकारे सुकतात.
हँगरचा वापर करा
शर्ट, टी-शर्ट, कुर्ते किंवा ड्रेस हँगरवर टांगल्यास त्यामध्ये हवा सर्व बाजूंनी फिरते. त्यामुळे कपड्यांना घड्या पडत नाहीत आणि ते तुलनेने लवकर सुकतात. शिवाय इस्त्री करण्याचे कामही कमी होते.

