नारळी पौर्णिमा किंवा सणासुदीच्या खास प्रसंगी घरच्या घरी बनवलेली ओल्या खोबऱ्याची बर्फी प्रत्येकालाच आवडते. ताजे खोबरे, साखर, दूध आणि वेलची-जायफळाच्या सुगंधामुळे या बर्फीला अप्रतिम चव आणि मऊ, दाणेदार पोत मिळतो. योग्य प्रमाण आणि शिजवण्याची योग्य पद्धत वापरल्यास ही बर्फी तोंडात टाकताच विरघळणारी बनते. आश्विनी यांनी त्यांच्या ‘Ashwini Annapurna Kitchen’ या सोशल मीडिया चॅनलवर या स्वादिष्ट ओल्या खोबऱ्याच्या बर्फीची रेसिपी शेअर केली आहे.

या बर्फीचे वैशिष्ट्य म्हणजे ती ना खूप टणक असावी ना खूप ओलसर. योग्य पद्धतीने केली तर बर्फी मऊ, दाणेदार आणि तोंडात सहज विरघळणारी होते. मात्र ओल्या नारळाची बर्फी बनवताना काही छोट्या चुका झाल्या तर ती जास्त पाणीदार होऊ शकते किंवा जास्त शिजल्यामुळे कडक होऊ शकते. त्यामुळे प्रमाण आणि शिजवण्याची योग्य वेळ याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. (फोटो सौजन्य :-@Ashwini Annapurna kitchen)
बर्फी कापताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी
बर्फी पूर्णपणे सेट झाल्यानंतर धारदार सुरीने चौकोनी किंवा डायमंड आकाराच्या वड्या कापाव्यात. सुरीला थोडे तूप लावल्यास कापणे अधिक सोपे जाते.परफेक्ट बर्फीची वडी हातात घेतल्यावर ना खूप कडक वाटते ना खूप मऊ. कापताना ती व्यवस्थित आकारात राहते आणि खाल्ल्यावर मऊ, दाणेदार पोत जाणवतो.
बर्फी परफेक्ट होण्याची मुख्य स्टेज
ओल्या खोबऱ्याच्या बर्फीमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मिश्रण किती शिजवायचे हे ओळखणे. खूप कमी शिजवल्यास बर्फीमध्ये जास्त ओलावा राहतो आणि ती व्यवस्थित सेट होत नाही. दुसरीकडे खूप जास्त शिजवल्यास बर्फी कडक आणि टणक होते.मिश्रण हळूहळू घट्ट होत जाईल आणि कढईच्या कडा सोडू लागेल. चमच्याने ढवळताना मिश्रण एकत्र येऊ लागले आणि कढईला चिकटणे कमी झाले की ते जवळपास तयार झाले आहे असे समजावे.याच वेळी शेवटी वेलची-जायफळ पूड घालावी. त्यामुळे बर्फीला अतिशय सुंदर सुगंध येतो. गॅस बंद करून मिश्रण लगेच तयार ट्रेमध्ये काढावे.
ट्रेमध्ये सेट करण्याची पद्धत
मिश्रण गरम असतानाच ट्रेमध्ये ओतणे आवश्यक आहे. कारण ते थंड होत गेले की घट्ट होऊ लागते आणि समान पसरवणे कठीण होते. म्हणून ट्रे आधीच तयार ठेवण्याचा सल्ला दिला जातो.स्पॅटुला किंवा चमच्याच्या मदतीने मिश्रण पटकन आणि समान जाडीमध्ये पसरवावे. वरून थोडे पिस्त्याचे काप किंवा केशर घालू शकता.त्यानंतर ट्रे खोलीच्या तापमानाला पूर्ण थंड होऊ द्यावा. घाई असल्यास सुमारे अर्धा तास फ्रिजमध्ये ठेवला तरी चालतो. बर्फी व्यवस्थित सेट झाल्यानंतर बटर पेपरच्या मदतीने ती सहज बाहेर काढता येते.
ओल्या खोबऱ्याची बर्फी रेसिपी
ओल्या खोबऱ्याची बर्फी
- साहित्य
- ओले ताजे खोबरे – 2 वाट्या
- साखर – 1 वाटी
- साजूक तूप – 2 टेबलस्पून
- दूध – ¼ वाटी
- मिल्क पावडर – 2 टेबलस्पून (किंवा मावा/खवा)
- वेलची-जायफळ पूड – ¼ टीस्पून
- पिस्त्याचे काप – सजावटीसाठी
- केशर – थोडे
साखर आणि मिल्क पावडर घालण्याची वेळ
दूध घातल्यानंतर खोबरे काही मिनिटे शिजवून घ्यावे. त्यानंतर एक वाटी साखर घालावी. साखर घातल्यानंतर मिश्रण पातळ होऊ लागेल. ही अगदी सामान्य गोष्ट आहे. त्यामुळे घाबरून जास्त आच करू नये.आता दोन टेबलस्पून मिल्क पावडर घालावी. मिल्क पावडरमुळे बर्फीला छान मऊपणा येतो आणि चवही माव्यासारखी होते. मिल्क पावडर नसेल तर त्याऐवजी मावा किंवा खवा वापरता येतो.मिश्रण सतत ढवळत राहावे. कढईच्या तळाला मिश्रण चिकटू नये म्हणून तळापासून ढवळणे आवश्यक आहे. शक्यतो नॉनस्टिक कढई वापरल्यास मिश्रण सहजपणे हलवता येते.
ओले खोबरे परतण्याची योग्य पद्धत
आता नॉनस्टिक कढई घ्यावी. त्यात दोन टेबलस्पून साजूक तूप घालावे. तूप गरम झाल्यावर त्यात ओले खोबरे घालावे. खोबरे मंद आचेवर व्यवस्थित परतून घ्यावे.ही प्रक्रिया अतिशय महत्त्वाची आहे. खोबऱ्यामधील अतिरिक्त ओलावा आणि कच्चा वास कमी होईपर्यंत ते मंद आचेवर परतावे. मात्र खोबरे खूप भाजून घेऊ नये. त्याचा रंग बदलून तपकिरी होण्याची गरज नाही. फक्त त्यातील कच्चेपणा कमी होणे आणि थोडा ओलावा कमी होणे आवश्यक आहे.खोबरे योग्य प्रमाणात परतले की त्यात पाव वाटी दूध घालावे. दूध जास्त प्रमाणात वापरू नये. कारण ओल्या खोबऱ्यामध्ये आधीपासूनच नैसर्गिक ओलावा असतो. दूध जास्त झाले तर तयार बर्फी खूप ओलसर होऊन सेट होण्यास त्रास होऊ शकतो.
बर्फी बनवण्याची पूर्वतयारी
बर्फीचे मिश्रण तयार झाल्यानंतर ते लगेच ट्रेमध्ये पसरवावे लागते. त्यामुळे स्वयंपाक सुरू करण्यापूर्वीच ट्रे तयार ठेवणे महत्त्वाचे आहे. ट्रेला आतून थोडे साजूक तूप लावावे आणि त्यावर बटर पेपर अंथरावा. बटर पेपर उपलब्ध नसेल तर साध्या ताटाला तूप लावून त्यातही मिश्रण सेट करता येते. ट्रेममध्ये सुरुवातीलाच बारीक चिरलेले पिस्त्याचे काप आणि थोडे केशर घातले तर बर्फी बाहेर काढल्यानंतर तिचा वरचा भाग खूप सुंदर दिसतो. गुलाबाच्या पाकळ्यांनीही सजावट करता येते.

