Headlines

Ram Kadam Warns Raj Thackeray Over Deh Vikri Remark


राज्यातील सत्ताधारी महायुतीकडून सुरू असलेल्या कथित पक्षफोडीच्या राजकारणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेनंतर आता त्यावरून नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. पक्षांतर करणाऱ्या लोकप्रतिनिधींची तुलना ‘देहविक्री’शी करणाऱ्या राज ठाकरे यांच्या व

.

राज ठाकरेंची भाजपवर सडकून टीका

ठाण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, “महाराष्ट्रासह देशात सध्या सुरू असलेले पक्षफोडीचे राजकारण अत्यंत चिंताजनक आहे. विरोधी पक्षातील नेते आणि लोकप्रतिनिधींना आपल्या बाजूला ओढण्याचा प्रयत्न हा लोकशाहीच्या मूल्यांना धक्का देणारा आहे.” यावेळी त्यांनी वादग्रस्त भाष्य करत, “आज प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाही, तर विकल्या जाणाऱ्यांचा आहे. हे देहविक्रीला तयार असतील तर गिऱ्हाईकं तयार आहेतच,” अशी टीका त्यांनी केली होती.

‘अमित शहांच्या रणनीतीमुळे महाराष्ट्रातील घाणेरडं राजकारण’

राज ठाकरे यांनी भाजप आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही थेट निशाणा साधला. “देशात भाजप आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यामुळे टिकून आहे. मात्र महाराष्ट्रात आणि देशात जे फोडाफोडीचे व घाणेरडे राजकारण सुरू आहे, त्यामागे अमित शहा यांची रणनीती आहे,” असा आरोप त्यांनी केला. तसेच, “सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही आलेला नसतो. आज सत्ता आहे म्हणून जे सुरू आहे, त्याचे परिणाम उद्या भाजपलाही भोगावे लागतील,” असा इशाराही त्यांनी दिला.

राम कदमांचा पलटवार; ‘हक्कभंगाचा विषय होऊ शकतो’

राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर भाजप आमदार राम कदम यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “राज ठाकरे यांच्या विधानामुळे हक्कभंगाचा विषय निर्माण होऊ शकतो. त्यांनी केलेले वक्तव्य लोकप्रतिनिधींच्या विशेषाधिकारांचे उल्लंघन करणारे आहे.”

मात्र, “माझ्या मनात राज ठाकरे यांच्याबद्दल आदर आहे. त्यामुळे मी स्वतः हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार नाही. पण त्यांच्या वक्तव्याचे स्वरूप तसे आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘जनतेचा रोष असता तर पक्षांतर करणारे निवडून आले नसते’

फोडाफोडीच्या राजकारणावरील आरोप फेटाळताना राम कदम म्हणाले, “जर जनतेला पक्षांतराचा राग असता, तर पक्ष बदलणारे लोकप्रतिनिधी पुन्हा निवडून आले नसते. २०-२० लाख मतदारांचे प्रतिनिधित्व करणारे आमदार आणि खासदार पक्ष बदलतात, त्यामागे काही ना काही कारण असते.”

ते पुढे म्हणाले, “एखादा कॅबिनेट मंत्री सत्ता सोडून विरोधात जातो, अशी उदाहरणे फार कमी आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आमदार पुन्हा निवडून आले, याचा अर्थ जनतेने त्यांना स्वीकारले आहे.”

‘उद्धव ठाकरेंनीच राज ठाकरेंचा छळ केला’

राम कदम यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. “राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली, त्यामागे उद्धव ठाकरे यांनी केलेला छळ हेच प्रमुख कारण होते,” असा दावा त्यांनी केला.

राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे

राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर राज्यातील पक्षांतराच्या राजकारणावरून आरोप-प्रत्यारोप अधिकच तीव्र झाले आहेत. एकीकडे महायुतीवर लोकप्रतिनिधी फोडल्याचा आरोप होत असताना, दुसरीकडे भाजपकडून पक्षांतराला जनतेची मान्यता असल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या वक्तव्यावरून हक्कभंगाचा मुद्दा पुढे येतो का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातमी वाचा…

राज ठाकरेंची अमित शहांवर टीका:म्हणाले- महाराष्ट्रातील फोडाफोडीच्या आणि घाणेरड्या राजकारणाला शहांचीच रणनीती जबाबदार

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यातील आणि देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर अत्यंत तीव्र आणि रोखठोक शब्दांत प्रहार केला आहे. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे राज्याची संस्कृती खराब होत असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत