Headlines

टीप द्या, अन्यथा राइड रद्द’ला केंद्राचा दणका;प्रवाशांकडून अप्रत्यक्षरीत्या टीप उकळण्याच्या प्रकारावर नियंत्रण


Mumbai Taxi:राइड पूर्ण होण्यापूर्वी टीप देण्यास प्रवृत्त करणारे कोणतेही फीचर, संदेश किंवा पर्याय ॲपवर नको, केंद्राने ॲग्रीगेटर कंपन्यांना निर्देश दिले .

राइड रद्द
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई : ॲपवर टॅक्सी बुक करताना ‘अॅडव्हान्स टीप द्या’, ‘टीप दिल्यास राइड लवकर मिळेल’, ‘टीप दिल्यास चालक राइड स्वीकारण्याची शक्यता वाढेल’ अशा स्वरूपाच्या सूचना देऊन प्रवाशांकडून टीप घेण्याचा प्रकार आता बंद करावा लागणार आहे. राइड पूर्ण होण्यापूर्वी प्रवाशांना टीप देण्यासाठी प्रवृत्त करणारे कोणतेही पर्याय, संदेश किंवा सुविधा ॲपवर दाखवू नयेत, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र टाइम्सने चालकांच्या वाढत्या मनमानीचा मुद्दा मांडला

महाराष्ट्र टाइम्सने ११ जूनच्या अंकात ‘टीप द्या, अन्यथा राइड रद्द!’ या मथळ्याखाली ॲपआधारित टॅक्सी सेवांमधील चालकांच्या वाढत्या मनमानीचा मुद्दा मांडला होता. राइड स्वीकारल्यानंतर काही मिनिटांत अतिरिक्त १०० ते १५० रुपयांची ‘टीप’ मागितली जात असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात आल्या होत्या. टीप न दिल्यास चालक राइड रद्द करणे किंवा प्रवाशाला दुसरी राइड शोधण्याची वेळ येणे, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

तातडीने आढावा घेण्याचे निर्देश दिले

केंद्राच्या ११ ऑगस्ट २०२६च्या निर्देशामुळे या प्रकाराला चाप बसण्याची शक्यता आहे. मोटार वाहन ॲग्रीगेटर मार्गदर्शक तत्त्वे, २०२५ मधील कलम १४.१५चा हवाला देत मंत्रालयाने सर्व ॲपआधारित वाहन सेवा कंपन्यांना त्यांच्या ॲप आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा तातडीने आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत.

राइड पूर्ण झाल्यानंतरच टीप

नियमांनुसार प्रवाशाला चालकाला स्वेच्छेने टीप देण्याची सुविधा ॲपवर देता येते. मात्र, ही सुविधा राइड पूर्ण झाल्यानंतरच दिसली पाहिजे. बुकिंगच्या वेळी, राइड सुरू होण्यापूर्वी किंवा राइड सुरू असताना टीप देण्याचा पर्याय उपलब्ध करून देता येणार नाही. तसेच टीप दिल्यामुळे राइड लवकर मिळेल, चालक राइड स्वीकारेल, चालकाचे वाटप होईल किंवा प्रतीक्षा कालावधी कमी होईल, असा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संदेशही देता येणार नाही.

‘टीप’च्या नावाखाली दबाव नको

‘अॅडव्हान्स टीप’, ‘चांगली राइड मिळण्यासाठी टीप द्या’, ‘टीप दिल्यास चालक राइड स्वीकारण्याची शक्यता अधिक’ अशा स्वरूपाचे पर्याय प्रवाशांवर अतिरिक्त पैसे देण्याचा दबाव निर्माण करतात. अशा प्रकारचे इंटरफेस किंवा सुविधा दिशाभूल करणारे अथवा प्रवाशाला अतिरिक्त रक्कम देण्यास प्रवृत्त करणारे असल्यास ते ग्राहक संरक्षण कायद्याच्या विरोधात ठरू शकतात, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Maharashtra TimesMaharashtra Rain alert: पाऊस पुन्हा राज्याला झोडपणार! कोकणात मुसळधार बरसणार, मुंबई-पुण्यात कशी असणार स्थिती? ताजा हवामान अंदाज

चालकाला पूर्ण टीप

प्रवाशाने राइड पूर्ण झाल्यानंतर दिलेली टीप ॲग्रीगेटरने कोणतीही कपात न करता चालकाला द्यावी लागणार आहे. म्हणजेच प्रवाशाने दिलेली संपूर्ण टीप चालकाच्या खात्यात जमा करणे बंधनकारक आहे.

कंपन्यांना तातडीने बदलांचे आदेश

केंद्रीय मंत्रालयाने सर्व मोटार वाहन ॲग्रीगेटरना त्यांच्या मोबाइल ॲप आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरील सुविधा तपासण्याचे निर्देश दिले आहेत. नियमांशी विसंगत असलेले कोणतेही इंटरफेस, संदेश किंवा कार्यपद्धती विलंब न करता बदलण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे राइड मिळवण्यासाठी प्रवाशांकडून अप्रत्यक्षरीत्या टीप उकळण्याच्या प्रकारावर आता कंपन्यांना नियंत्रण आणावे लागणार आहे.

Maharashtra TimesE Challan : वाहतूक नियम मोडल्याचं चालान आल्यास घाई करा, हरकतीस केवळ 45 दिवसांची मुदत, दुर्लक्ष केल्यास दंड अनिवार्य

‘टीप’ ऐच्छिकच; राइडची हमी नाही

प्रवाशाने टीप दिली किंवा नाही, याचा राइडच्या स्वीकारावर, चालकाच्या वाटपावर, प्रतीक्षा वेळेवर किंवा सेवेच्या गुणवत्तेवर कोणताही परिणाम होता कामा नये. टीप ही पूर्णपणे ऐच्छिक असून राइड पूर्ण झाल्यानंतरच तिचा पर्याय उपलब्ध असणे आवश्यक आहे.

महेश चेमटे

लेखकाबद्दलमहेश चेमटेमहाराष्ट्र टाइम्स मुंबई आवृत्तीमध्ये सिनियर डिजिटल कंटेंट क्रीएटर म्हणून कार्यरत. पायाभूत सुविधा, क्रीडा, वाहतूक संबंधित बातम्यांबाबत आवड. नामांकित वर्तमानपत्रात मुद्रित माध्यमांतील क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव.आणखी वाचा