सावंतवाडी वार्ताहर : सासोलीतील ‘ओरिजीन’ व्हिला प्रकल्पावरून सुरू झालेला वाद आता जिल्ह्यातील इतर प्रकल्पांपर्यंत पोहोचला आहे. माजी मंत्री जयंत पाटील यांनी विधिमंडळात सासोलीतील कथित बेकायदेशीर व्हिला प्रकल्प, ग्रामस्थांची फसवणूक आणि बेसुमार वृक्षतोडीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकातून ‘ओरिजीन’च्या विविध प्रकल्पांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. परुळेकर यांनी आपल्या पत्रकातून “ओरिजीनचा खरा सूत्रधार कोण?” असा थेट सवाल उपस्थित करत सासोलीपुरतेच नव्हे, तर दोडामार्ग तालुक्यातील पाट्ये आणि कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील प्रकल्पांचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे.
परुळेकर यांच्या म्हणण्यानुसार, सासोली येथे सामाईक जमिनीवर कथितरीत्या बेकायदेशीर कब्जा करून महसूल क्षेत्राबरोबरच लगतच्या वनक्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली. या प्रकरणात प्रकल्प मालकांना २० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी पत्रकात केला आहे. “सामाईक जमीनमालकांची मान्यता नसताना जमीन गिळंकृत करून मोठमोठे वृक्ष तोडण्याचे धाडस कंपनीकडे आले कुठून?” असा सवाल करत या संपूर्ण प्रकरणामागील सूत्रधार आणि पाठबळ देणाऱ्यांचा शोध घेण्याची मागणी त्यांनी केली आहे.
स्थानिक जमीन दलाल, सत्ताधारी पक्षातील काही पदाधिकारी तसेच महसूल आणि वन प्रशासनातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आर्थिक संगनमत असल्यामुळेच असे प्रकार घडत असल्याचा गंभीर आरोप परुळेकर यांनी केला आहे. या दोडामार्ग तालुक्यातील पाट्ये गावात तिलारी बॅकवॉटरलगत मोठ्या प्रमाणावर भूखंड विक्री आणि ‘सेकंड होम इन फॉरेस्ट’ प्रकल्प सुरू असल्याचे परुळेकर यांनी पत्रकात म्हटले आहे. जवळपास हजार ते दीड हजार एकर क्षेत्राचा उल्लेख करत या प्रकल्पाच्या जाहिराती गोव्यातील महामार्गालगत झळकत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
स्थानिक ग्रामस्थांच्या हिताचा आणि पर्यावरणाचा विचार न करता अशा प्रकल्पांना परवानगी कशी मिळते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथे २७५ व्हिलांचा प्रकल्प उभारला जात असल्याचा दावा परुळेकर यांनी केला आहे. हा प्रकल्प पिंगुळी येथील जिप पाझर तलावाच्या परिसरात असल्याने पर्यावरणाबरोबरच स्थानिक पाणीपुरवठ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पाझर तलाव परिसर हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरूचा पारंपरिक अधिवास असल्याचे नमूद करत, या भागातील जैवविविधतेवर मोठ्या बांधकामाचा परिणाम होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच या तलावावर पिंगुळीतील शेकडो घरांच्या नळपाणी योजनेचे अवलंबित्व असल्याने स्थानिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
“लेकसाईड व्हिला बांधण्याच्या नफेखोरीत ग्रामस्थांचे पिण्याचे पाणी आणि पर्यावरण धोक्यात आले आहे,” असा आरोप करत परुळेकर यांनी केवळ सासोली नव्हे, तर ‘ओरिजीन’च्या सर्व बांधकाम प्रकल्पांना तात्काळ स्थगिती देऊन सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. गेल्या दोन-अडीच वर्षांपासून सासोली ग्रामस्थ न्यायासाठी लढत असल्याचे सांगत, त्यांच्या संघर्षादरम्यान दहशत आणि बळजबरीला सामोरे जावे लागत असल्याचाही दावा त्यांनी पत्रकातून केला आहे.
