Headlines

एन. रघुरामन यांचा कॉलम:मुले एआयचा अतिवापर करत असल्यास पालकांना काय माहीत असले पाहिजे?




एक मूल त्याचा गृहपाठ एआय टूलवर अपलोड करते आणि म्हणते,‘हे उदाहरण सोडवून दे.’ कल्पना करा, लगेच उत्तर देण्याऐवजी ते टूल नम्रपणे म्हणते, ‘तुझा गृहपाठ लवकर संपवण्यासाठी थेट उत्तरावर जाण्यापेक्षा, हे उदाहरण कसे सोडवायचे ते आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया का?’ हे टूल विद्यार्थ्यांना शोधनिबंध तयार करण्यात मदत करू शकते, पण ते त्यांच्यासाठी संपूर्ण निबंध लिहून देणार नाही. एआयचा एखादा किशोरवयीन विद्यार्थी शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करत असेल, तर ‘रिस्पॉन्सिबल होमवर्क रिमाइंडर्स’ त्याला विषय समजून घेण्याच्या दिशेने वळवू शकतात. इतकेच नाही तर हे टूल विद्यार्थ्यांना एखाद्या विशिष्ट विषयातील आपली समज अधिक खोल करण्यास मदत करू शकते. या केवळ भविष्यातील कल्पना नाहीत. एआयने या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. म्हणजेच मुलांना फक्त गृहपाठ उरकून टाकण्यास मदत करण्याऐवजी त्यांना शिकण्याची प्रक्रिया शिकवणे. विद्यार्थी एआयला गृहपाठाचा सोपा शॉर्टकट मानू लागले आहेत. त्यांची ही सवय स्वतः एआयच बदलण्याचा प्रयत्न करत आहे. चॅटजीपीटीचा ‘स्टडी मोड’ थेट अंतिम उत्तर देण्याऐवजी विद्यार्थ्यांना एखाद्या प्रश्नावर विचार करण्यास प्रवृत्त करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देण्याऐवजी ते टूल विद्यार्थ्याला विचारू शकते, की त्याला आधीपासून काय माहीत आहे? तो कुठे अडकला आहे? आणि त्याला पुढच्या पायरीबद्दल स्वतः विचार करण्यास ते प्रोत्साहित करू शकते. हे टूल हळूहळू त्याला मूळ संकल्पना समजावून सांगू शकते, काही संकेत देऊ शकते. त्याची समज तपासू शकते आणि त्याला प्रश्नही विचारू शकते. शिक्षण क्षेत्रातील एआयच्या वापरातील हा एक अत्यंत महत्त्वाचा बदल आहे. मुले एआय वापरत आहेत. ही चिंतेची गोष्ट नाही. विषय समजून न घेता फक्त असाइनमेंट पूर्ण करण्यासाठी त्याचा वापर होतो, तेव्हा चिंता वाटते. ओपनएआयने विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग आणि सखोल समज वाढवण्यासाठी ‘स्टडी मोड’ सुरू केला आहे. विद्यार्थी आता समस्या टप्प्याटप्प्याने सोडवू शकतात, अभ्यासक्रमाबद्दल प्रश्न विचारू शकतात आणि एआयचा वापर केवळ ‘उत्तर देणारे यंत्र’ म्हणून न करता एक ‘शिक्षक’ (ट्यूटर) म्हणून करू शकतात. पालकांसाठी आणखी एक मनोरंजक बदल झाला आहे. ओपनएआयचे ‘पॅरेंटल कंट्रोल्स’ पालकांना किशोरवयीन मुलांचे अकाउंट लिंक करण्याची सुविधा देतात. प्रत्येक नवीन संभाषणासाठी “स्टडी मोड’ बाय डिफॉल्ट ठेवता येतो. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील एआय आता एका नवीन युगात प्रवेश करत आहे. ‘आपण मुलांना गृहपाठासाठी एआय वापरण्यापासून कसे रोखावे?’ हा प्रश्न आता उरलेला नाही. ‘मुले त्यांची विचार करण्याची क्षमता एआयच्या हवाली न करता त्याचा वापर कसा करू शकतील?’ हा खरा प्रश्न बनला आहे. हाच फरक ठरवेल की एआय मुलांसाठी शॉर्टकट बनेल की मार्गदर्शक शिक्षक. इन्स्टाग्राम आणि फेसबुकची मालक असलेली ‘मेटा’ कंपनी तरुणांच्या मानसिक संकटास कारणीभूत ठरत असल्याचे आरोप न्यायालयात झेलत असतानाच किशोरवयीन मुलांच्या शैक्षणिक अनुभवांबद्दल ओपनएआयची ही नवी निर्मिती समोर आली आहे. अमेरिकेतील चार राज्यांनी मेटाविरुद्ध खटला दाखल केला आहे. या आठवड्यात मंगळवारी सुरू झालेल्या सुनावणीत मेटाकडून 1.4 ट्रिलियन डॉलरपर्यंतच्या भरपाईची मागणी केली आहे. अर्थातच, मेटाने कोणतीही चुकीची गोष्ट केल्याचा इन्कार केला आहे. सोशल मीडियाची वैशिष्ट्ये आत्मघाती प्रवृत्ती आणि खाण्याशी संबंधित विकार (ईटिंग डिसऑर्डर) यांसारख्या मानसिक समस्या वाढवत आहेत, याचे पुरावे कायदेतज्ज्ञ आणि वकिलांनी गोळा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या मोठ्या कंपन्यांनी किशोरवयीन मुलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी अनेक बदल केले आहेत. एखादा तरुण दीर्घकाळ एआयशी चॅट करत असल्याचे सिस्टीमच्या लक्षात आले, तर ते त्याला ब्रेक घेण्याची आठवण करून देते. अकाउंटशी जोडलेल्या जन्मतारखेवरून युजरचे वय 13 ते 17 वर्षे असल्याचे समजल्यास त्याचा अनुभव आपोआप बदलतो. पण एखाद्याने चुकीचे वय टाकून 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या युजरचा अनुभव मिळवण्याचा प्रयत्न केला, तर ओपनएआयने आता ‘एज-प्रेडिक्शन मॉडेल’ (वय ओळखणारे मॉडेल) वापरण्यास सुरुवात केली आहे. हे मॉडेल सुमारे 2 हजार संकेतांवर आधारित आहे. त्यात चॅटचा विषय आणि वेळेचा समावेश आहे. फंडा असा की- इंटरनेटच्या या डिजिटल जगात किशोरवयीनांना एआयपासून पूर्ण दूर ठेवणे कठीण आहे. परंतु विषय न समजता गृहपाठ पूर्ण करण्यासाठी एआयचा शॉर्टकट म्हणून वापर न करण्याबाबत आपण त्यांना परावृत्त करू शकतो.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत