![]()
इंटरनेटवर ‘डू इंडियन्स लॅक सिव्हिक-सेन्स’ (भारतीयांमध्ये नागरी जाणिवांचा अभाव आहे का?) असे शोधून पाहा. तुम्ही थक्क व्हाल. अशा चुका/ साहित्यांची तिथे रेलचेल आहे. यात लोक आपल्या नागरी भानाच्या अभावाची खंत व्यक्त करताना दिसतात. गोष्ट फक्त रस्ते, पर्यटन स्थळे आणि थंड हवेच्या ठिकाणांवर कचरा फेकण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. जगातील प्रमुख पर्यटन स्थळे जसे की बुर्ज खलिफा, आयफेल टॉवर किंवा व्हिएतनामची ‘ट्रेन-स्ट्रीट’, येथे जाऊन भारतीयांनी नाचणे, ट्रेनमध्ये घाण करणे, रांग मोडणे आणि गरजूंसाठी असलेल्या सुविधांचा गैरवापर करणे, अशा तक्रारी आता सर्रास ऐकू येऊ लागल्या आहेत. एक भारतीय म्हणून हे सर्व बघणे आणि वाचणे लाजीरवाणे वाटते. यामुळे परदेशात आपली प्रतिमा मलिन होते. विदेशी हॉटेल्समध्ये भारतीयांना वागणुकीबद्दल विशेष सूचना दिल्या जाऊ लागल्या आहेत. आपण इतरांच्या हिताबाबत किती उदासीन आहोत, याचे भारतीय रस्ते हे एक उत्तम उदाहरण आहे. नागरी भानाची व्याख्याच मुळात अशी आहे की, माणसाने असे वागले पाहिजे ज्यातून त्याला जाणीव होईल की सार्वजनिक ठिकाणे आणि व्यवस्था कुण्या एकट्यासाठी नाहीत, तर ती सर्वांसाठी आहेत. एक समाज म्हणून आपण असा विचार का करतो की, आपल्याला जे काही मिळू शकते ते आपण हिसकावून किंवा ओरबाडून घेतले पाहिजे? मग बाकीच्यांचे काहीही होवो. कदाचित हे अशा एका कठोर वातावरणात जगण्याचा परिणाम आहे, जिथे संसाधने मर्यादित आहेत आणि नियम फारसे गांभीर्याने घेतले जात नाहीत. जिथे फक्त ताकदवानांचेच चालते आणि प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्याच जीवावर राहिले पाहिजे, असे गृहीत धरले गेले आहे. रस्त्यांवर कचरा फेकणे, ट्रॅफिक सिग्नल तोडणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मोबाइलवर मोठ्या आवाजात बोलणे, व्हिडिओ पाहणे, रात्री उशिरापर्यंत मोठ्या आवाजात गाणी लावणे, रांग मोडणे, बेकायदेशीर पार्किंग करणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे : या गोष्टी ओळखीच्या वाटतात का? मला खात्री आहे की त्या नक्कीच ओळखीच्या वाटतील; कारण आपण आपल्या आजूबाजूला आयुष्यभर हेच सर्व पाहिले आहे. तरीही सर्वच भारतीयांमध्ये नागरी जाणिवेचा अभाव आहे असा सरसकट निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल. बहुसंख्य भारतीय असेही आहेत, जे खूप चांगले वागतात. परंतु, व्हायरल रीलच्या या काळात वाईट गोष्टी वारंवार पाहिल्या आणि शेअर केल्या जातात. त्यामुळे सर्वच जण असे आहेत, असा एक गैरसमज निर्माण होतो. हे कसे सुधारायचे? हे फक्त निकृष्ट शिक्षण आणि कडक नियमांच्या अभावाचे प्रकरण आहे का? एनसीईआरटीच्या पुस्तकांमधून मुलांना कचरा न पसरवण्याचे शिक्षण दिल्याने आणि युरोपच्या धर्तीवर ट्रॅफिकचे नियम मोडल्यास भक्कम दंड लावल्याने हे ठीक होईल का? दुर्दैवाने, यावरचा उपाय इतका सोपा नाही. टोकियो, सिंगापूर आणि सोल यांसारखी शहरे काही दशकांपूर्वी अशाच समस्यांशी झुंजत होती. त्यांनी हे कसे सुधारले, हे जाणून घेण्यासाठी आधी हे समजून घेणे आवश्यक आहे की नागरी भानाचा ऱ्हास कसा होतो. साधारणपणे याच्या चार अवस्था असतात. पहिली- पायाभूत सुविधांचा अभाव. दुसरी- नियमांमधील शिथिलता. तिसरी- अतिशय दाट लोकवस्ती असलेले शहरी भाग; जिथे व्यवस्थेवर गरजेपेक्षा जास्त ताण पडतो. आणि चौथी- वेगाने होणारे शहरीकरण. यामुळे लोक सतत मोठ्या शहरांमध्ये येतात खरे; पण तिथे अंगीकाराव्या लागणाऱ्या वागणुकीची आणि नियमांची त्यांना समज नसते. भारतात लाल सिग्नल तोडणाऱ्यांपैकी किती जणांना दंड आकारला जातो? कॅमेऱ्यांच्या मदतीने हे केले जाऊ शकते आणि यातून सरकारला महसूलही मिळेल. कचरा फेकणाऱ्यांपैकी किती जणांकडून भरपाई वसूल केली जाते? भरपाईची रक्कम भलेही कमी असू दे; पण तिची सक्ती असणे आवश्यक आहे. भारतातील सर्वात स्वच्छ शहर असलेल्या इंदूरकडून आपण शिकले पाहिजे. तिथे आता अशी परिस्थिती झाली आहे की, आपले शहर स्वच्छ ठेवणे ही नागरिकांसाठी अभिमानाची गोष्ट बनली आहे. इतर शहरेही असे करू शकतात. लक्षात ठेवा, जोपर्यंत देशातील नागरिकांमध्ये नागरी भान येत नाही आणि ते आपली सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवू शकत नाहीत, तोपर्यंत कोणताही देश विकसित म्हणवून घेऊ शकत नाही. आपल्याकडे तर उलट बेशिस्त आणि ‘जुगाड’ यांचे उदात्तीकरण केले जाते; पण हे काही विकासाचे मापदंड असू शकत नाहीत.(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) भारतात लाल सिग्नल तोडणाऱ्यांपैकी किती जणांना दंड आकारला जातो? कचरा टाकणाऱ्यांपैकी किती जणांकडून भरपाई वसूल केली जाते? दंड आणि भरपाईची रक्कम भलेही कमी असू दे; पण तिची सक्ती असणे आवश्यक आहे.
Source link
चेतन भगत यांचा कॉलम:नागरी जाणिवा सुधारल्याशिवाय आपण विकसित हाेऊ शकत नाही
