Headlines

Shivsena sanjay jadhav deleted post and omraje nimbalkar response on uddhav thackerays birthday; उद्धव ठाकरेंवरून शिंदेंच्या गोटात खळबळ; बंडू जाधवांनी पोस्ट डिलिट केली, पण ओमराजेंनी धाडस केलं


Uddhav Thackeray Birthday: उद्धव ठाकरेंच्या मुद्द्यावरून शिंदेंसोबत गेलेल्या खासदारांच्या मनात चलबिचल सुरू असल्याचं बोललं जाऊ लागलं आहे.

uddhav thackeray bandu jadhav
उद्धव ठाकरेंवरून शिंदेंच्या गोटात खळबळ; बंडू जाधवांनी पोस्ट डिलिट केली, पण ओमराजेंनी धाडस केलं(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
धनाजी चव्हाण, परभणी: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त परभणी जिल्ह्याचे खासदार संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना सकाळी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट टाकली होती. खासदार संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये काही दिवसांपूर्वीच प्रवेश केला होता. असे असले तरी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर केल्याने चर्चांना उधाण आलं होतं. प्रसार माध्यमांकडूनही याची दखल घेऊन बातम्या देखील प्रसारित करण्यात आल्या. या पोस्टवर उलट-सुलट प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर खासदार संजय जाधव यांनी काही तासांतच उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिलेली पोस्ट सोशल मीडियावरून हटवली आहे. मात्र त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदेंच्या शिवसेनेत गेलेले धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही उद्धव ठाकरे यांना सोशल मीडिया अकाऊंटवरून शुभेच्छा दिल्या आहेत.

परभणीचे खासदार संजय जाधव हे शिवसेनेचे एकनिष्ठ आणि कडवट शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. सामान्य शिवसैनिकापासून ते दोन टर्म आमदार आणि तिसऱ्या टर्मचे खासदार म्हणून ते कार्यरत आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत पहिली फूट पडली तेव्हा राज्यभरात मोठ्या प्रमाणावर शिवसेनेचे पदाधिकारी आणि आमदार, खासदार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. पण परभणी जिल्हा मात्र उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला होता. परभणी जिल्हा मुळातच शिवसेना आणि ठाकरे परिवाराचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळेच खासदार संजय जाधव व आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहणेच पसंत केले. पण काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या सहा खासदारांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यामध्ये परभणीचे खासदार संजय जाधव आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचाही समावेश होता.

खासदार संजय जाधव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये त्यांच्याविषयी उलट सुलट चर्चा देखील सुरू झाली. त्यानंतर खासदार संजय जाधव यांनी आपली बाजू मांडली. विकास कामांसाठी आणि जिल्ह्यातील विविध प्रश्न तडीस नेण्यासाठी मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यानंतर 20 कोटी रुपयांचा निधी मिळाल्यानंतर संपूर्ण जिल्हाभरात बॅनरबाजी देखील खासदार संजय जाधव यांच्याकडून करण्यात आली. या दरम्यान उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी परभणी जिल्हा दौरा केला होता. या दौऱ्यावेळी राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी खासदार संजय जाधव यांच्यावर कडाडून टीका केली होती. पत्र्याच्या घरात राहणाऱ्या खासदार संजय जाधव यांच्याकडे तब्बल दोन हजार कोटी रुपयांची मालमत्ता कुठून आली? असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला होता. पण आज उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार संजय जाधव यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देणारी पोस्ट आपल्या सोशल मीडियावर शेअर केली.

खासदार संजय जाधव यांच्या पोस्टची परभणी जिल्ह्यासह राज्यभरामध्ये चर्चा झाली. संजय जाधव यांनी टाकलेल्या या पोस्टची दखल प्रसारमाध्यमांनी देखील घेतली. यावर प्रतिक्रिया देताना कडवट शिवसैनिक म्हणत होते की, तुम्ही दिल्या घरी सुखी राहा, उद्धव ठाकरे सोबत तुम्ही गद्दारी केली आहे आणि आता त्यांच्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा का टाकत आहेत? असा सवाल विचारला जात होता. तर खासदार संजय जाधव यांचे समर्थक म्हणत होते की, “खासदार संजय जाधव हे वारकरी आहेत त्यामुळे ते सर्वांचा आदर करतात. किती जरी कडवटपणा दुसऱ्याकडे असला तरी खासदार संजय जाधव हे सर्वांसोबत चांगले वागतात,” अशा देखील पोस्ट टाकण्यात आल्या.

उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त शेअर केलेल्या पोस्टने राजकीय गदारोळ तयार झाल्यानंतर खासदार संजय जाधव यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही पोस्ट डिलिट केली. ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाले आहेत की काय आणि त्याच दबावातून तर जाधव यांनी पोस्ट डिलिट तर केली नाही ना, असा प्रश्न देखील आता उपस्थित केला जात आहे.