Headlines

अखेर स्फोट झालेल्या चिनी रॉकेटचा शेवटचा व्हिडिओ समोर, 2050 पर्यंत ड्रॅगनचं अंतराळ क्षेत्रात ‘किंग’ बनण्याचं स्वप्न भंगलं!


चीनच्या अंतराळ मोहिमेतील एका मोठ्या अपयशाचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ ‘रॉयटर्स’ने प्रसिद्ध केला आहे. चायनासॅट-४B हा सॅटेलाईटला घेऊन अंतराळात झेपावलेल्या Long March 7A या रॉकेटचा उड्डाणानंतर अवघ्या काही सेकंदांतच हवेत भीषण स्फोट झाला. हेनान प्रांतातील वेंचांग अंतराळ केंद्रावरून रॉकेटने उड्डाण करताच तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडला. याविषयी पुढे विस्ताराने जाणून घेऊया.

Lava Smart 4 Launched In India। Maharashtra Times (2)
सौजन्य: रॉयटर्स
वेंचांग स्पेस लॉन्च साईटवरून रॉकेट झेपावल्यानंतर काही वेळातच त्यात मोठा स्फोट होऊन आगीचा गोळा तयार झाला. हा थरारक व्हिडिओ ‘रॉयटर्स’ या आघाडीच्या वृत्तसंस्थेनं प्रसिद्ध केला आहे. हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून, यामुळे चीनच्या अंतराळ तंत्रज्ञानावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या भीषण अपघातात कोट्यवधी रुपयांचा चायनासॅट-4B हा सॅटेलाइट पूर्णपणे नष्ट झाला असून चिनी वैज्ञानिक यामागच्या कारणांचा शोध घेत आहेत.

चीनच्या हेनान या दक्षिण बेटावरील प्रांतात असलेल्या ‘वेंचांग स्पेस लॉन्च साईट’वरून सोमवारी ChinaSat-4B हा सॅटेलाईट घेऊन जाणाऱ्या Long March 7A रॉकेटचे उड्डाण तांत्रिक बिघाडामुळे (In-flight Anomaly) अपयशी ठरल्याचे चीनने घोषित केले आहे.

रॉकेटचे उड्डाण कधी झाले?

चिनी वेळेनुसार रात्री 8:02 वाजता या रॉकेटने उड्डाण केले होते, अशी माहिती ‘शिन्हुआ’ या सरकारी वृत्तसंस्थेने दिली आहे. तसेच ही मोहीम अयशस्वी झाली असून, या अपघाताच्या नेमक्या कारणांचे विश्लेषण आणि चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी पुढे नमूद केले आहे. दरम्यान, या स्फोटाचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

या थरारक आणि भीतीदायक स्फोटाचा व्हिडिओ आता जगभरात समोर आला असून तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये रॉकेट अचानक आपला मार्ग भरकटताना आणि अवकाशातच जळून खाक होताना स्पष्ट दिसत आहे. या स्फोटामुळे रॉकेटचा आणि त्यावरील मौल्यवान सॅटेलाईटचा संपूर्ण ढिगारा दक्षिण चीन समुद्रात कोसळला. सुदैवाने हा अपघात समुद्राच्या वर झाल्यामुळे जमिनीवर कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या दुर्घटनेमुळे चीनच्या अंतराळ तंत्रज्ञानाच्या सुरक्षिततेवर आणि विश्वासार्हतेवर आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

चीनच्या स्पेस प्रोग्रामवर काय होणार परिणाम?

चिनी राष्ट्राध्यक्ष शी चिनफिंग यांच्या 2050 पर्यंत चीनला अंतराळ क्षेत्रातील सर्वात मोठी शक्ती बनवण्याच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेला या अपघातामुळे मोठा ब्रेक लागला आहे. ‘चायनासॅट-4B’ हा सॅटेलाईट चीनच्या रेडिओ, टीव्ही आणि दळणवळण यंत्रणेला अधिक आधुनिक करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. या अपयशामुळे चीनचे कोट्यवधी डॉलर्सचे आर्थिक नुकसान तर झालेच आहे, सोबतीनेच चीनच्या आगामी इतर चंद्र मोहिमा आणि स्पेस स्टेशनशी संबंधित मोहिमांचे वेळापत्रक आता अनेक महिन्यांसाठी लांबणीवर पडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

खाजगी कंपन्यांच्या लाँचिंगला ब्रेक

या दुर्घटनेमुळे निर्माण झालेल्या हाय-अलर्टनंतर चीनच्या ‘ज्युक्वेन सॅटेलाईट लॉन्च स्टेशन’वरून मंगळवारी सकाळी होणारे ‘Zhuque-3’ या खाजगी रॉकेटचे बहुप्रतीक्षित उड्डाण देखील लांबणीवर टाकण्यात आले आहे. (REF.)

शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी जवळपास 6 वर्षांपासून मराठी माध्यमांमध्ये काम करतोय. आकाशवाणी (छत्रपती संभाजीनगर) पासून माध्यम क्षेत्रात कामाला सुरुवात केली. एका मुखपत्रासह मुंबईतील नामांकित मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली. शुभमला राजधानी दिल्लीतही बातमीवर संस्कार करण्याची संधी मिळाली. राजकारण, व्यापार-उद्योग, क्रीडा, तंत्रज्ञान, ऑटो या विषयावर लिहायला त्याला आवडतं. निसर्गाच्या सानिध्यात बसायला, फावल्या वेळेत चित्रपट, वेब सिरीज पाहाण्याचा शुभमचा छंद आहे.आणखी वाचा