Shaktipeeth Highway Plan: शक्तीपीठ महामार्गाचा नवा आराखडा मंजूर झाला असला तरी या मार्गासाठी विरोध कायम आहे. कुठलीही गरज नसताना हा महामार्ग शेतकऱ्यांवर थोपवण्यात येत असल्याचा आरोप केला जात आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. खास प्रतिनिधी मुंबई: गेल्या काही काळापासून वादाचा मुद्दा राहिलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या आरेखनात पुन्हा बदल करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतून जाणारा हा मार्ग आता सातारा जिल्ह्यातूनही जाणार आहे. त्यामुळे ८०२ किलोमीटरच्या या मार्गाची लांबी आता ८५६ किलोमीटरवर गेली आहे.
शेतकऱ्यांकडून विरोधाची शक्यता
राज्य सरकारने जाहीर केलेल्या शासन निर्णयात सातारा जिल्ह्यातून हा मार्ग कोठून जाणार याविषयी मात्र स्पष्टता देण्यात आलेली नाही. मात्र, आता सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडूनही या महामार्गाला विरोध होऊ शकतो. याविषयीचा शासन निर्णय बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभागाने जारी केला.
नागपूर-गोवा शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग म्हणजेच महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्गाच्या आखणीला फेब्रुवारी २०२४मध्ये मान्यता देण्यात आली होती. या आखणीनुसार महामार्गासाठी महाराष्ट्र महामार्ग अधिनियम, १९५५नुसार भूसंपादन करण्याच्या अनुषंगाने प्रसिद्ध केलेली प्रारंभिक अधिसूचना कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भूदरगड, आजरा तालुक्यांतील मंजूर आखणीसाठी ऑक्टोबर २०२४ रोजीच्या अधिसूचनेन्वये रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर ऑगस्ट २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये पवनार ते सांगली दरम्यानची आखणी कायम ठेवण्यास मान्यता देऊन, उर्वरित आखणीचे उपलब्ध सर्व पर्याय व संभाव्य पर्याय महाराष्ट्र राज्य रस्ता विकास महामंडळाने तपासून सरकारला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
महामार्गाला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर, या मार्गात बदल करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यामुळे, सुधारित प्रस्तावानुसार, हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या १३ जिल्ह्यांतून, ४० तालुक्यांमधून जात आहे. त्यामुळे २१ धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत. महामार्गाची ही सुधारित आखणी अंतिम करण्याचा निर्णय अखेर बुधवारी राज्य सरकारने जाहीर केला.
कसा असेल नवा मार्ग?
मूळ मंजूर आखणीपैकी वर्धा, यवतमाळ, बीड व लातूर या जिल्ह्यांमधील आखणी कायम ठेवून नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील मूळ मंजूर आखणीमध्ये सुधारणा करून आणि सातारा जिल्ह्यामधील आखणीचा नव्याने अंतर्भूत करून, महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग दिग्रज (ता. जि. वर्धा) ते बांद्यापर्यंत (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) सुधारित आखणीस मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे आधी ८०२.५९२ किलोमीटर लांबीचा असलेल्या मार्ग आणखी लांब होऊन ८५६.७६५ किलोमीटर इतका होणार आहे.
‘कुठलीही गरज अथवा मागणी नसलेला हा महामार्ग शेतकऱ्यांवर थोपविण्यात येत आहे. कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी विरोध केल्याने काही तालुक्यांतून जाणारा मार्ग बदलण्यात आला. परंतु, ते होत नाही तोच आता सातारा जिल्ह्याचा समावेश या महामार्गात करण्यात आला असून, नेमका कुठून हा मार्ग जाणार याविषयीची स्पष्टता नाही. राज्य सरकारने याविषयी ठाम निर्णय घेऊन, तो रद्द करण्याचा निर्णय घ्यावा,’ अशी मागणी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी केली आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा