Headlines

फक्त 6 दिवस बाकी! LPG गॅसची e-KYC करण्यासाठी घाई करा; 23 ऑगस्टपूर्वी मोबाईलवर करा ‘फेस स्कॅन’। Maharashtra Times


घरगुती LPG गॅस ग्राहकांसाठी दिलासादायक वृत्त असून E-KYC ची मुदत वाढवण्यात आली आहे. आता ग्राहकांना गॅस एजन्सीच्या लांबलचक रांगेत उभे राहण्याची गरज नाही. ग्राहक केवळ आपल्या स्मार्टफोनच्या मदतीने ‘Aadhaar FaceRD’ आणि गॅस कंपन्यांच्या अधिकृत ॲप्सचा वापर करून घरबसल्या अवघ्या पाच मिनिटांत ही डिजिटल पडताळणी पूर्ण करू शकतात. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

LPG eKYC Before August 23 । Maharashtra Times
सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)
फसवणूक रोखण्यासाठी आणि थेट सबसिडीचा लाभ देण्यासाठी ऑइल कंपन्यांनी LPG KYC अनिवार्य केली असून, तांत्रिक अडचणींमुळे याला मुदतवाढ मिळाली आहे. विहित मुदतीत बायोमेट्रिक किंवा अत्याधुनिक फेसिअल रेकग्निशन तंत्रज्ञानाद्वारे ऑनलाईन KYC न केल्यास गॅस कनेक्शन निलंबित होऊ शकते किंवा ग्राहकांना व्यावसायिक दराने सिलिंडर खरेदी करावा लागू शकतो.

मुदत आता 23 ऑगस्ट 2026 पर्यंत

ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (OMCs) घरगुती गॅस सिलिंडरची Aadhaar-based e-KYC पूर्ण करण्यासाठी दिलेली मुदत काही भागांत वाढवली आहे. पूर्वी ही अंतिम मुदत 16 ऑगस्ट 2026 निश्चित करण्यात आली होती. परंतु, गॅस एजन्सींवर होणारी प्रचंड गर्दी आणि तांत्रिक अडचणी लक्षात घेता, ग्राहकांना डिजिटल पद्धतीने KYC पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त कालावधी देण्यात आला आहे. तमिळनाडू सारख्या राज्यांमध्ये ही मुदत आता 23 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

गॅस महागड्या बाजारभावाने खरेदी करावा लागू शकतो

तुम्ही विहित मुदतीत ही KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर तुमचे गॅस कनेक्शन तात्पुरते निलंबित केले जाऊ शकते किंवा तुम्हाला घरगुती गॅस सिलिंडर अनुदानित दराऐवजी थेट व्यावसायिक म्हणजेच महागड्या बाजारभावाने खरेदी करावा लागू शकतो, असा इशारा दिला आहे. ही KYC अनिवार्य करण्याचा सरकारचा मुख्य उद्देश गॅस सबसिडीमधील होणारी फसवणूक रोखणे आणि केवळ गरजू व्यक्तींपर्यंतच सरकारी अनुदानाचा (DBT) लाभ पोहोचवणे हा आहे.

मोबाईलवरून ऑनलाईन e-KYC करण्याची ‘टेक’ पद्धत

गॅस एजन्सीच्या लांबलचक रांगेत उभे राहण्याऐवजी ग्राहक घरबसल्या केवळ स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या मदतीने ‘फेसिअल रेकग्निशन’ तंत्रज्ञानाचा वापर करून ही प्रक्रिया अवघ्या 5 मिनिटांत पूर्ण करू शकतात. ही डिजिटल प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे.

1. आवश्यक ॲप्स डाऊनलोड करा

सर्वात आधी तुमच्या अँड्रॉइड मोबाईलमधील गुगल प्ले-स्टोरवरून युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे (UIDAI) अधिकृत ‘Aadhaar FaceRD’ हे ॲप डाऊनलोड करा. हे ॲप बॅकग्राउंडला सुरक्षित चेहरा स्कॅनिंगसाठी काम करते. त्यानंतर तुमच्या गॅस कंपनीचे अधिकृत ॲप्लिकेशनडाऊनलोड करा. (उदा. इंडेन ग्राहकांसाठी IndianOil ONE, भारत गॅससाठी Hello BPCL, आणि एचपी गॅससाठी HP Pay ॲप).

2. लॉग-इन, KYC पर्याय निवडा

तुमच्या गॅस कंपनीचे ॲप ओपन करून गॅस कनेक्शनशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरद्वारे लॉग-इन किंवा रजिस्टर करा. ॲपच्या मेनू किंवा प्रोफाईल सेक्शनमध्ये जाऊन ‘e-KYC’ किंवा ‘Aadhaar Link’ या पर्यायावर क्लिक करा.

3. फेस ऑथेंटिकेशन प्रक्रिया

स्क्रीनवर दिलेल्या अटी व शर्ती मान्य करून ‘Face Scan’ वर क्लिक करा. यावेळी मोबाईलचा फ्रंट कॅमेरा सुरू होईल. ज्या व्यक्तीच्या नावावर गॅस कनेक्शन आहे, त्यांचा चेहरा योग्य उजेडात कॅमेऱ्यासमोर धरावा. चेहरा पडताळणी यशस्वी होण्यासाठी कॅमेऱ्यासमोर डोळ्यांची उघडझाप (Blink) करणे आवश्यक आहे.

4. अंतिम सबमिशन

चेहऱ्याचे स्कॅनिंग यशस्वी झाल्यानंतर स्क्रीनवर ग्राहकाची संपूर्ण माहिती आणि आधार तपशील दिसून येईल. ती तपासून ‘Submit’ बटणावर क्लिक करताच तुमची ऑनलाईन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.

शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी जवळपास 6 वर्षांपासून मराठी माध्यमांमध्ये काम करतोय. आकाशवाणी (छत्रपती संभाजीनगर) पासून माध्यम क्षेत्रात कामाला सुरुवात केली. एका मुखपत्रासह मुंबईतील नामांकित मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली. शुभमला राजधानी दिल्लीतही बातमीवर संस्कार करण्याची संधी मिळाली. राजकारण, व्यापार-उद्योग, क्रीडा, तंत्रज्ञान, ऑटो या विषयावर लिहायला त्याला आवडतं. निसर्गाच्या सानिध्यात बसायला, फावल्या वेळेत चित्रपट, वेब सिरीज पाहाण्याचा शुभमचा छंद आहे.आणखी वाचा