Headlines

महापालिकेच्या दहा प्रकल्पांची धुरा आता एमएसआयडीसीकडे ; व्यवस्थापन शुल्काच्या आर्थिक भारामुळे महापालिकेने घेतला निर्णय


Nagpur MSIDC News: नागपूर महापालिकेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या जागांवर उभारण्यात येणार्‍या दाहा महत्त्वकांक्षी प्रकल्पांच्या कामाची जबाबदारी आता एमएसआयडीसीकडे सोपवण्यात येणार आहे. सामंजस्य कराराचा प्रस्ताव येत्या २० ऑगस्टला महापालिकेच्या सभेत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे.

नागपूर महापालिका
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी,नागपूर : यशवंत स्टेडियम विकास प्रकल्प, सक्करदरा बुधवार बाजार, इतवारी सराफा बाजार आणि मस्कासाथ बाजारातील लहान दुकानदारांच्या पुनर्व्यवस्थापनाचा प्रश्नही महत्त्वाचा आहे. या चार ठिकाणी एकूण २०४ ओटे असून, त्यावर लहान दुकानदार व्यवसाय करतात. प्रकल्पाचे काम सुरू असताना या दुकानदारांच्या तात्पुरत्या व्यवस्थापनाची जबाबदारीही एमएसआयडीसीकडे सोपविण्यात येणार आहे.

व्यवस्था कशी केली जाणार याकडे महापालिका सभेचे लक्ष

यशवंत स्टेडियम येथे ११५, मस्कासाथ बाजारात ३४ आणि इतवारी सराफा बाजारात ५५ जागा दुकानदारांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रकल्प उभारताना या दुकानदारांचे पुनर्वसन, तात्पुरती जागा आणि त्यानंतरची कायमस्वरूपी व्यवस्था कशी केली जाणार, याकडे महापालिका सभेचे लक्ष लागले आहे.

दहा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची जबाबदारीमहाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे

महापालिकेच्या मालकीच्या जागांवर उभारण्यात येणाऱ्या दहा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या बांधकामाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडे (एमएसआयडीसी) सोपविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यशवंत स्टेडियम, मस्कासाथ बाजार, सक्करदरा बुधवार बाजार, इतवारी सराफा बाजार, दही बाजार, डिक दवाखाना, कॉटन मार्केट, संत्रा मार्केट आणि नेताजी मार्केटसह दहा प्रकल्पांचा यात समावेश आहे. या कामासाठी प्रकल्पाच्या एकूण किमतीच्या पाच टक्के रक्कम प्रकल्प व्यवस्थापन शुल्क म्हणून एमएसआयडीसीला देण्यात येणार आहे.

सामंजस्य कराराचा प्रस्ताव २० ऑगस्टला होणार

यासंदर्भातील सामंजस्य कराराचा प्रस्ताव येत्या २० ऑगस्टला होणाऱ्या महापालिकेच्या सभेत मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहे. एमएसआयडीसीने महापालिकेच्या जागांवर व्यावसायिक प्रकल्प विकसित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. हे प्रकल्प ‘डिझाइन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट, सेल’ (डीबीएफओएस) या तत्त्वावर विकसित करण्यात येणार आहेत.

एकूण प्रकल्प खर्चाच्या पाच टक्के रक्कम एमएसआयडीसीला

राज्य शासनाकडून महापालिकेला मिळालेल्या जागा संबंधित प्रकल्पांसाठी ३० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर देण्यात येणार आहेत. प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी एमएसआयडीसीला एकूण प्रकल्प खर्चाच्या पाच टक्के रक्कम व्यवस्थापन शुल्क म्हणून देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

Maharashtra TimesBharat Gogawale: तटकरेंना काटशह, भरतशेठ अखेर रायगडचे पालकमंत्री; नाशिकसाठीचा सस्पेन्सही संपला!

सभेच्या मंजुरीनंतर कराराचा मार्ग मोकळा होणार

विशेष म्हणजे, एमएसआयडीसीसोबत सामंजस्य करार करण्याबाबत दोन वर्षांपूर्वी, म्हणजेच २०२४ मध्येच चर्चा झाली होती. मात्र, त्यानंतर हा प्रस्ताव रखडला. आता पुन्हा प्रशासनाने प्रक्रिया पुढे नेली असून, सभेच्या मंजुरीनंतर कराराचा मार्ग मोकळा होणार आहे.

महापालिकेवर अतिरिक्त आर्थिक भार

या प्रकल्पांमुळे महापालिकेवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. महापालिकेत मुख्य अभियंत्यांपासून अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंते अशी मोठी तांत्रिक यंत्रणा कार्यरत आहे. विविध प्रकल्पांची आखणी आणि बांधकामाची जबाबदारी सांभाळण्यासाठी महापालिकेकडे अनुभवी अधिकारी असतानाही दहा प्रकल्पांची जबाबदारी बाहेरील संस्थेकडे सोपविण्याच्या निर्णयामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

Maharashtra TimesLatur News : जलसुरक्षित सक्षम लातूर बनविणार;लातूरला मृदा व जलसंधारणाची घेतली शपथ, पालकमंत्र्यांनी केला संकल्प

एमएसआयडीसी ही तुलनेने अलीकडे अस्तित्वात आलेली संस्था

विशेष म्हणजे, एमएसआयडीसी ही तुलनेने अलीकडे अस्तित्वात आलेली संस्था आहे. त्यामुळे महापालिकेच्या तांत्रिक यंत्रणेवर विश्वास न ठेवता तिच्याकडे प्रकल्प सोपविण्याची गरज काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.आणखी वाचा