घरगुती LPG गॅस ग्राहकांसाठी दिलासादायक वृत्त असून E-KYC ची मुदत वाढवण्यात आली आहे. आता ग्राहकांना गॅस एजन्सीच्या लांबलचक रांगेत उभे राहण्याची गरज नाही. ग्राहक केवळ आपल्या स्मार्टफोनच्या मदतीने ‘Aadhaar FaceRD’ आणि गॅस कंपन्यांच्या अधिकृत ॲप्सचा वापर करून घरबसल्या अवघ्या पाच मिनिटांत ही डिजिटल पडताळणी पूर्ण करू शकतात. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

मुदत आता 23 ऑगस्ट 2026 पर्यंत
ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी (OMCs) घरगुती गॅस सिलिंडरची Aadhaar-based e-KYC पूर्ण करण्यासाठी दिलेली मुदत काही भागांत वाढवली आहे. पूर्वी ही अंतिम मुदत 16 ऑगस्ट 2026 निश्चित करण्यात आली होती. परंतु, गॅस एजन्सींवर होणारी प्रचंड गर्दी आणि तांत्रिक अडचणी लक्षात घेता, ग्राहकांना डिजिटल पद्धतीने KYC पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त कालावधी देण्यात आला आहे. तमिळनाडू सारख्या राज्यांमध्ये ही मुदत आता 23 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
गॅस महागड्या बाजारभावाने खरेदी करावा लागू शकतो
तुम्ही विहित मुदतीत ही KYC प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर तुमचे गॅस कनेक्शन तात्पुरते निलंबित केले जाऊ शकते किंवा तुम्हाला घरगुती गॅस सिलिंडर अनुदानित दराऐवजी थेट व्यावसायिक म्हणजेच महागड्या बाजारभावाने खरेदी करावा लागू शकतो, असा इशारा दिला आहे. ही KYC अनिवार्य करण्याचा सरकारचा मुख्य उद्देश गॅस सबसिडीमधील होणारी फसवणूक रोखणे आणि केवळ गरजू व्यक्तींपर्यंतच सरकारी अनुदानाचा (DBT) लाभ पोहोचवणे हा आहे.
मोबाईलवरून ऑनलाईन e-KYC करण्याची ‘टेक’ पद्धत
गॅस एजन्सीच्या लांबलचक रांगेत उभे राहण्याऐवजी ग्राहक घरबसल्या केवळ स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या मदतीने ‘फेसिअल रेकग्निशन’ तंत्रज्ञानाचा वापर करून ही प्रक्रिया अवघ्या 5 मिनिटांत पूर्ण करू शकतात. ही डिजिटल प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे.
1. आवश्यक ॲप्स डाऊनलोड करा
सर्वात आधी तुमच्या अँड्रॉइड मोबाईलमधील गुगल प्ले-स्टोरवरून युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे (UIDAI) अधिकृत ‘Aadhaar FaceRD’ हे ॲप डाऊनलोड करा. हे ॲप बॅकग्राउंडला सुरक्षित चेहरा स्कॅनिंगसाठी काम करते. त्यानंतर तुमच्या गॅस कंपनीचे अधिकृत ॲप्लिकेशनडाऊनलोड करा. (उदा. इंडेन ग्राहकांसाठी IndianOil ONE, भारत गॅससाठी Hello BPCL, आणि एचपी गॅससाठी HP Pay ॲप).
2. लॉग-इन, KYC पर्याय निवडा
तुमच्या गॅस कंपनीचे ॲप ओपन करून गॅस कनेक्शनशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरद्वारे लॉग-इन किंवा रजिस्टर करा. ॲपच्या मेनू किंवा प्रोफाईल सेक्शनमध्ये जाऊन ‘e-KYC’ किंवा ‘Aadhaar Link’ या पर्यायावर क्लिक करा.
3. फेस ऑथेंटिकेशन प्रक्रिया
स्क्रीनवर दिलेल्या अटी व शर्ती मान्य करून ‘Face Scan’ वर क्लिक करा. यावेळी मोबाईलचा फ्रंट कॅमेरा सुरू होईल. ज्या व्यक्तीच्या नावावर गॅस कनेक्शन आहे, त्यांचा चेहरा योग्य उजेडात कॅमेऱ्यासमोर धरावा. चेहरा पडताळणी यशस्वी होण्यासाठी कॅमेऱ्यासमोर डोळ्यांची उघडझाप (Blink) करणे आवश्यक आहे.
4. अंतिम सबमिशन
चेहऱ्याचे स्कॅनिंग यशस्वी झाल्यानंतर स्क्रीनवर ग्राहकाची संपूर्ण माहिती आणि आधार तपशील दिसून येईल. ती तपासून ‘Submit’ बटणावर क्लिक करताच तुमची ऑनलाईन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.

