Headlines

दाभा जि.प. शाळेत विद्यार्थ्यांसाठी अनोखा बँक प्रयोग:बचतीची सवय लागावी म्हणून एआय आधारित स्वयंचलित सॉफ्टवेअरचा वापर




अमरावती जिल्ह्यातील दाभा येथील ‘पीएम श्री’ सन्मानप्राप्त जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांमध्ये बचतीची सवय, आर्थिक शिस्त आणि साक्षरता निर्माण करण्याच्या उद्देशाने एक अनोखा प्रयोग करण्यात आला आहे. येथे ‘झेडपी दाभा स्मार्ट कीडस् बँक – स्टुडंटस् सेव्हिंग्ज् बँक’ स्थापन करण्यात आली असून, स्वातंत्र्यदिनी तिचा शुभारंभ करण्यात आला. या विद्यार्थी बचत बँकेचे उद्घाटन गावच्या प्रशासक अर्पिताताई वाठ यांच्या हस्ते झाले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष इमरान मिर्झा, इतर सदस्य, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तो उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले. या विद्यार्थी बचत बँकेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिचा दैनंदिन व्यवहार विद्यार्थ्यांमार्फतच चालविला जाणार आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बँकिंग व्यवस्थेचा अनुभव मिळावा, जबाबदारीची जाणीव व्हावी आणि नेतृत्वगुण विकसित व्हावेत, यासाठी विविध विद्यार्थी कर्मचारी पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. एआय आधारित स्वयंचलित सॉफ्टवेअरच्या माध्यमातून चालणारी ही राज्यातील पहिली विद्यार्थी बचत बँक असण्याची शक्यता आहे. बँक व्यवस्थापक म्हणून श्रुती गेडाम, मुख्य रोखपाल म्हणून मानवी बोरकर, खाते व्यवस्थापक म्हणून आर्यन श्रुंगारे, ग्राहक सेवा व प्रचार प्रतिनिधी म्हणून भूषण बारी आणि अंतर्गत लेखापरीक्षक म्हणून उजेब मिर्झा हे विद्यार्थी जबाबदारी पार पाडणार आहेत. व्यवहारात अधिकाधिक पारदर्शकता राहावी आणि विद्यार्थ्यांना स्वतःच्या बचतीची प्रत्यक्ष जाणीव व्हावी यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला आकर्षक पासबुक देण्यात आले आहे. या पासबुकमध्ये विद्यार्थ्याचे नाव, खाते क्रमांक, वर्ग, आसन क्रमांक, पालकांचे नाव, मोबाईल क्रमांक, आधीची शिल्लक, आताची शिल्लक तसेच रकमेच्या प्रत्येक व्यवहाराची नोंद केली जाणार आहे. त्यामुळे सॉफ्टवेअरमधील डिजिटल नोंद आणि विद्यार्थ्याच्या हातातील पासबुक या दोन्ही माध्यमांतून व्यवहाराची पडताळणी करता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून बँकेचा व्यवहार चालणार असला तरी, योग्य नियंत्रण, मार्गदर्शन व देखरेख राहावी यासाठी संचालक मंडळात विद्यार्थ्यांसोबत शिक्षक प्रतिनिधीही घेण्यात आले आहेत. याशिवाय, वर्ग १ ते ७ मधून आर्या पडूरकर, अन्वी जवंजाळ, विदेशा शिंदे, केतकी निमकर, अथर्व केवटकर, विहान नागुलकर आणि मयंक इंदूरकर यांची विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत