Headlines

Tukaram Mundhe led FDA raids Mumbai renowned Clubs MIG CCI suspends FSSAI License; कुठे झुरळं कुठे गंजलेली उपकरणं; MIG, CCI सह मुंबईतील नामांकित क्लबवर FDA चे छापे, परवाने निलंबित


Mumbai Clubs FDA Raid : तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वातील अन्न व औषध प्रशासनाने मुंबईतील सात क्लब कॅन्टीन आणि रेस्टॉरंटची तपासणी केल्यानंतर गंभीर त्रुटी आढळलेल्या पाच नामांकित क्लबचे अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचे परवाने तत्काळ निलंबित केले आहेत.

MIG CCI Club FDA Raid Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सोमवारी मुंबईतील सात क्लब कॅन्टीन आणि रेस्टॉरंटची तपासणी केल्यानंतर गंभीर त्रुटी आढळलेल्या पाच नामांकित क्लबचे अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचे (एफएसएसएआय) परवाने तत्काळ निलंबित केले आहेत. त्यात क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय), वांद्रे पूर्वेकडील एमआयजी क्रिकेट क्लब यांच्यासह आर. के. जुहू जिमखाना, अपर्णा जुहू जिमखाना आणि विलिंग्डन स्पोर्ट्स क्लब यांचा समावेश आहे.

विनापरवाना व्यवसाय करणाऱ्या गोरेगाव स्पोर्ट्स क्लबला व्यवसाय बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली असून, अन्य एका आस्थापनेला सुधारणा नोटीस देण्यात आली आहे.

क्रिकेट क्लब ऑफ इंडिया

येथील तपासणीत शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ तयार करण्याच्या जागा स्वतंत्र नसल्याचे दिसून आले. कचरा विल्हेवाटीच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर झुरळे होती. शीतगृहात साठवलेल्या अन्नावर साचलेले पाणी थेट पडत होते. स्वयंपाकघरात ओट्यावर झाडूचा वापर होत असल्याचेही दिसून आले. बुरशी लागलेल्या खराब भाज्या, अतिपिकलेले मशरूम साठवून ठेवण्यात आले होते. अन्नपदार्थांवर पुरेसे लेबलिंग नव्हते उपकरणे, फरशी आणि गटारांमध्ये ग्रीस, घाण, गाळ आणि साचलेले पाणीही आढळले.

अपर्णा जुहू जिमखाना

येथे स्वयंपाकाची उपकरणे गंजलेली होती. शिजवलेले आणि न शिजवलेले तसेच शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचे योग्य वर्गीकरण करण्यात आले नव्हते. पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे साहित्य ‘फूड ग्रेड’ म्हणून प्रमाणित नव्हते. आस्थापनेचे अंतर्गत किंवा बाह्य लेखापरीक्षणही झाले नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.

आर. के. जुहू जिमखाना

या ठिकाणी स्वच्छतेसंबंधी अनेक त्रुटी आढळल्या. कच्चा माल वापरण्यापूर्वी व्यवस्थित स्वच्छ करून तपासला जात नव्हता. तळण्यासाठी वापरलेल्या तेलाची आवश्यक नोंद ठेवली जात नव्हती. भिंती आणि छत ठिसूळ झाल्याने त्यांचे कण अन्नात पडण्याचा धोका होता. शिजवलेले अन्न आवश्यक तापमानात साठवले जात नव्हते. स्वयंपाकघरातील सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था सुस्थितीत नसल्याने कीटकांच्या प्रजननाचा धोका निर्माण झाला होता.
Maharashtra TimesKannan Gopinathan : प्रिय मोदीजी, आता राजीनामे स्वीकारतच आहात, तर माझंही resignation घ्या; काँग्रेस नेत्याचं चमत्कारिक ट्वीट

एमआयजी क्रिकेट क्लब

क्लबच्या परिसरात ‘नेबुला केटरिंग सर्व्हिसेस’ ही संस्था वैध एफएसएसएआय परवान्याविना केटरिंगचे काम करीत असल्याचे आढळले. खरेदी-विक्रीचे व्यवहारही या संस्थेच्या नावाने होत होते. स्वयंपाकघरात झुरळे आणि कोळ्यांची जाळी आढळली. क्लबने परवाना प्राधिकरणाला न कळवता आस्थापनेची जागा आणि व्यवस्थापन रचनेत बदल केल्याचेही तपासणीत आढळले.

MHT CET Scam Row: Viral Calls 12 ते 15 लाख देऊन Top Govt Engineering College मध्ये Admission ची हमी

विलिंग्डन स्पोर्ट्स क्लब

या ठिकाणी तापमान निरीक्षणाची व्यवस्था अपुरी होती. फरश्या निसरड्या आणि अस्वच्छ होत्या. अन्न आणि पाण्याच्या तपासणीचे अहवाल अद्ययावत नव्हते. अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेकडेही दुर्लक्ष होत असल्याचे आढळले.
Maharashtra TimesCrime News : पार्कमध्ये जीवघेणा हल्ला, 20 वर्षीय राधिका राजवाडेच्या डोळ्यासमोर साक्षात मृत्यू, मोबाईलवर टाईप करुन पोलिसांना आरोपीचं नाव सांगितलं

गोरेगाव स्पोर्ट्स क्लब

मालाड पश्चिम येथील या क्लबमध्ये तपासणी केली असता ही आस्थापना आवश्यक नोंदणी किंवा परवान्याशिवाय अन्न व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले. अन्न सुरक्षा व मानके नियमांतील विविध तरतुदींचे उल्लंघनही आढळल्याने क्लबला अन्न व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.