महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Success Story Kiran Kumar Lalithaa Jewelry: गरीब कुटुंबातून आलेल्या किरण कुमार यांनी आपल्या आईच्या चार सोन्याच्या बांगड्या विकून 11,250 कोटींचे ‘ललिता ज्वेलरी’ साम्राज्य उभे केले. कुमार यांनी एक तोट्यात असलेली ज्वेलरी कंपनीची मालकी मिळवून तिचे एका मोठ्या रिटेल चेनमध्ये रूपांतर केले.

लहान वयातच शाळा सोडली
अत्यंत गरिबीतून, संघर्षातून मार्ग काढत ललिता ज्वेलरीचे मालक किरण कुमार यांनी यशाला गवसणी घातली. आर्थिक संघर्षातून त्यांचा व्यावसायिक प्रवास सुरू झाला. आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथील एका आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबात जन्मलेले किरण कुमार आई-वडिलांचे आठवे अपत्य आहेत. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे किरण यांना लहान वयातच शाळा सोडून दागिन्यांच्या व्यवसायात उतरावे लागले.
घराची बिकट आर्थिक परिस्थिती
किरणचे वडील एका सराफाच्या दुकानात हिशेबनीस म्हणजे अकाउंटंट म्हणून काम करायचे पण, कुटुंबाचं पोट भरणं कठीण होतं. किरणने स्वतः बालपणीच्या अडचणींबद्दल सांगितले होते, की त्यांनी गरिबी जवळून पाहिली होती आणि कधीकधी लग्नाला जायलाही मित्राचा टी-शर्ट उसना घ्यावा लागायचा.
आईच्या बांगड्या विकून व्यवसाय सुरू केला
किरण यांनी आपली आणि घराची परिस्थिती बदलण्याचा निर्धार केला. किरणने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि त्यावेळी त्यांच्या आईच्या चार सोन्याच्या बांगड्या हेच एकमेव भांडवल होतं. वयाच्या 12 व्या वर्षी शाळा सोडल्यानंतर किरण दागिन्यांच्या व्यवसायात उतरले. काही वर्षांत त्यांना चांगली संधी दिसली. नेल्लोरमध्ये बनवलेले दागिने चेन्नई आणि हैदराबाद यांसारख्या मोठ्या बाजारांमध्ये पुरवले जायचे. इथूनच त्यांनी आपली उत्पादने थेट चेन्नईला विकण्याचा विचार सुचला. (प्रातिनिधिक फोटो)
सोन्याच्या बांगड्या विकल्या
वयाच्या 15 व्या वर्षी किरण यांनी चेन्नईमध्ये एक छोटा व्यापार सुरू करण्यासाठी आपल्या आईच्या चार सोन्याच्या बांगड्या विकल्या. त्यानंतर किरण एका सोनाराकडे गेला आणि त्याच्याकडून कानातल्या 6 जोड्या बनवून घेतल्या व खरेदीदाराच्या शोधात चेन्नईला पोहोचले. (प्रातिनिधिक फोटो)
पहिला खरेदीदार कोण
टी. नगर येथील ललिता ज्वेलरीमध्ये त्यांना पहिली मोठी संधी दिसली, जी नंतर त्यांनी विकत घेतली. एकदिवशी रात्री दुकान बंद होण्याच्या वेळी उशिरा ललिता ज्वेलर्सच्या दुकानात पोहोचले आणि दुकानाचे मालक, एम. एस. कंदस्वामी पिल्लई यांना भेटून नेल्लोरहून आणलेले दागिने दाखवले. दागिन्यांची गुणवत्ता तपासल्यानंतर पिल्लई यांनी सुरुवातीला 100 ग्रॅमची ऑर्डर दिली. हळूहळू मागणी वाढल्यामुळे 200 ग्रॅमपर्यंत ऑर्डर वाढवली. कुमार यांनी ललिता आणि आंध्र प्रदेशातील इतर घाऊक विक्रेत्यांना दागिन्यांचा पुरवठा करण्यास सुरुवात केली. (प्रातिनिधिक फोटो)
ऑर्डरवर ऑर्डर
जसजशा ऑर्डर्स वाढल्या, तसतसे किरण सरकारी बसनी नेल्लोर आणि चेन्नई दरम्यान वारंवार प्रवास करू लागले. कालांतराने घाऊक व्यवसायात लक्षणीय वाढ झाली आणि अखेरीस मोठ्या शोरूम्स आणि कॅनडा, लंडन, सिंगापूर व दुबईसारख्या आंतरराष्ट्रीय बाजारांना दागिन्यांचा पुरवठा करू लागले.
24 फेब्रुवारी 1999 रोजी त्यांच्या आयुष्यात आणखी एक महत्त्वाचं वळण आलं जेव्हा कंदस्वामी पिल्लई गंभीर आर्थिक अडचणींचा सामना करत होते आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले. व्यावसायिक संबंधातून किरणसोबत त्यांचे चांगले नाते निर्माण झाले आणि यामुळे किरण यांनी त्यांना मदतीचा हात पुढे केला. (प्रातिनिधिक फोटो)
मोठ्या दागिन्यांच्या चेन विकसित केली
1999 मध्ये किरण यांनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या ललिता ज्वेलरी व्यवसायाचा ताबा घेतला आणि त्यांचे कर्ज फेडले. किरण कुमार या ललिता ज्वेलरीचे संस्थापक नसले तरी, आता या दागिन्यांच्या कंपनीचे मालक आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत.
कंपनी ताब्यात घेऊन घाऊक विक्रीतून किरकोळ विक्रीकडे वळले. ग्राहकांच्या मूल्यावर आधारित कमी किमतीचे धोरण अवलंबले आणि कंपनीचा मोठ्या दागिन्यांच्या साखळीत विस्तार केला. आज ललिता ज्वेलरी मार्टचे मूल्य अंदाजे 11,250 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा आणि पुद्दुचेरी या राज्यांमधील 51 शहरांमध्ये ललिता ज्वेलरीची 61 दुकाने आहेत तर, यापैकी आंध्र प्रदेशात 23 दुकाने, 20 तामिळनाडूमध्ये, कर्नाटकात 7, तेलंगणात 10 आणि 1 पुद्दुचेरीत आहे.
