Mumbai Tourist returned from Nepal : अलका आणि राकेश या भावा-बहिणीने कैलास मानसरोवर यात्रेला एकत्र सुरुवात केली. मात्र अलका यांची प्रकृती बिघडल्याने त्या वरपर्यंत जाऊ शकल्या नव्हत्या. २६ ऑगस्टला नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे शक्य तितक्या लोकांना सुरक्षित जागी हलवण्यात आले, त्यात अलका आणि राकेश यांचा वेगवेगळा प्रवास सुरु झाला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : रविवारी मुंबई विमानतळाने अनोखे रक्षाबंधन अनुभवले. अलका कीर्तीरामन आणि राकेश मेहता या भावाबहिणीने कैलास मानसरोवर यात्रेला एकत्र सुरुवात केली. मात्र अलका यांची प्रकृती बिघडल्याने त्या वरपर्यंत जाऊ शकल्या नाहीत. त्यानंतर २६ ऑगस्टला नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे शक्य तितक्या लोकांना सुरक्षित जागी हलवण्यात आले. त्यात अलका आणि राकेश यांचा वेगवेगळा प्रवास सुरू झाला. या वेगवेगळ्या प्रवासाला रविवारी विमानतळावर पूर्णविराम मिळाला आणि अलका यांनी त्यांच्या बंधूंना राखी बांधून हा क्षण अनोख्या पद्धतीने साजरा केला.
कैलास दर्शनावेळी महापुराचा अंदाजही नव्हता
रविवारी नेपाळची राजधानी काठमांडूहून नेपाळ एअरवेज आणि इंडिगोच्या विमानांनी सुमारे ९६ यात्रेकरून मुंबईत परतले. यामध्ये कपोल सोशल ग्रुप आणि इशा फाऊंडेशनचे यात्रेकरू होते. यातील बहुसंख्य मुंबईतील असल्याचे सांगण्यात आले. हे यात्रेकरू २६ ऑगस्टला कैलास दर्शनानंतर खाली उतरले, तोवर त्यांना नेपाळमध्ये ओढवलेल्या महापुराच्या आपत्तीचा अंदाजही नव्हता. कपोल सोशल ग्रुपचे ९२ यात्रेकरू २७ ऑगस्टला तिमुरे चेकपोस्टवर पोहोचणार होते. मात्र परिस्थिती बदलल्यानंतर सहल व्यवस्थापकाने तातडीने निर्णय घेत, हिल्सा सीमेपर्यंत जाण्याचा निर्णय घेतला.
हिल्सा येथून हेलिकॉप्टरने सिमिकोट, तेथून लहान विमानाने नेपाळगंज आणि मग तिथून काठमांडूपर्यंत त्यांनी प्रवास केला. यासाठी प्रत्येकी ८० हजार रुपये अतिरिक्त खर्च करावे लागले. या काळामध्ये राज्य किंवा केंद्र सरकारने चौकशीही केली नसल्याचे त्यांनी सांगितले. याच गटातील वालिया कुटुंबीयांचे स्वागत करण्यासाठी त्यांचे कुटुंबीय, स्नेही डफली वाजवत विमानतळावर दाखल झाले होते. हार, पुष्पगुच्छ, मिठाई वाटून, ‘हर हर महादेव’चा घोष करत त्यांनी आनंद व्यक्त केला. परतीच्या प्रवासादरम्यान नेपाळमधील रस्त्यांची झालेली दुर्दशा पाहिल्यानंतर, आपण किती मोठ्या संकटातून बचावलो याची जाणीव झाल्याचे यशोदा वालिया यांनी सांगितले. आपले नातेवाईक सुरक्षित आहेत, याची माहिती विमानतळावर त्यांना न्यायला आलेल्या नातेवाईकांना होती. तरीही आपली व्यक्ती सुखरूप समोर दिसताच, त्यांना अश्रू आवरले नाही.
ईशा फाऊंडेशनचे काही यात्रेकरु परतले
दादरच्या २१ वर्षीय आनंदिता गोरे या ईशा फाऊंडेशनसोबत कैलास मानसरोवर यात्रेला गेलेल्या होत्या. त्यांचे आई-वडील विमानतळावर त्यांना न्यायला आले होते आणि आई-वडिलांना पाहता क्षणीच त्यांना अश्रू रोखता आले नाहीत. २६ ऑगस्टला आनंदिता यांनीच त्यांच्या आईना पूरस्थितीची माहिती देत, आपण सुरक्षित असल्याचे सांगितले. तेव्हापासून त्यांची आई सुमेधा गोरे लेकीची वाट पाहत होत्या. ईशा फाऊंडेशनसोबत या यात्रेसाठी गेलेल्या डॉ. सुनीता जैन यात्रा पूर्ण करून खाली उतरल्या, त्यानंतर त्यांना या सगळ्या घडामोडींची माहिती मिळाली. त्यावेळी फोनला रेंज मिळाल्याने, त्यांनी प्रथम घरी ख्यालीखुशाली कळवली. घरच्यांशी संपर्क झाल्याने एक चिंता मिटली होती. मात्र नंतर प्रवास कसा करायचा हा प्रश्न होता. तोही सुटल्याने त्या वेळेत मुंबईत परत आल्या. रस्त्यांची झालेली अवस्था, व्हिडीओंचा मारा, नातेवाईक, स्नेह्यांचे सातत्याने येणारे फोन, चौकशी या सगळ्याचा ताण या यात्रेकरूंवरही आला आहे.
नेपाळ पर्यटन बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, भारताचे एकूण १८३ पर्यटक बेपत्ता होते, त्यातील ८३ पर्यटकांबद्दल अजूनही माहिती मिळालेली नाही. ८५ जणांची सुटका करण्यात आली आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा