Maharashtra Politics : महाराष्ट्रात आमदार खासदारांच्या म्हणण्यानुसार संघटनेचे पदाधिकारी नेमू नका, उद्या एखादा आमदार खासदार गेला, तर त्याच्यासोबत पदाधिकारी जाता कामा नये, अशी विनंती आमदार नितीन देशमुख यांनी उद्धव ठाकरे यांना केली
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अकोला : एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये सर्वप्रथम केलेल्या बंडावेळी त्यांच्यासोबत निघालेले, मात्र सुरतच्या वाटेवरुन अर्ध्यातून परतलेले ठाकरेसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी सध्या सुरु असलेल्या ऑपरेशन टायगरच्या चर्चांवर भाष्य केले आहे. आमच्या पक्षाचे कोणतेही आमदार खासदार फुटणार नाहीत, असा विश्वास व्यक्त करतानाच “आमदार खासदारांच्या म्हणण्यांनुसार संघटनेचे पदाधिकारी करु नका” अशी विनंती त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केली.
‘शिंदेंच्या पोटात वेगळं, ओठात वेगळं’
“आमच्या पक्षाचे कोणतेही आमदार खासदार फुटणार नाहीत, यात शंका नाही. एकनाथ शिंदे यांच्या पोटात वेगळं आणि ओठात वेगळं असतं. त्यांचे आमदार-खासदारांना आमिष दाखवण्याचे प्रयत्न एकीकडे सुरु असतात, परंतु दुसरीकडे सांगतात असं की आम्ही काहीही केलं नाही. महापालिकेत त्यांचा एक नगरसेवक निवडून आला, त्यांनी लालसेपोटी चौघांना पक्षात घेतलं. बार्शीटाकळीचा एक मुस्लिम नगरसेवक त्यालाही पक्षात घेतलं. आताही त्यांचे प्रयत्न चालू असतात, पण यश येणार नाही” असं आमदार नितीन देशमुख ‘एबीपी माझा’शी बोलताना म्हणाले.
‘उद्धवजींच्या फोटोवर निवडून आलेत’
“ज्यावेळी सुरुवातीला आमदार खासदार फुटले, त्यांनी सांगितलं की आम्ही मोदींच्या फोटोवर निवडून आलो, भाजपसोबत युतीत लढलो होतो. मग, आता कुठे मोदींच्या फोटोवर निवडून आलेत? की शिंदेंच्या फोटोवर आलेत? हे सगळे आमदार खासदार उद्धवजी आणि महाविकास आघाडीच्या बॅनरखाली निवडून आलेत. बरेच जण तर शिंदेंच्या उमेदवारांच्या विरोधात जिंकलेत, त्यात नाशिक, यवतमाळचा समावेश आहे” याकडे देशमुखांनी लक्ष वेधलं. Milind Narvekar : उद्धवसेना फुटीच्या उंबरठ्यावर, ठाकरेंचे विश्वासू मिलिंद नार्वेकरांचे रात्री 10.50 वाजता बुचकळ्यात टाकणारे ट्वीट “जेव्हा शिवसेनेत फूट पडली होती, तेव्हा १३ खासदार शिंदेंसोबत गेले, सहा आमच्यासोबत उरले. त्या सहाचे आता नऊ झाले, पण त्या १३ चे ७ झाले. आमच्यासोबत १३ आमदार होते, त्याचे २० झाले. कमी नाही झाले, वाढले.” असंही नितीन देशमुख यांनी नमूद केलं.
पवनराजेंसह समद काझींसाठी लढाई, २० वर्षांच्या संघर्षावर ओमराजेंचं मोठं विधान
‘खासदारांच्या सांगण्यावरुन पदाधिकारी नेमू नका’
“माझी उद्धव ठाकरे यांना विनंती आहे, की महाराष्ट्रात आमदार खासदारांच्या म्हणण्यानुसार संघटनेचे पदाधिकारी नेमू नका, उद्या एखादा आमदार खासदार गेला, तर त्याच्यासोबत पदाधिकारी जाता कामा नये, संघटना वेगळी आणि लोकप्रतिनिधी वेगळा. जेव्हा संघटना पाठीशी राहणार नाही, तेव्हा एकही जण फुटणार नाही” अशी विनंती नितीन देशमुख यांनी उद्धव ठाकरेंना केली.
“माझ्याशी शिंदेसेनेतून कोणीही संपर्क केला नाही. खरं तर फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे. ते मशालीवर निवडून आलेत. विकासाच्या प्रश्नावर कुणी फुटण्याचा प्रश्नच नाही. महाराष्ट्रात मविआचे २०-२२ खासदार निवडून आलेत. खासदारांची कामं होत नाहीत, ही अफवा आहे.” असंही नितीन देशमुख यांनी स्पष्ट केलं.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा