Headlines

sakoli taluka amgaon khurd 43 yrs old woman injured in tiger attack son saved mother; आईसाठी मुलानं लावली जीवाची बाजी! वाघाच्या तावडीतून वाचवले प्राण, भंडाऱ्यातील थरारक घटना


Bhandara Tiger Attack: वाघ दिसताच त्याला ट्रॅन्क्विलाइज करून पकडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तरीदेखील वाघ अद्याप हाती लागत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

tiger attack
साकोली तालुक्यात पुन्हा वाघाचा हल्ला(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, भंडारा: आईवर झडप घालणाऱ्या वाघासमोर स्वतःचा जीव धोक्यात घालून मुलगा उभा राहिला. आरडाओरड करतानाच त्याने प्रतिकार केल्याने वाघाने माघार घेतली आणि आईचा जीव वाचला. साकोली तालुक्यातील आमगाव खुर्द येथे बुधवारी ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हल्लेखोर वाघाच्या दहशतीचे सावट आणखी गडद झाले आहे.

आमगाव खुर्द येथील रहिवासी छाया सुधाकर मुंगमोडे (वय ४३) या मुलगा तन्मय (वय १८) याच्यासोबत बुधवारी सकाळी साडेनऊ ते दहा वाजताच्या सुमारास गावालगतच्या जंगल परिसरातील शेतात तुरीचे पीक काढल्यानंतर तुराट्या संकलित करण्याचे काम करीत होत्या. याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक छाया यांच्यावर हल्ला चढविला. आईच्या किंकाळ्या ऐकताच तन्मयने क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. त्याने मोठ्याने आरडाओरड करत वाघाला हुसकावण्याचा प्रयत्न केला.

मुलाच्या या धाडसी प्रतिकारामुळे वाघाने घटनास्थळावरून पळ काढला आणि मोठा अनर्थ टळला. या हल्ल्यात छाया यांच्या गळ्याजवळ व डोक्याखाली गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी महिलेला तातडीने साकोली येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Maharashtra TimesPrashant Padole Accident : एअरपोर्टकडे जाताना भरधाव ट्रकची धडक, खासदार प्रशांत पडोळेंचा भीषण अपघात; वाहनाचा चक्काचूर
या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने वाघाला पकडण्यासाठी मोहीम तीव्र केली आहे. परिसरात पिंजरे लावण्यात आले असून शोध मोहीम सुरू आहे. ‘रेस्क्यू टीम’ तैनात करण्यात आली असून ड्रोन व तात्पुरत्या टॉवरच्या माध्यमातून वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.

बारा दिवसांतील तिसरी घटना
साकोली तालुक्यात गेल्या १२ दिवसांत वाघाच्या हल्ल्यांची मालिका सुरूच आहे. १९ मार्च रोजी बाम्पेवाडा येथे वसंता मेश्राम यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता, तर २८ मार्च रोजी उमरझरी येथे माया सोनवणे या महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. आता पुन्हा आमगाव खुर्द येथे झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Maharashtra TimesBhandara Tiger Attack: भंडाऱ्यात महिलेवर वाघाचा हल्ला; दहा फूट नेले फरफटत, संतप्त गावकऱ्यांनी जंगलात लावली आग
आंदोलनानंतरही प्रश्न कायम

वाघाच्या हल्ल्यांमुळे संतप्त गावकऱ्यांनी २८ मार्च रोजी साकोली-तिरोडा मार्ग रोखून आंदोलन केले होते. आठ दिवसांत वाघाला पकडण्यात यावे, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला होता. जंगलालगतच्या शेतांमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा