![]()
राज्यात निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुुरू असलेल्या मतदार यादींच्या विशेष सखोल पुनरिक्षणाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून ६३.६१ लाख मतदारांचा अद्यापही शोध लागलाच नाही. आता या मतदारांच्या शोधासाठी निवडणूक विभागाने राजकीय पक्षांना साकडे घातले आहे. राज्यात एकूण ९.७८ कोटी मतदार आहेत. त्यापैकी आजपर्यंत ७.६२ कोटी मतदारांचे म्हणजेच ७७.९७ टक्के मतदारांचे मतदारांचे गणना प्रपत्र भरून स्वाक्षरीसह प्राप्त झाले आहेत. दरम्यान, मतदारांच्या गृहभेटीनंतर १.८७ कोटी म्हणजे १९.१७ टक्के मतदार “गणना प्रपत्र जमा न होणे” या प्रवर्गात नोंदवण्यात आले आहेत. यामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरी गेल्यानंतर सापडू न शकलेले किंवा गैरहजर असलेल्या ६३.६१ हजार मतदारांचा समावेश असून तसेच कायमस्वरूपी स्थलांतरित ७१.७५ लाख मतदार तर मृत झालेेल्या ३३.९४ लाख मतदारांचा समावेश आहे. यासोबतच १६.६२ लाख मतदारांची अन्यत्र नोंदणी झाली आहे. एकूण ९.७८ कोटी मतदारांपैकी ९.५० कोटी म्हणजेच ९७.१४ टक्के मतदारांबाबतची कार्यवाही पूर्ण झाली आहे. उर्वरित २७.९८ लाख म्हणजे २,८६ टक्के मतदारांबाबतची मॅपींगची कार्यवाही अद्याप बाकी आहे. “गणना प्रपत्र जमा न होणे” या प्रवर्गातील मतदारांच्या नावांच्या याद्या संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून राजकीय पक्षांच्या मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींना उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकृत संकेतस्थळांवर या याद्या प्रसिद्ध करण्यात येत आहेत. ज्या मतदारांच्या वास्तवतेबाबत माहिती संबंधित बीएलओ यांना उपलब्ध करून दिली जाईल, त्यांची प्रत्यक्ष पडताळणी करून त्यांचे गणना प्रपत्र ता. १७ ऑगस्टपर्यंत भरून घेतले जाणार आहे. राज्यस्तरीय बैठकीत सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. मतदार यादीच्या या मोहिमेत पात्र मतदारांची नावे वगळली जाऊ नयेत यासाठी राजकीय पक्ष आणि नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.
Source link
राज्यात SIR मध्ये 63.61 लाख मतदारांचा शोध लागेना:71.95 लाख मतदार कायमस्वरुपी स्थलांतरीत, मतदारांच्या शोधासाठी राजकीय पक्षांना साकडे
