Panshet Bridge Closed to Traffic : ‘पानशेत येथील पूल धोकादायक झाला आहे. या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. पूल बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिल्याने हा पूल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे’, असं सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर यांनी म्हटलं आहे.

धोकादायक पूल कोसळून काही जणांचा मृत्यू
गेल्या वर्षी पावसाळ्यात मावळ तालुक्यातील कुंडमळ्याचा धोकादायक पूल कोसळून काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्या घटनेनंतर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन जिल्ह्यातील धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून ते पूल पाडण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग; तसेच जिल्हा परिषदांच्या अखत्यारित येणाऱ्या पुलांचे ऑडिट करण्यात आले. त्यानुसार, जिल्ह्यातील अनेक छोटे-मोठे पूल धोकादायक; तसेच दुरुस्तीसाठी असल्याचे आढळून आले. त्यानुसार धोकादायक पूल पाडण्यापूर्वी ते वाहतुकीस बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.
Ashadhi Ekadashi 2026 : विठूमाऊलीच्या भेटीसाठी वारकऱ्यांना प्रशासनाकडून मोठं गिफ्ट, मध्य रेल्वेच्या 54 विशेष गाड्या, कधीपासून अन् कोणत्या गाड्या सुरु होणार?
पूल ६८ वर्षांचा
पानशेत धरणातून विसर्ग बंद आहे. पूल बंद असल्याने वाहनचालक धोका पत्करून पुलाखालून सांडव्याच्या प्रवाहातून प्रवास करीत आहेत. धरणातून पाणी सोडल्यास हा प्रवास जीवघेणा ठरू शकतो. हा पूल ६८ वर्षांचा असून, तो धोकादायक झाल्याने बंद केला आहे. नवीन ७७ मीटर लांबीचा पूल बांधण्यासाठी प्रस्ताव ‘नाबार्ड’कडे पाठविला आहे. मात्र, बांधकाम पूर्ण होईपर्यंत पूल बंद राहणार आहे.
परिसरातील गावांसाठी महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग असल्याने पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिल्याशिवाय पूल बंद करू नये, अशी मागणी करण्यात आली आहे; तसेच ‘अवजड वाहने आणि माती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर निर्बंध घालावेत. स्थानिकांच्या वाहतुकीसाठी पूल सुरू ठेवावा,’ अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.
Pune Weather Forecast: पुण्यात दमदार पावसाची हजेरी, पुढील दोन दिवस आणखी जोर वाढणार, IMD कडून अलर्ट जारी
वाहतुकीवर परिणाम
पूल बंद झाल्याने पानशेत-वेल्हे भागातून लवासा-वरसगावकडे आणि पुण्याकडे जाणारी वाहने कुरण खुर्द, खानापूर, गोऱ्हे, खडकवासला धरणमार्गे कुडजे, मांडवी डावजे निळकंठेश्वर रस्ता मार्गे वळवण्यात आली आहेत. लवासा-वरसगाव धरणाकडून पानशेतकडे जाणारी वाहने निळकंठेश्वर रस्ता, डावजे, कुडजे – खडकवासला धरणमार्गे वळवण्यात आली आहेत. यामुळे सुमारे ९० किलोमीटरचा फेरा पडत आहे, याकडे नागरिकांनी लक्ष वेधले.
दृष्टिक्षेपात
बंद केलेला पूल ६८ वर्षे जूना
नवीन ७७ मीटर लांबीचा पूल बांधणार
पूल बांधण्यासाठी ‘नाबार्ड’कडे प्रस्ताव
२८ गावांच्या वाहतुकीचा प्रश्न निर्माण

