Headlines

Nepal Flood: आम्ही वाचू असं वाटत नाही! लेकरांची काळजी घ्या! नेपाळमधून अखेरचा कॉल; 29 जणांचं कुटुंब बेपत्ता


नेपाळमधील मृतांचा आकडा ६०० च्या पुढे गेला आहे. भारतातील अनेक जण नेपाळमध्ये पर्यटनासाठी नेपाळला गेले होते. त्यांच्याशी संपर्क होत नसल्यानं नातेवाईकांचा जीव टांगणीला लागला आहे.

bhopal family missing
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
काठमांडू: नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरात आतापर्यंत ६०० पेक्षा अधिक जणांचा जीव गेला आहे. अद्यापही ८०० ते १००० जण बेपत्ता असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. कैलास-मानसरोवर यात्रेला गेलेले अनेक भारतीय भाविक अद्यापही बेपत्ता आहेत. त्यांच्याशी संपर्क होत असल्यानं त्यांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक संपूर्ण कुटुंब नेपाळमध्ये बेपत्ता झालं आहे. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांची धडधड वाढली आहे.

भोपाळच्या कोलार परिसरात राहणारं संपूर्ण कुटुंब बेपत्ता झालं आहे. नातेवाईक त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सातत्यानं करत आहेत. मात्र अद्याप तरी त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. या कुटुंबात तब्बल २९ जण आहेत. या सगळ्यांचा ठावठिकाणा सापडत नसल्यानं नातेवाईक चिंतेत आहेत. नेपाळच्या रसुवा जिल्ह्यातील गोसाईकुंडा परिसरात ते फिरायला गेले होते.

बुधवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास या कुटुंबाशी अखेरचा संपर्क झाला होता. ‘पूर येत असल्याची सूचना आम्हाला देण्यात आली आहे. जीव वाचवण्यासाठी आम्ही डोंगराळ भागाकडे जात आहोत,’ अशी माहिती कुटुंबाकडून त्यावेळी देण्यात आली. यानंतर काही वेळानं त्यांनी पुन्हा कॉल केला. आम्ही एका घराच्या छतावर आश्रय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर कुटुंबातील कोणाशीच संपर्क झालेला नाही.

यानंतर गेल्या ७२ तासांत कुटुंबाशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे कुटुंबाच्या नातेवाईक देवकी अधिकारी चिंतेत आहेत. २९ जणांचं कुटुंब सुरक्षित असेल आणि लवकरच सुखरुप मायदेशी परतेल, अशी आशा देवकी यांना वाटते.

‘आम्ही ज्या बसनं आलो ती निघून गेली आहे. आता आम्ही कोणाच्या तरी घराच्या छतावर आहोत. हे घरं निम्मं बुडालेलं आहे. आम्ही वाचू शकणार नाही. मुलांची काळजी घ्या, हा आमचा त्या कुटुंबाशी झालेला अखेरचा संवाद आहे. त्यानंतर कॉल अचानक कट झाला. तेव्हापासून आमचा संपर्क होऊ शकलेला नाही,’ अशी माहिती देवकी अधिकारी यांनी दिली.

कोलार स्थित घरी आलेल्या एका व्यक्तीनं देवकी अधिकारी आमच्याच समाजाच्या असल्याचं सांगितलं. नेपाळमधील पुराच्या बातम्या आम्ही टीव्हीवर पाहिल्या. देवकी यांचे नातेवाईक बेपत्ता असल्याचं आम्हाला समजलं. त्यामुळे त्यांच्या भेटीसाठी आलो, असं अधिकारी यांच्या परिचितानं सांगितलं.