लखनौ : नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी महापुराचे भीषण पडसाद आता उत्तर प्रदेशातही उमटू लागले आहेत. नेपाळमधून वाहत येणाऱ्या गंडक नदीच्या पात्रात गेल्या दोन दिवसांत तब्बल 10 मृतदेह वाहून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील महाराजगंज आणि कुशीनगर जिल्ह्यांच्या हद्दीत हे मृतदेह आढळून आले असून, अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही.
नेपाळमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. सलग तिसऱ्या दिवशीही विविध भागांत शोध व बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. पुराच्या पाण्यामुळे अनेक भागांतील जनजीवन विस्कळीत झाले असून, मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, नेपाळमधील पुराचा प्रवाह गंडक नदीमार्गे उत्तर प्रदेशात पोहोचत असल्याने नदीच्या पाणीपातळीवरही परिणाम झाला आहे. याच पार्श्वभूमीवर नदीच्या पात्रात10 मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित मृतदेह ताब्यात घेऊन त्यांची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
नेपाळमधील या नैसर्गिक आपत्तीमध्ये आतापर्यंत मृतांचा आकडा 626 वर पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. बचाव पथकांकडून बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू असून, मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नेपाळमधील महापुराच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील गंडक नदीकाठच्या भागातही प्रशासनाकडून सतर्कता वाढविण्यात आली असून, नदीच्या पाणीपातळीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.
