Headlines

महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस कधी येणार? पंजाबराव डख यांचा नवा हवामान अंदाज


महाराष्ट्रात पुन्हा मोठा पाऊस यावा, अशी शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे. शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून राज्यात कुठे ऊन पडत आहे, तर कुठे ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे राज्यात आता पुन्हा चांगला पाऊस कधी येणार? असा प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी याबाबत महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे.

Maharashtra Rain
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये कडाक्याचं ऊन पडताना दिसत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत. अनेक शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये यंदा अपेक्षित पाऊस पडलेला नाही. एकीकडे एल-निनोचं संकट आणि दुसरीकडे वातावरणात होणारे बदल याचा मोठा परिणाम पावसावर पडताना दिसत आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये सुरुवातीला चांगला पाऊस पडला. पण नंतर पावसाने जी सुट्टी घेतली तेव्हापासून तो परत फिरकलाच नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढली आहे. राज्यात पुन्हा आता मोठा पाऊस कधी येईल? याबाबत हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी महत्त्वाचा अंदाज वर्तवला आहे.

“पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात 1 ते 2 सप्टेंबरच्या दरम्यान पावसाची शक्यता आहे. पण राज्यात सध्या तरी मोठ्या पावसाची शक्यता नाही”, असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. “दुसरीकडे विदर्भात 4 ते 6 सप्टेंबर या काळात पुन्हा एकदा पावसाची शक्यता आहे. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे”, असं पंजाबराव डख म्हणाले.

’12 सप्टेंबरनंतर राज्यात मोठा पाऊस येणार’

“राज्यात चांगला आणि सर्वदूर असा पडणारा पाऊस सध्या तरी नाही. 12 सप्टेंबर नंतर राज्यात पुन्हा पावसाचं वातावरण तयार होणार आहे. 12 सप्टेंबरनंतर राज्यात पावसाचं वातावरण तयार होऊन सर्वदूर पावसाची शक्यता आहे. सध्या तरी राज्यात असा मोठा पाऊस नाही. स्थानिक वातावरण तयार होऊनच मोठा पाऊस असणार आहे. राज्यात 31 ऑगस्टपर्यंत थोडाफार पाऊस असण्याची शक्यता आहे. पाऊस आला तर हा केवळ 10 ते 20 मिनिटे किंवा अर्धा तासाचा असण्याची शक्यता आहे. सर्वदूर पाऊस असणार नाही”, अशी माहिती पंजाबराव डख यांनी दिली.

4 ते 7 सप्टेंबर काळात कुठे-कुठे पाऊस पडणार?

“राज्यात 4 तारखेचा दरम्यान एक कमी दाबाचा पट्टा येणार आहे. त्यामुळे विदर्भात पाऊस पडेल. हा पाऊस विदर्भातून उत्तर महाराष्ट्रात जळगाव, नंदूरबार, धुळे, नाशिकच्या दिशेला येईल. या भागात पाऊस आल्यानंतर मराठवाड्यात परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, हिंगोली इकडे 5 ते 7 सप्टेंबरच्या दरम्यान रिमझिम पाऊस येईल”, असा अंदाज पंजाबराव यांनी वर्तवला.

‘4 सप्टेंबरपर्यंत तरी राज्यात मोठा पाऊस नाही’

“12 सप्टेंबरनंतर ओढे, नाले भरुन वाहतील इतका पाऊस राज्यात येईल. पण सध्या तरी सरीवर सरी राहतील. कोकणपट्टीत कोल्हापूरपासून ते पालघरपर्यंत घाटमाथ्यावर पाऊस चालूच राहणार आहे. पुण्यात थोड्याफार पावसाच्या सरी राहतील. जुन्नर, अकोले या भागात थोड्याफार पावसाच्या सरी राहतील. इगतपुरीकडे जोराचा पाऊस असणार आहे. असं असलं तरी राज्यात 4 सप्टेंबरपर्यंत मोठा पाऊस पडणार नाही”, अशीदेखील माहिती पंजाबराव डख यांनी दिली.