Headlines

Nashik Husband kills Second Wife Ashwini Hajare over minor dispute Crime News; दुसऱ्या बायकोचा जीव घेतला, आईला वाचवायला मध्ये पडलेल्या चिमुकल्यानेही प्राण गमावले, बापाचं टोकाचं पाऊल


Nashik Woman Murder Case : बाप आईला जीवे मारत असल्याचे बघून भेदरलेला चिमुकला मुलगा आईला वाचविण्यासाठी मध्ये पडला, बापाने त्याचाही निर्दयपणे जीव घेतला

Nashik Mother Son Murder Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, नाशिक : पत्नी आणि सात वर्षीय चिमुकल्याची धारदार शस्त्राने वार करून संशयित पतीने जीव देण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नाशिक जेलरोड येथे महारुद्र कॉलनी, वसंत विहार येथील अरिंगळे चाळीत हा प्रकार घडला. हे दुहेरी हत्याकांड सोमवारी सकाळी उघडकीस आले. संशयित पती आणि मयत विवाहितेचा हा दुसरा विवाह होता. बाप आईचा जीव घेत असताना मध्ये पडल्याने चिमुकल्यावरही जीव गमवण्याची पाळी आल्याची माहिती आहे.

अश्विनी किरण हजारे (वय ४३) आणि सात वर्षीय सुयंश किरण हजारे अशी हत्या झालेल्या मायलेकाची नावे आहेत. या घटनेनंतर पती किरण एकनाथ हजारे (वय ५४) याने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दार उघडल्याने हत्याकांड उघड

जेलरोडला सोमवारी सकाळी किरण हजारे याच्या घराचा दरवाजा उघडला गेल्याने ही दुहेरी हत्याकांडाची घटना उघडकीस आली. घरात अश्विनी आणि सुयंश या मायलेकाचे शव आढळले, तर विषारी औषध प्राशन केलेला किरण याला पोलिसांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.

किरण-अश्विनीचा दुसरा विवाह

किरणने आर्थिक विवंचनेतून ही हत्या केल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. रविवारी रात्री किरण हा पत्नी अश्विनी आणि मुलगा सुयंशसह सासुरवाडीला जेवणासाठी गेले होते. किरण आणि अश्विनी यांचा हा दुसरा विवाह होता. रात्री परतल्यावर तिघेही झोपी गेले. मात्र, किरणने पहाटे पत्नी अश्विनीची हत्या केली. त्यानंतर मुलाचाही जीव घेतला.

आईला वाचवताना मुलाचा मृत्यू

बाप आईला चाकूने मारत असल्याचे बघून भेदरलेला चिमकुला सुयंश आईला वाचविण्यासाठी मध्ये पडला असता, किरणने त्याच्या गळ्यावर चाकू फिरवला. या घटनेत अश्विनी आणि सुयंश यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर किरणनेही विषारी औषध सेवन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमागील आणखी काही कारण आहे का, याचा शोध पोलिस घेत आहेत. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.