Headlines

शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे वीज कंपनी नरमली!:नवीन ट्रान्सफार्मरसह रात्रीचा वीजपुरवठा सुरू करण्याचे लेखी आश्वासन




हिंगोली जिल्ह्यात सुरू असलेले अतिरिक्त भारनियमन तात्काळ बंद करावे, मौजे कलगाव व भांडेगाव येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी रात्रीची सिंगल फेज वीज उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ता. २१ विज कंपनीच्या कार्यकारी अभियंत्याच्या दालनात ठिय्या आंदोलन करताच प्रशासन चांगलेच नरमले. त्यानंतर लेखी आश्‍वासन देऊन नवीन ट्रान्सफार्मर देऊन रात्री सिंगलफेज विज पुरवठा सुरु करण्याचे लेखी आश्‍वासन देण्यात आले. हिंगोली जिल्हयात शेतकऱ्यांचे विजेचे प्रश्‍न गंभीर असून या प्रश्‍नाकडे विज कंपनीचे अधिकारी दुर्लक्ष करीत होते. या शिवाय सौर प्रकल्पाची कामेही पूर्ण केली जात नसल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली होती. रात्रीच्या वेळी होणाऱ्या भारनियमनामुळे शेतकरी व गावकरीही अडचणीत सापडले होते. तसेच हिंगोली तालुक्यातील कलगाव व भांडेगाव येथे रात्रीच्या विज पुरवठा नसल्याने गावकऱ्यांचे हाल होत होते. या प्रश्‍नावर क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, प्रवीण मते, रमेश जाधव, अशोक जयस्वाल, विशाल पौळ, रावसाहेब घुमनर, अशोक पौळ, भाऊराव पौळ, गजानन पौळ, दामोदर घुमनर, प्रभात पौळ, बबन पौळ, पवन पौळ यांनी आज विज कंपनीचे अधिक्षक अभियंता आर. एम. चव्हाण यांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरु केले. यावेळी कार्यकर्त्यांनी चव्हाण यांच्यावर प्रश्‍नांची सरबत्ती केली. मात्र कार्यकर्त्यांच्या रेट्यापुढे विज कंपनीचे अधिकारी नरमले. अधिकाऱ्यांनी कलगाव व भांडेगाव येथे नवीन ट्रान्सफार्मर बसवून विज पुरवठा सुरळीत केला जाईल तसेच रात्री सिंगलफेज विज पुरवठा सुरु ठेवण्याचे लेखी आश्‍वासन दिले. या आश्‍वासनानंतर दोन तासांनी ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. दरम्यान, अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानुसार वेळेत कार्यवाही झाली नाही, तर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने अधिक तीव्र स्वरूपाचे लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत