Headlines

Nandurbar horrific accident in navapur taluka couple parents meet a tragic death young boy left waiting; आई-वडील लेकाच्या भेटीसाठी निघाले, पण वाटेत भयंकर घडलं; अपघातात दोघांचाही मृत्यू


Nandurbar Accident: नंदुरबारमध्ये दुर्दैवी घटनेत आश्रम शाळेत शिकणाऱ्या मुलाला भेटायला निघालेल्या पती-पत्नी पिकअपच्या धडकेत जागीच ठार झाले. या अपघातात दोघांचाही मृत्यू झाल्याने मुलाला भेटण्याची त्यांची इच्छा अधुरी राहिली.

nandurbar accident
आई-वडील लेकाच्या भेटीसाठी निघाले, पण वाटेत भयंकर घडलं; अपघातात दोघांचाही मृत्यू(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
महेश पाटील, नंदुरबार: बाहेरगावी आश्रम शाळेत शिकणाऱ्या मुलाला भेटण्यासाठी आई वडील गावाहून निघाले. मात्र रस्त्यातच काळाने घाला घातला. पिकअपच्या धडकेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे या आई-वडिलांचे मुलाला भेटण्याची इच्छा अपूर्णच राहिली.

मिळालेल्या माहितीनुसार, नवापूर तालुक्यातील विसरवाडीजवळील आमलीपाडा येथील रहिवासी संदीप दासू गावित हे विसरवाडी येथील महापारेषण के. व्हि. केंद्रात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांचा मुलगा येवला येथील एका नामांकित आश्रम शाळेत इयत्ता सातवीत शिक्षण घेत आहे. संदीप दासू गावित (वय ३५) आणि त्यांच्या पत्नी आशा संदीप गावित (वय ३२) हे दाम्पत्य दुचाकीने ( क्र. एम. एच.39, ए. एफ.2840) येवला येथील शाळेत शिकणाऱ्या मुलाला भेटण्यासाठी जात होते. सटाणा ते ताराबाद दरम्यान असलेल्या ढोलबारे परिसरातून जात असताना पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात संदीप दासू गावित व आशा संदीप गावित या दोघांचाही जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच सटाणा पोलीस स्टेशनचे कर्मचारी निंबा खैरनार आणि गणेश गरुड यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. कल्पेश निकम व चंद्रकांत देवरे यांच्या रुग्णवाहिकेतून दोघांना सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

संदीप गावित हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. या घटनेची माहिती बाल अमराई आणि आमलीपाडा गावांत मिळताच परिसरात शोककळा पसरली आहे. नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या अपघाताप्रकरणी सटाणा पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करत आहेत. रात्री उशिरापर्यंत वाहनधारकाचा शोध सुरू होता.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा