महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींमध्ये सध्या जाहीर शिवीगाळ करण्याची स्पर्धाच लागली असावी, असे वातावरण आहे. एकेकाळी राजकारणातील सुसंस्कृतपणासाठी ओळखला जाणारा हाच का तो महाराष्ट्र, असा प्रश्न पडावा इतकी वाईट वेळ या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी आणली आहे. दोन दिवसांपूर्वी खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना केलेली जाहीर शिवगाळ, त्यांना दाखवून दिलेली त्यांची ‘लायकी’ ही महाराष्ट्राची लाज घालविणारी होती. अर्थात त्याआधी खासदार व पत्रकार संजय राऊत यांनी अनेकदा अशाच प्रकारे समाजमान्य नसलेल्या भाषेत पत्रकार परिषदा घेताना या प्रकाराचा प्रारंभ करण्याचा मान मिळविला आहेच. सध्या भाजपचे मंत्री असलेले नितेश राणे यांनी राऊत यांना कधी कधी त्याच भाषेत दिलेली प्रत्युत्तरे आपण सगळ्यांनी ऐकली आहेत. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनाही कधी अशीच भाषा वापरण्याची सुरसुरी येते. हे सगळे बघितल्यानंतर संताप येतोच, पण त्यापेक्षाही येते नैराश्य.
पत्रकारितेच्या माझ्या ३५ वर्षांहून अधिकच्या प्रवासामध्ये गेल्या पाच वर्षांतील ही बदललेली भाषा खरोखर त्रासदायक आहे. एकमेकांबद्दल किंवा माध्यमांबद्दल हे सर्व लोकप्रतिनिधी नक्की काय विचार करतात, त्यांना नामोहरम करण्यासाठी किती खालच्या पातळीवर उतरतात याची उदाहरणे उभ्या महाराष्ट्राची मान खाली घालायला लावणारी आहेत. देशामध्ये सर्वाधिक संत महाराष्ट्रात झाले. सर्व जातींमधील या महापुरुषांनी महाराष्ट्रात लोकजीवनाचा, समाजजीवनाचा पाया रचला. सार्वजनिकरीत्या शिवीगाळ, प्रतिस्पर्ध्यांच्या आयाबहिणींचा वाईट भाषेत उल्लेख, त्यांच्या कुटुंबियांबद्दल वाईट बोलणे या कशालाही महाराष्ट्रात कधीच समाजमान्यता नव्हती. अगदी आधुनिक काळात महात्मा फुले, लोकमान्य टिळक, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या कमालीच्या वेगवेगळ्या विचारसरणीच्या नेत्यांनी हा महाराष्ट्र घडविला. या परंपरेत अशी अनेक नावे घेता येतील. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर गेले शतक संपेपर्यंत एखादा अपवाद सोडल्यास महाराष्ट्राच्या राजकारणाची, समाजकारणाची भाषा ही सभ्य व संस्कारीच होती. जागतिकीकरणाने आपल्या समाजजीवनाला संपन्नेतेचे एक नवे परिमाण दिले. त्या पूर्वी जे उपलब्ध होते ते गोड मानून घेतले जाई. जागतिकीकरणानंतर मात्र खिशात पैसे असलेल्यांना दहा पर्याय उपलब्ध होऊ लागले. त्यातून पैसे मिळविण्याचे मार्गही सुकर झाले. सरस्वतीच्या उपासकांना लक्ष्मी प्रसन्न होऊ लागली. बहुधा यामधून कळत नकळत आपल्या समाजामध्ये एक प्रकारची मस्ती असलेली माणसे दिसू लागली. त्यांचे वर्तन बदलले, त्यांची भाषा बदलली. पैशाच्या जोरावर आपण कोणालाही विकत घेऊ शकतो ही भावना बळावली. सत्तेच्या जोरावर आपण कोणाचाही पाणउतारा करू शकतो ही वृत्ती सर्वत्र दिसू लागली. सहज बोलताना शिव्या देणाऱ्या माणसांना समाजात पूर्वी वेगळ्या नजरेने बघितले जायचे. बघता बघता या माणसांनाही प्रतिष्ठा मिळू लागली. इतकेच नव्हे तर शिव्या देऊन बोलणारी व्यक्ती ही ‘भारी’ आहे अशी समाजमान्यताच झाली.
ही भावना नेत्यांपर्यंत पोहोचली नसती तरच नवल. सहज आठवून बघा… बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा एखादा नेता आपल्या भाषणात एखादी शिवी जाहीरपणे द्यायचा. त्याला ‘ठाकरी शैली’ म्हटले जायचे; पण बाळासाहेबांचे महाराष्ट्राच्या उभारणीतील योगदान, मराठी माणसांसाठी त्यांनी केलेले काम या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना ते शोभायचेही. मराठी माणूस त्यांच्या या शिव्या देखील ओव्या म्हणून स्विकारायचा.
पण, बाळासाहेबांचे काम बाजूला ठेवून त्यांची ठाकरी शैली फक्त बोलण्यात आत्मसात करणारे आता नेते झाले आहेत. आयुष्यभर दरबारी राजकारण करून विरोधकांना किंवा आपल्याच पक्षातून बाहेर गेलेल्या सहकाऱ्यांना अतिशय हीन भाषेत हिणविणारेच बाळासाहेबांच्या पक्षाचा ‘आवाज’ झाले. त्यांनी बाळासाहेबांचे संघटन कौशल्य घेतले नाही, मराठी माणसासाठी काही करण्याची धडपड घेतली नाही; आम्ही ठाकरेंचे वारसदार असल्याने त्यांच्यासारखेच बोलणार असे सांगत त्यांनी सहजपणे त्या भाषेचा वापर सुरू केला. मग त्यांना त्याच भाषेत उत्तर देण्याची स्पर्धा सुरू झाली. सगळ्याच पक्षामध्ये बाकी काहीही कर्तृत्व नसलेल्या; परंतु अशा भाषेत उत्तरे देऊ शकणाऱ्यांना प्रतिष्ठा मिळू लागली. अशी भाषा वापरून बोलणे हेच आता योग्य असा निर्वाळाही मिळू लागला. या सगळ्यांचे कान जाहीरपणे उपटण्याचे धाडस त्यांच्या पक्षाच्या नेत्यांमध्येही राहिले नाही. आता तर हाच महाराष्ट्रातील राजकारणाचा शिष्टाचार होऊ लागला आहे.
दुसरीकडे माध्यमांतील स्पर्धाही टोकाला पोहचली आहे. या नेत्यांच्या अशा वक्तव्यांना भरपूर टीआरपी मिळत असल्याने मग दिवसातून अनेक वेळा ती दाखविली जाऊ लागली. या नेत्यांच्या दारात उभे राहणे हे या माध्यम प्रतिनिधींना अपरिहार्य वाटू लागले. कष्टाने एखादी बातमी मिळविण्यापेक्षा ‘ते असे म्हणाले, त्यावर तुम्हाला काय वाटते’ हे विचारणे सोप्पे असल्याचा साक्षात्कार त्यांना झाला. ‘वृत्तपत्रांच्या कागदातून करोनाचे विषाणू पसरतात’ अशा भाकड बातम्या देऊन आपली वेळ भरणारे मग अशा प्रकारे सहजपणे या नेत्यांमधील तू तू मै मै दाखवू लागले. काही पत्रकांरांनी एक पाऊल पुढे टाकून मिंधेपण स्वीकारताना आपल्या आयुष्याची ददात मिटवून टाकली. पत्रकारितेपेक्षा एखाद्या नेत्याचा जनसंपर्क अधिकारी होणे सोपे वाटू लागले. परिणामी नेत्यांसमोर उभे असलेले पत्रकार लाचार वाटू लागले. आपण यांना नोकरांसारखे वागवू शकतो असे नेत्यांनाही वाटू लागले. एकीकडे स्पर्धेचा दबाव आणि कमी होणारी संधी या कात्रीत सापडेलेले माध्यमकर्मी मग हा अपमान गिळू लागले. नेते दिवसेंदिवस अधिक मस्तवाल होऊ लागले. त्यातूनच मग संजय पाटील यांनी वापरलेली भाषा सहजपणे तोंडावर येऊ लागली. वाईट म्हणजे हे सगळे झाल्यावर ‘झाले ते वाईट झाले’ असे म्हणण्याऐवजी त्यांचे समर्थन करण्यासाठी त्यांच्या समर्थकांच्या फौजा मैदानात उतरू लागल्या. ‘राऊत रोज असेच बोलतात, त्यांना तुम्ही का जाब विचारत नाही’, हे विचारण्यापर्यंत या समर्थकांची मजल गेली. त्यानंतर अखेर संजय पाटील यांनी माफी मागणारा व्हिडीओ जारी केला.
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पंधरा-वीस वर्षात आणि विशेषतः २०१९नंतर झालेला हा वेगवान बदल आहे. त्याने महाराष्ट्राच्या राजकारणाचा पोत बदलला, सूर बदलला. लागणारा हा सूर बेसूर आहे, याची दखल घेण्याची गरज कोणालाच वाटू नये, हे खरे दुर्दैव. संजय पाटील यांचे वक्तव्य, त्यांची माफी हा विषय एक-दोन दिवसांत संपेलही. कदाचित त्यांना केंद्रीय मंत्रिपद लाभेल, अशीही चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी केले ते योग्यच होते, यावर जणू शिक्कामोर्तब होऊ शकते.
एकूणच या सगळ्याचा विचार करण्याची गरज आहे. आपण आपली भाषा कशा प्रकारे जिवंत ठेवणार आहोत, आपण आपले समाजजीवन किती चांगले व प्रवाही ठेवू इच्छितो आणि सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्राचे राजकारण गढूळ होऊ न देता परस्परविश्वास, सन्मान यावर चालणार की नाही, हा खरा प्रश्न आहे. याचा योग्य निर्णय आपण करू शकलो तर मग अशा शिवराळ नेत्यांना योग्य ती शिक्षा करणे सहज शक्य होईल; किंबहुना असे वर्तन करण्याचे धाडस संबंधितांना होणार नाही.
parag.karandikar@timesofindia.com

