Headlines

Nagpur Woman Assault and Murder Accuse detained via AI App Crime News; ६५ वर्षीय महिलेवर अत्याचार करुन जीव घेतला, 182 CCTV तपासले, चिप्सच्या रिकाम्या पाकिटाने नराधम सापडला


Nagpur Woman Assault Murder : पाटणसावंगीतील एका शेतात २८ जून रोजी ६५ वर्षीय महिलेची बॉडी आढळली होती. अत्याचार केल्यानंतर हाताने गळा आवळून तिचा खून झाल्याचे स्पष्ट झाले

Nagpur Woman Assault Murder Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : जिल्ह्यात गाजत असलेल्या महिलेवरील अत्याचार व खुनाच्या रहस्यमय ठरत असलेल्या प्रकरणाच्या तपासाला चिप्सच्या पाकिटावरून दिशा मिळाली. ग्रामीण पोलिसांनी ‘मार्व्हल’ या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या आधारे मारेकऱ्याला गजाआड केले. सुधाकर दादाराव मंडपे (वय ४८, रा. भन्साळी टाकळी, ता. सावनेर) असे अटकेतील मारेकऱ्याचे नाव आहे. मृत ६५ वर्षीय महिलेची ओळख अद्यापही पटलेली नाही.

सावनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाटणसावंगीतील एका शेतात २८ जून रोजी ६५ वर्षीय महिलेची बॉडी आढळली होती. या प्रकरणी सावनेर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. शवविच्छेदन अहवालात अत्याचार केल्यानंतर हाताने गळा आवळून तिचा खून झाल्याचे नमूद करण्यात आले. पोलिसांनी अत्याचार व खुनाचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला.

जिल्ह्यात हे प्रकरण चांगलेच गाजत असल्याने या रहस्यमय अत्याचार करून खून प्रकरणाचा छडा लावण्याचे आव्हान ग्रामीण पोलिसांसमोर उभे ठाकले. पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी अपर पोलिस अधीक्षक अनिल म्हस्के, उपविभागीय पोलिस अधिकारी सागर खर्डे यांना या हत्याकांडाचा छडा लावण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांसह विविध पथकांनी तपास सुरू केला.

चिप्सचे रिकामे पाकिट

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता परिसरात चिप्सचे रिकामे पाकिट आढळले. दारू पिऊन अत्याचार केल्यानंतर महिलेचा खून करण्यात आला असावा, या निष्कर्षापर्यंत पोलिस पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी पाटणसावंगीसह विविध ठिकाणी मृत महिला व मारेकऱ्याची ओळख पटविणे सुरू केले.

१८२ सीसीटीव्ही फुटेजची पाहणी

दहेगाव परिसरातील दुकानांमध्ये चिप्सचे पाकिट विकले जात असल्याचे कळताच पोलिसांनी या दुकानांमध्ये चौकशी केली. या परिसरातील १८२ सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. एका फुटेजमध्ये लाल रंगाचे शर्ट व टोपी घातलेला इसम आढळला. पोलिसांना त्याच्यावर संशय आला. परंतु, त्याचा चेहरा अस्पष्ट होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मारेकऱ्याचे त्यावेळेच दूरचे छायाचित्र काढले. मार्व्हलच्या मदतीने त्याचे संपूर्ण छायाचित्र तयार केले.

या छायाचित्राआधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मारेकऱ्याचा शोध सुरू केला. पोलिसांनी परिसरातील तब्बल ९० पेक्षा अधिक श्रमिक व नागरिकांना हे छायाचित्र दाखविले. एका नागरिकाने ओळख पटवली. मंडपे याची मुलगी बोखारातील श्रीकृष्णनगरमध्ये राहात असल्याची माहिती त्याने दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीकृष्णनगर भागातून मंडपे याला अटक करताच त्याने अत्याचार करून खून केल्याचे मान्य केले.

आरोपीला अत्याचाराची पार्श्वभूमी

पोलिसांनी सुधाकर मंडपे याचा गुन्हेगारी अभिलेख तपासला असता, २००५ मध्ये मंडपे त्याच्याविरूद्ध कळमेश्वर पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. याशिवाय २०१८ मध्ये त्याच्याविरुद्ध सावनेर पोलिसांनी विनयभंगाचाही गुन्हा दाखल केला होता. याच पोलिस स्टेशनमध्ये त्याच्याविरूद्ध आणखी एक गुन्हा दाखल असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी मंडपे याची पाच दिवस पोलिस कोठडी घेतली आहे. मृत महिला निराधार होती. ती सतत खापरखेडा व सावनेर परिसरात फिरायची. याचाच फायदा घेत मंडपेने बलात्कार करून तिचा खून केल्याचे समोर आले.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा