Nagarjuna Akkineni Personal Life : दाक्षिणात्य सुपरस्टार नागार्जुन त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असायचा. दुसऱ्या लग्नानंतर अभिनेत्याचं एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबत अफेअर होतं. पण, एका कारणामुळे त्यांचा ब्रेकअप झाला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता नागार्जुनचा आज वाढदिवस आहे. दाक्षिणात्य आणि बॉलिवूड इंडस्ट्रीत आपल्या अभिनयानं चाहत्यांची मनं जिंकणारा नागार्जुन त्यांच्या चित्रपटांमुळे तसेच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत होता. या अभिनेत्यानं दोनदा लग्न केलं असून, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री तब्बूसोबतचं त्याचं प्रेमप्रकरणही चर्चेचा विषय ठरलं होतं. ४० वर्षांपेक्षा अधिक काळ चित्रपटसृष्टीत काम करून नागार्जुननं प्रचंड संपत्ती कमावली आहे. त्याची गणना केवळ दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांमध्येच नाही, तर भारतातील सर्वाधिक श्रीमंत अभिनेत्यांमध्येही केली जाते. अक्षय कुमार आणि सलमान खानसारखे बॉलिवूड सुपरस्टारसुद्धा त्याच्या तुलनेत फिके पडतात.
नागार्जुनला अभिनयाचा वारसा त्याच्या वडिलांकडूनच मिळाला. नागार्जुनचे वडील नागेश्वर राव, हे तेलुगू चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेते होते. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत, नागार्जुननंही चित्रपटसृष्टीत काम केलं आणि तेलुगू सिनेमाचा सुपरस्टार बनला. नागार्जुननं वडिलांच्या चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणूनही काम केलं आहे. १९६१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वेलुगु नीडालू’ या सिनेमात नागार्जुनने पहिल्यांदा काम केलं. नागार्जुननं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेण्यासाठी अण्णा विद्यापीठात प्रवेश घेतला, परंतु शिक्षण अर्धवट सोडून त्यानं अभिनयाला आपलंसं केलं. या अभिनेत्यानं १९८६ मध्ये मुख्य अभिनेता म्हणून अभिनयात पदार्पण केलं. १९९० मध्ये ‘शिवा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या नागार्जुननं ‘खुदा गवाह’, ‘द्रोही’, ‘ब्रह्मास्त्र’, ‘अंगारे’, ‘मिस्टर बेचारा’, ‘एलओसी कारगिल’ आणि ‘जख्म’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
Miss World स्पर्धेत मानुषी छिल्लरने सादर केलेले डान्स Nakul Ghanekar याने केलेले कोरिओग्राफ
नागार्जुनची दोन लग्न
नागार्जुनने अभिनयात पदार्पण करण्यापूर्वीच लग्न करून संसार थाटला होता. त्याचं पहिलं लग्न १९८४ मध्ये अभिनेता व्यंकटेशची बहीण लक्ष्मीसोबत झालं होतं. मात्र, १९९० मध्ये या जोडप्याचा घटस्फोट झाला. नागार्जुन आणि लक्ष्मी यांना नागा चैतन्य नावाचा मुलगा झाला. लक्ष्मीला घटस्फोट दिल्यानंतर, नागार्जुननं १९९२ मध्ये अभिनेत्री अमला अक्किनेनीशी लग्न केलं. अमला आणि नागार्जुन यांनाही अखिल अक्किनेनी नावाचा मुलगा झाला. नागार्जुनची दोन्ही मुलं चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत.
नागार्जुननं १९९६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘निन्ने पेल्लाडाटा’ आणि १९९८ साली प्रदर्शित झालेल्या ‘आविडा मा आविडे’ या चित्रपटांमध्ये बॉलिवूड अभिनेत्री तब्बूसोबत काम केलं आहे. याच काळात तब्बू आणि नागार्जुन एकमेकांच्या जवळ आले आणि त्यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. जवळपास १० वर्षे ते रिलेशनशिपमध्ये होते. पण, नागार्जुन आपली पत्नी अमलाला घटस्फोट देऊन तिच्याशी लग्न करणार नाही, हे जेव्हा तब्बूला समजलं, तेव्हा ते वेगळे झाले.
नागार्जुननं प्रचंड प्रसिद्धी आणि प्रचंड संपत्ती मिळवली आहे. अभिनेत्याच्या घराची किंमत ४५ कोटी रुपये असून ते घर ४,००० चौरस फुटांवर पसरलेलं आहे. नागार्जुनच्या कार कलेक्शनबद्दल बोलायचं झाल्यास, या अभिनेत्याकडे बीएमडब्ल्यू ७ सिरीज, ऑडी ए७, पोर्श केयेन, बीएमडब्ल्यू एम६, डॅटसन २४०झेड यांसारख्या गाड्या आहेत. मनी कंट्रोलच्या रिपोर्टनुसार नागार्जुनची एकूण संपत्ती ३५७२ कोटी रुपये आहे. संपत्तीच्या बाबतीत त्यानं अक्षय कुमार आणि सलमान खान यांनाही मागे टाकलं आहे. अक्षयची एकूण संपत्ती २७ अब्ज असून सलमानची संपत्ती २९ अब्ज आहे. नागार्जुन एका चित्रपटासाठी २० ते ३० कोटींचं मानधन घेतो. सहाय्यक भूमिकांसाठी, सुपरस्टार १० कोटी रुपयांपर्यंत मानधन घेतो.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा