Headlines

Mumbai Manhole Death: बुडत्याचा जीव काडीमोल – mumbai man drowns after falling into manhole amid heavy rain


Mumbai Manhole Death: ​मॅनहोल उघडे आढळल्यास १२ ते २४ तासांत युद्धपातळीवर कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. तरीही आजघडीला साडेचार हजार मॅनहोल्स उघडीच आहेत.

mumbai manhole
बुडत्याचा जीव काडीमोल(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
विलंबाने दाखल झालेल्या पहिल्याच पावसाच्या तडाख्यात संपूर्ण महामुंबई समस्यांच्या गर्तेत बुडाली आहे. त्यात बुडत्या मुंबईकराचा जीव काडीमोल झाल्याचे चेंबूर, साकीनाका, मुंब्रा, डोंबिवली, नवी मुंबई अशा ठिकठिकाणच्या घटना दाखवून देतात. चेंबूरमध्ये वृक्ष उन्मळून पडला आणि ज्या आयुष्याला अंकुर फुटत होते, तेच मुळापासून उखडून टाकावे, असा भास झाला. या दुःखाचे व्रण ताजे असतानाच साकीनाका येथे एका कष्टकऱ्याचा रस्त्यावरील उघड्या मॅनहोलमध्ये पडून त्याचे अक्षरशः होत्याचे नव्हते होते.

तिकडे मुंब्रा, नवी मुंबई, डोंबिवलीत विजेच्या प्रवाहामुळे विद्यार्थिनींची होरपळ होते, तर अन्य दोघांचा जीव जातो. या सर्व घटना या केवळ मानवी निष्काळजीचे बळी आहेत. ऑगस्ट २०१७ मध्ये प्रभादेवी येथे एक निष्णात वैद्यकतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकर यांचा भर पावसात मॅनहोलमध्ये पडून मृत्यू ओढवला होता. त्यानंतर मॅनहोलच्या या भीषण बेपर्वाईचे प्रकरण न्यायालयातही गेले. २०१८ पासून मुंबई महापालिकेला न्यायालयाने कित्येकदा फटकारले.

पहिल्या पावसानंतर महापौर रितू तावडे यांच्या डोळ्यादेखत महापालिकेचाच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडल्याचे खेदजनक चित्र दिसले. मुंबई उच्च न्यायालयात दोनच दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीत ही छायाचित्रेही न्यायालयाच्या निदर्शनास आणली गेली होती. मुंबई आणि ठाणे दोन्ही महापालिकांना न्यायालयाने खडे बोल सुनावले होते.

जी तऱ्हा या मॅनहोल्सची तीच उन्मळून पडणाऱ्या वृक्षांचीही. मुंबई व एकूणच सर्व शहरांमध्ये काँक्रिटच्या वापराचा जो काही सोस महापालिकांना जडला आहे, त्यापायी छोट्या गल्लीबोळांतील वृक्षांचा श्वास गुदमरला आहे. याबाबतीत काळजी घेण्यासंबंधी मुंबई महापालिकेच्याच वृक्ष प्राधिकरणाने ९ वर्षांपूर्वी एक परिपत्रक काढले होते. मात्र, परिपत्रकांच्या चळतीत एक कागद म्हणून अशा उपायांची भर पडते आणि कंत्राटदारकेंद्री महापालिकांना आपलीही काही अंकुश ठेवण्याची भूमिका असते, याचाच विसर पडतो. साकीनाक्यातील घटनेनंतर चार अधिकाऱ्यांना मुंबई महापालिकेने निलंबित केले आहे. बहुतांश वेळा घटनेनंतर महापालिकेच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांवर किंवा कंत्राटदारांवर कारवाईचा बडगा उचलला जातो. परंतु तत्पूर्वी सामान्य नागरिक जेव्हा बेंबीच्या देठापासून आपल्या व्यथा महापालिकांपुढे किंवा वृत्तपत्रांमधून मांडत असतात, तेव्हा महापालिकेला दखलही घ्यावीशी वाटत नाही.

८० हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महापालिकेने नगरसेवक, गटनेते, समित्यांचे प्रमुख यांना रग्गड निधी दिला आहे. यापूर्वी प्रशासकांच्या काळात आमदारांनाही निधी देण्याची प्रथा सुरू झाली. या निधीवरून हळवे होणारे लोकप्रतिनिधी आपल्या भागातील कामांबाबत आग्रही कधी होणार? अलीकडे शहरातील कित्येक ठिकाणचे चांगले डांबरी रस्ते उखडून ते काँक्रिटचे करण्यात आले. पैसा झिरपतो अशा या कामांमध्ये लोकप्रतिनिधींपासून पालिका अधिकाऱ्यांपर्यंत सर्वजण जातीने रस घेतात. परंतु ज्या कामांत काही प्राप्ती नाही, त्यात कुणाला स्वारस्य नसते. संरक्षक जाळी बसविण्याचे काम सुरू असताना खबरदारी म्हणून बॅरिकेड्स वा झेंडे उभारणे, या भागांत गस्त घालणे या गोष्टी महापालिकेच्या विभाग स्तरावरून किंवा केंद्रीय पथकांकडून अपेक्षित आहेत. परंतु ज्या कामांतून काही हाताला लागत नाही, त्यात वेळ कशाला दवडा, अशी वृत्ती यंत्रणांमध्ये भिनलेली आहे.

बिल्डर, कंत्राटदार यांच्यापुढे लोटांगण घालणारे, नियम वाकविणारे, निविदांच्या अटी-शर्तींमध्ये मर्जीतल्यांना बसविणारे अनेक महाभाग महापालिकांमध्ये मिळतील. यावर्षी पाऊस महिनाभर विलंबाने येऊनही यंत्रणांची मात्र दाणादाणच उडाली आहे. कल्याण-शीळ येथपासून वसई- नालासोपारा इथपर्यंत ठिकठिकाणचे रस्ते जलमय होत आहेत. संरक्षक भिंती कोसळत आहेत. महामुंबईभर पावसाने टोकाचे रौद्र रूप धारण करण्यापूर्वीच मानवनिर्मित संकटांचे तांडव सुरू आहे. ‘प्रमादं मृत्युं मन्यते’ म्हणजेच निष्काळजीपणा हा मृत्यूसमानच मानला जातो, असे वचन आहे. आज त्याचेच प्रत्यंतर जळी-स्थळी येत आहे. पाऊस शांत झाला, तरी या बुडत्या जीवांचा टाहोच मुंबईत ऐकू येत आहे. त्याला राजकीय रंग न देता प्रतिबंधात्मक उपायांवर भर दिला, तरच काडीचा तरी आधार मिळेल.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा