Mumbai Bhuleshwarcha Raja Idol Incident : ‘आगमन आणि विसर्जनावेळी अशा घटना टाळण्यासाठी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीकडून बैठक बोलावण्यात येणार आहे. यामध्ये ट्रॉलीची उंची, मजबुती, उंची असे विषय हाताळण्यात येतील’, असं बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेस दहिबावकर यांनी म्हटलं आहे.

कार्यशाळांमधून मंडपांपर्यंत जाण्याचा प्रदीर्घ प्रवास
मुंबईच्या सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये पर्यटकांना उंच मूर्तींचे आकर्षण असले आणि या मूर्तींच्या उंचीभोवती आर्थिक समीकरणे फिरत असली, तरी मुंबईतील रस्ते, खड्डे, स्पीडब्रेकर, पूल आणि मूर्तिकारांच्या कार्यशाळांमधून मंडपांपर्यंत जाण्याचा प्रदीर्घ प्रवास या अडचणींचा विचार करता गणेशमूर्तींच्या उंचीची स्पर्धा थांबायला हवी, असे मत गणेशभक्तांकडून व्यक्त होत आहे.
भुलेश्वरमधील दुःखद वातावरणाला समोरे
शनिवारच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी एकीकडे भुलेश्वरमधील दुःखद वातावरणाला समोरे जाताना, साळगावकर समितीने सन २००४च्या सुमारास घेतलेल्या १८ फुटांच्या वर मूर्ती नको, या निर्णयाचीही आठवण करून दिली. त्यावेळची मूर्तींच्या उंचीवर निर्बंध हवे, हा निर्णय चार ते पाच वर्षे पाळला गेला. मात्र, मंडळांनी केलेले सर्वेक्षण, त्यानंतर मूर्तिकारांनी उंच मूर्ती घडवण्यासाठी व्यक्त केलेली इच्छा या पार्श्वभूमीवर सन २००९पासून उंच मूर्तींची स्पर्धा वाढत गेल्याचे सांगण्यात येत आहे. दक्षिण मुंबईतील अनेक मंडळांमध्ये २० ते २२ फुटांहून उंच मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते.
प्रभावळींची उंचीही वाढतेय
उपनगरांतील मंडळेही या स्पर्धेत आता पुढे आली असून, मुंबईमध्ये ३० फुटांच्या वर गणेशमूर्ती आणणारी १० ते १५ मंडळे कार्यरत आहेत. तर, २५ फुटांच्या वरची ६० ते ७० आणि २० ते २५ फुटांच्या उंचीची गणेशमूर्ती आणणाऱ्या मंडळांची संख्या १५०च्या आसपास असेल. सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तींसोबतच प्रभावळींची उंचीही वाढताना दिसत आहे. अधिक आकर्षक आणि भव्य सजावटीसाठी मंडळांमध्ये उंच प्रभावळी उभारण्याची स्पर्धा लागल्याचे चित्र आहे. यामुळे पुलाखालून जाताना प्रभावळी तुटणे, प्रभावळीमुळे अडचण निर्माण झाल्याच्याही घटना घडलेल्या आहेत.
मूर्तींच्या उंचीची स्पर्धा नियंत्रणात येणे आवश्यक
मुंबईतील उंच मूर्ती हे पर्यटकांसाठी आकर्षण असले तरी मूर्तींच्या उंचीची स्पर्धा नियंत्रणात येणे आवश्यक आहे, याकडे मंडळाचे पदाधिकारी लक्ष वेधत आहेत. २० ते २५ फुटांदरम्यान मूर्तीची उंची असेल तर मंडळांना रस्त्यांपासून झाडांच्या फांद्यांपर्यंतच्या समस्यांना तोंड देणे अधिक सोपे होते. त्यामुळे ही आदर्श उंची असावी, असेही सांगण्यात येत आहे. २५ फुटांच्या वर मूर्तीची उंची गेली की त्यातील धोका अधिक वाढतो. मुंबईमध्ये गेल्या वर्षी सहा फुटांवरील ४ हजार ३८५ मूर्तींचे विसर्जन झाल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे हा वाढता आकडा लक्षात घेता या विषयाचा विचार अधिक गांभीर्याने होण्याची गरज व्यक्त होत आहे.
सगळ्याविरोधात रोषाचे वातावरणही
भुलेश्वर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रस्त्यांच्या अवस्थेकडेही लक्ष वेधले जात आहे. आगमन, विसर्जनाच्या मार्गावरील खड्डे, उंच-सखल भाग दुरुस्त करणे, स्पीड ब्रेकर काढून टाकणे तसेच झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे याची गरज मंडळांतर्फे व्यक्त केली जात आहे. पूरस्थितीपासून रक्तदानापर्यंत मुंबईकरांच्या मदतीला धावून येणाऱ्या मंडळांसाठी प्रशासन या व्यवस्था निर्माण करू शकत नाही, तसेच यंदा न्यायालयातील प्रकरणामुळे पोलिस, वाहतूक विभाग आणि महापालिका अधिकाऱ्यांसोबत बैठकांना झालेला उशीर या सगळ्याविरोधात रोषाचे वातावरणही निर्माण झाले आहे.
मूर्तीच्या पायाशी असलेले वजनही वाढवले जाते
आगमन मिरवणुकांमध्ये मूर्तींच्या वाढत्या उंचीबरोबर, मूर्तीचा तोल सांभाळण्यासाठी मूर्तीच्या पायाशी असलेले वजनही वाढवले जाते. काही वेळा वजनाचा तोल न पेलवल्याने ट्रॉलीचे चाक निखळल्याची घटनाही घडली आहे. त्यामुळे अशा वेळी मूर्तीचा तोल खरोखरच नीट सांभाळला जातो आहे का, हा तोल कसा सांभाळायचा, मोठ्या मूर्तींसाठी ट्रॉली किती मोठी हवी, ट्रॉलीला मूर्तीचे वजन पेलत आहे का, यासाठी आता समितीतील विविध तज्ज्ञांशी, पदाधिकाऱ्यांशी मंडळांच्या कार्यकर्त्यांची चर्चा होत आहे. अनेक मंडळांनी ट्रॉलीवर आता लहान मुलांना बसवायचे नाही, असाही निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. यंदाच्या घटनेनंतर पुढच्या वर्षी उंचीवर मर्यादा येतील, याची कोणतीही खात्री देता येत नसली तरी येत्या काळात तांत्रिकदृष्ट्या अधिक काळजी घेण्याचा विचार होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
भुलेश्वर दुर्घटना वेल्डिंग तुटल्याने?
भुलेश्वरच्या राजाची मूर्ती पडण्यामागे वेगवेगळी कारणे पुढे येत असली तरी मूर्तीला आधार देण्यासाठी पाठीमागे करण्यात आलेली लोखंडी रचना आणि त्याला मूर्तीशी जोडण्यात आलेले वेल्डिंग तुटल्याने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून चौकशी सुरू केली आहे.
Khavdya Dongar : ‘आयफोनचा काहीही संबंध नाही, कुणालला असं करायचंच नव्हतं’; वादामागचं जुनं कारण समोर, आजोबांनी सांगितली धक्कादायक वस्तुस्थिती
शनिवारी रात्री भुलेश्वरच्या राजाची मूर्ती पडल्याचे कळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली. मिरवणुकीदरम्यान ट्रॉलीवर असलेल्या कार्यकर्त्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. त्यांनी दिलेल्या जबाबानुसार’ मूर्तीला मागील बाजूने आधार देण्यासाठी विशेष रचना करण्यात आली होती. या लोखंडी रचनेसोबत मूर्ती वेल्डिंगने जोडण्यात आली होती. मूर्ती पुढे पुढे नेत असताना वेल्डिंगमध्ये अडचणी येत असल्याने दोन ते तीनवेळा मिरवणूक थांबविण्यात आली होती. मात्र मंडपापासून ५० मीटरवर असतानाच हे वेल्डिंग तुटल्याची माहिती त्यांनी जबाबात दिल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. अग्निशमन दलाचाही प्राथमिक अंदाज तसाच असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

