Headlines

एन. रघुरामन यांचा कॉलम:बालपणातील छंद कधीच सोडू नका, तीच तुमची ओळख बनू शकते




आठवून पाहा, आपण लहानपणी कोणत्या गोष्टी जमवायचो? तिकिटे, नाणी, की-चेन, काडीपेटी, गोट्या, पोस्टकार्ड, शिंपले, खेळण्यातील गाड्या, बाटल्यांची झाकणे आणि कुटुंबासोबत सुट्टीत फिरायला गेल्यावर समुद्रकिनाऱ्यावर मिळालेले अनोखे खडे! वयाच्या 8-10 व्या वर्षी या गोष्टी अगदी मनापासून गोळा करायचो. असे करण्यासाठी आपल्याला कोणीही सांगत नसे. फक्त एखादी गोष्ट आवडली की ती आपल्याकडेही असावी असे आपल्याला वाटायचे. मग आयुष्य पुढे सरकले. शिक्षण, नोकरी, लग्न, मुले व जबाबदाऱ्या यांच्या गर्दीत ते लहान-लहान छंद एका कोपऱ्यात ढकलले गेले. आपण जमवलेल्या त्या वस्तू सूटकेस, माळ्यावर किंवा विसरलेल्या कपाटांत गायब झाल्या. काही गोष्टी दमट हवेमुळे खराब झाल्या. काही घर साफ करताना फेकून दिल्या गेल्या, तर अनेक गोष्टी हरवून गेल्या. आपण ते छंद सोडले नसते तर काय झाले असते? कदाचित त्यातून काहीतरी खूप मोठे निर्माण झाले असते. लहानपणीचा तिकिटे जमवण्याचा छंद सुटल्याची खंत मला आजही वाटते. त्या वयात मी ऐकत असलेल्या अनेक परदेशी रेडिओ स्टेशन्सकडून मला पत्रे यायची. मी त्यांना पत्र लिहायचो आणि ते मला उत्तर द्यायचे. पण माजी पंतप्रधान आय. के. गुजराल यांची काही पत्रे सोडली तर मी ते सर्व गमावले. गुजराल यांनी तेव्हा अविभाजित यूएसएसआरमध्ये परदेशी दूतावासात कार्यरत होते. पुण्यातील पिंपरी-चिंचवडचे 40 वर्षांचे महेश लोणकर यांचेच उदाहरण घ्या. लहानपणी टॉर्चबद्दल वाटणारे आकर्षण आज त्यांच्याकडे 1220 पेक्षा जास्त फ्लॅशलाइट्सच्या असामान्य संग्रहात रूपांतरित झाले. यातील काही टॉर्च तर तब्बल शंभर वर्षे जुन्या आहेत. लोणकर यांनी त्यांची पहिली टॉर्च वयाच्या 10 व्या वर्षी खरेदी केली होती. अनेक दशकांनंतर आज त्यांच्याकडे ऐतिहासिक व लढाऊ (मिलिटरी) फ्लॅशलाइट्स आहेत. यातील काही पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील आहेत. त्यांच्या संग्रहात बंदुकीच्या आकाराचे फ्लॅशलाइट, बाटलीच्या आकाराचे मॉडेल, आपत्कालीन रेडिओ फ्लॅशलाइट, हाताने चालणारे फ्लॅशलाइट, लहान टॉर्च व सोन्याचा लखलखाट असलेले नमुनेसुद्धा आहेत. त्यांच्या संग्रहातील सर्वात मौल्यवान वस्तू म्हणजे 1905 मध्ये बनलेली एक ‘एव्हर-रेडी’ फ्लॅशलाइट आहे. त्यांनी लिलावात 65 हजारांना खरेदी केली होती. यात एक दुर्मिळ ‘ग्लव्ह कॅच स्विच’ आहे—हा एक सुरुवातीच्या काळातील तंत्रज्ञानाचा भाग होता. त्याद्वारे बॅटरीवर चालणारा दिवा चालू ठेवता येत असे. लोणकर यांनी या वस्तू फक्त गोळाच केल्या नाहीत तर त्या दुरुस्त करायला व स्वच्छ करायलाही शिकले. कारण अनेक जुन्या वस्तू त्यांच्याकडे तुटलेल्या अवस्थेत पोहोचल्या होत्या. त्यामुळे त्यांचा हा छंद फक्त संग्रह न राहता ज्ञानात बदलला. लहानपणीच्या आवडीला प्रोत्साहन मिळते तेव्हा असेच घडते. भारतात अशी अनेक उदाहरणे आहेत. उदाहरणार्थ- अहमदाबादच्या ‘वेचार’ संग्रहालयात 4 हजारांहून अधिक पारंपरिक भांडी आहेत. यातील काही भांडी तर शेकडो वर्षे जुनी आहेत. हॉटेल व्यावसायिक सुरेंद्र पटेल यांनी जुनी भांडी भट्ट्यांमध्ये वितळवण्यासाठी पाठवली जात असल्याचे पाहिले. तेव्हा त्यांनी 1978 मध्ये ती खरेदी करून जतन करण्यास सुरुवात केली. शेवटी या संग्रहाचे 1981 मध्ये एका संग्रहालयात रूपांतर झाले. त्याचप्रमाणे पुण्याच्या ‘राजा दिनकर केळकर’ संग्रहालयातही पारंपरिक स्वयंपाकघरातील भांड्यांची अद्भुत श्रेणी जतन केलेली आहे. जगात नाणी, तिकिटे, घड्याळे, रेडिओ, कॅमेरे, काडेपेटी, पोस्टकार्ड, खेळणी, फाउंटन पेन व अगदी पारंपरिक हंड्या गोळा करणारे शौकीनही आहेत. सुरुवातीला एखाद्या साध्या गोष्टीची आवड वाटणारा छंद पुढे जाऊन इतिहास, कारागिरी आणि संस्कृतीचा मोठा दस्तऐवज बनू शकतो. म्हणूनच पालकांनी मुलांचा छंद वेळेचा अपव्यय मानू नये. प्रत्येक छंदाचे रूपांतर व्यवसायात झालेच पाहिजे असे नाही. पण छंद पुस्तके शिकवू शकत नाहीत अशा गोष्टी शिकवतो. सूक्ष्म निरीक्षण, संयम, उत्सुकता, संशोधन व अनेक वर्षे एखाद्या गोष्टीबद्दलचे आकर्षण टिकवून ठेवण्याची क्षमता या गोष्टी शिकता येतात. पैसे लवकर गुंतवले तर चक्रवाढ व्याजाने वाढतात. उत्सुकतेचेही तसेच असते. एखादे मूल वयाच्या 10 व्या वर्षी एखाद्या गोष्टीचा संग्रह सुरू करते व 20 वर्षे ते चालू ठेवते, तर ते मूल फक्त वस्तू जमा करत नाही. ते ज्ञान, कथा, संपर्क, नैपुण्य व शेवटी एक सन्मानही जमा करत असते. पुढच्या वेळी जेव्हा एखादे मूल वेगळे नाणे, जुना चमचा, तुटलेले घड्याळ किंवा बाटलीचे अनोखे झाकण घेऊन घरी येईल तेव्हा ‘या सगळ्याचे तू काय करणार आहेस?’ असा प्रश्न लगेच विचारू नका. त्याऐवजी विचारा, ‘तुला यात इतके काय आवडले?’ कारण आजचा हा लहानसा संग्रह उद्याचे संग्रहालय बनू शकतो. फंडा असा की, कधी कधी वयाच्या 12 व्या वर्षी आपण छंद सोडलेला असतो. अनेकदा तीच गोष्ट वयाच्या 40 व्या वर्षी आपली खरी ओळख बनू शकते.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत