Mohammed Shami special Incredible Journey : संकटांवर मात करत जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर २२ वर्षाचा तरूण गोलंदाज म्हणून भारतीय क्रिकेट संघात आला. ज्या दिग्गजांना टीव्हीवर पाहत आलेला, आज त्यांच्यातच जाऊन बसला होता. त्यावेळी भारतीय संघात सचिन, सेहवाग, धोनी, युवराजसारखे स्टार खेळाडू होते. या सगळ्यांना पाहून तो गांगरला आणि शांतपणे एका खुर्चीवर जाऊन बसला. हे युवराजने पाहिलं, मग काय पाजीने शाळा घ्यायची ठरवलं. त्या युवा गोलंदाजाला त्याने खुर्चीवर उभे राहण्यास सांगितले आणि भाषण करायला लावले. हाच गोलंदाज पुढे जाऊन भारताचा चॅम्पियन गोलंदाज बनला. कोण होता तो खेळाडू आण पुढे त्याने कशा प्रकारे भारतासाठी योगदान दिले जाणून घ्या.

कोचच्या एका सल्ल्याने शमीचं आयुष्य बदललं
२२ वर्षांचा तरूण पोरगा जो होता तो दुसरा तिसरा कोणी मोहम्मद शमी. उत्तर प्रदेशमधील अमरोहाच्या सहसपूर या गावचा आहे. शमीचे वडील वेगवान गोलंदाज असल्याने त्याला गोलंदाजीचे बाळकडू त्याला घरातच मिळाले. वयाच्या १५ व्या वर्षी शमीला त्याच्या वडिलांनी मुरादाबाद येथील सोनकपुर स्टेडियमवर प्रशिक्षक बदरूद्दीन सिद्दीकी यांच्याकडे आणले. तिथे त्यांनी शमीवर मेहनत घेतली सराव करून घेतला पण उत्तर प्रदेशच्या अंडर-१९ संघात त्याची निवड झाली नाही. शमी नाराज झालेला, तेव्हा कोच बदरूद्दीन यांनी त्याला बंगालामध्ये जाण्याचा सल्ला दिला. हाच शमीसाठी त्याच्या करियरमधील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरला.
मोहम्मद शमीला स्वत:च्या घरी राहण्यासाठी नेले
मोहम्मद शमी कोलकातामध्ये आल्यावर तिथे राहायला त्याचे स्वत:चे घर नव्हते, पण शमीची गोलंदाजीतील गुणवत्ता आणि कौशल्याने याचीही सोय केली. कोलकातामध्ये शमी हा डलहौजी अॅथलेटिक क्लबकडून खेळत होता. तिथले ‘क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल’च्या संबंधित असलेल्या देवब्रत दास यांनी शमीला टाऊन क्लबमध्ये आणत त्याची स्वत:च्या घरी राहण्याची व्यवस्था केली होती. त्याच्या सरावाकडे ते जातीने लक्ष द्यायचे. रिव्हर्स स्विंग शमीची ताकद झाली होती, जुने चेंडूनी तो रिव्हर्स स्विंगसाठी प्रयत्न करत होता.
बंगाल अंडर २२ संघात निवड
देवब्रत दास यांनी बंगालचे निवडकर्ते संबरण बॅनर्जी यांना मोहम्मद शमीची गोलंदाजी पाहण्याठी सांगितले. त्यांनी शमीची गोलंदाजी पाहिल्यावर खूश झाले आणि त्याची बंगाल अंडर २२ संघात निवड केली. त्यानंतर दादा म्हणजेच भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याला ईडन गार्डनर मैदानावर शमीने गोलंदाजी केली. दादा एकदम प्रभावित झाला आणि त्याला संधी मिळावी यासाठी त्याने बंगालच्या व्यवस्थापनाशी बोलून रणजीमध्ये त्याची निवड केली.
२०१३ मध्ये शमीची थेट भारतीय संघात निवड
२०१० मध्ये शमी बंगालकडून प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये पदार्पण केले होते. पण दोन वर्षांनी म्हणजेच २०१२ मध्ये शमीने सर्वांना आपल्या प्रदर्शनाच्या दमावर दखल घ्यायला लावली. पठ्ठ्याने ५ सामन्यात २८ विकेट घेतल्या होत्या. मध्य प्रदेशविरूद्ध ७ विकेट घेतल्या यामध्ये त्याने हॅटट्रिकही घेतली होती. हैदराबादविरूद्ध दोन्ही डावात मिळून दहा विकेट नावावर केल्या. यानंतर भारत अ संघात निवड झाली आणि जिथे फलंदाजांसाठी पूरक अशा खेळपट्टी होत्या तिथेही शमीने हवा केली. या झकास कामगिरीनंतर २०१३ मध्ये शमीची थेट भारतीय संघात निवड झाली.
मोहम्मद शमी पदार्पण
मोहम्मद शमी याने वनडे मध्ये पाकिस्तानविरूद्ध ६ जानेवारी २०१३ मध्ये पदार्पण केले होते. त्याच वर्षी कसोटीमध्ये वेस्ट इंडिजविरूद्ध पदार्पण केले. दोन वर्षांनी वर्ल्ड कप होणार होता. २०११ च्या वर्ल्ड कपनंतर धोनी संघाची मोट बांधत होता. दोन वर्षांनी वनडे वर्ल्ड कप होता. या वर्ल्डकपसाठी शमीची निवड झाली. मोहम्मद शमी सलग तीन वर्ल्ड कप भारतासाठी खेळला आहे.
युवराज सिंगने खुर्चीवर उभे राहण्यास सांगितले
मोहम्मद शमीने एका मुलाखतीमध्ये त्याच्यासोबत ड्रेसिंग रूममध्ये युवराजने काय केलं ते सांगितलं. सामन्याच्या एक दिवस अगोदर एक मीटिंग होती, शमी ड्रेसिंग रूमध्ये पोहोचला आणि तिथे सगळे दिग्गज मंडळी बसलेले पाहायला मिळाले होते. सर्वांना पाहून काहीसा गोंधळला आणि खुर्चीवरून जाऊन बसला. युवराज सिंगने हे पाहिल्यावर त्याने शमीला खुर्चीवर उभे राहण्यास सांगितले. शमी काही न बोलता निमुटपणे उभा राहिला त्यानंतर त्याला भाषण करायला सांगितले. काही सुचले नाही, त्याने नाव आणि कुठून आला ते सांगितलं. शमी हा किस्सा सांगत असताना हसत होता.
वर्ल्डकप २०१५ मध्ये शमाचा धुमाकूळ
वर्ल्डकप २०१५ मध्ये शमीने सर्वाधिक १७ विकेट नावावर केल्या होत्या. वर्ल्ड कप २०१९ला शमीला प्रत्येक सामन्यात संधी मिळाली नाही पण ज्यावेळी निवड होईल तेव्हा त्याने जबरदस्त अशी कामगिरी केली. ४ सामन्यात शमीने १४ विकेट नावावर केल्या होत्या. अफगाणिस्तानविरुद्ध तर हॅटट्रिक नावावर केली होती. त्यानंतर वनडे वर्ल्ड कप २०२३ मध्ये ७ सामन्यात २४ विकेट्स घेतल्या होत्या. भारताचा फायनल सामन्यात पराभव झाला होता.
मोहम्मद शमीचे कमबॅकसाठी प्रयत्न
दरम्यान, वर्ल्डकप २०२३नंतर मोहम्मद शमी याने २०२५ मध्ये चॅम्पियन ट्रॉफीवेळी कमबॅक केले होते. १४ महिन्यानंतर परतलेल्या शमीने दमदार कामगिरी केली होती. शमीने एकूण ९ विकेट घेतल्या होत्या यामधील ५ विकेट त्याने बांगलादेशविरूद्ध घेतल्या होत्या. भारताने चॅम्पियन ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करत ट्रॉफीवर नाव कोरले होते. मोहम्मद शमी आता वर्ल्ड कप २०२७ साठी संघात जागा बनवण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र तो चॅम्पियन ट्रॉफीनंतर भारतीय संघाकडून एकही सामना खेळलेला नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो मेहनत घेत असून निवडकर्ते त्याची निवड करतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

