महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
IND vs PAK Hocky match : हॉकी वर्ल्ड कपमध्ये भारती संघाने पाकिस्तानचा पराभव केला. पण भारतीय हॉकी संघाची पडती बाजू समोर आली आहे. नेमकी कोणती? जाणून घ्या.

भारतीय संघाने वेगवान सुरुवात करताना ३-० अशी घेतलेली आघाडी नक्कीच सुखावणारी होती. मात्र, जम बसल्यावर पाकने केलेला प्रतिकार आणि त्या वेळी झालेला खेळ भारतीय संघाच्या अव्वल साखळीतील कामगिरीबाबत प्रश्न निर्माण करणारा होता. भारतीय हॉकी संघ पाकविरुद्ध दहा वर्षांत पराभूत झालेला नाही. त्यामुळे निकाल अनपेक्षित नव्हता. तेव्हा विजयापेक्षाही भारताचा खेळ कसा होतो याकडे हॉकी विश्लेषकांचे जास्त लक्ष होते. ‘बचावातील चुका भारतीय संघास भोवत आहेत. २५ मीटर क्षेत्रात चेंडूचा ताबा मिळवल्यानंतर तो राखणेही महत्त्वाचे आहे. त्या वेळी मूर्खासारख्या चुका होत आहेत. विश्रांतीनंतर संथ सुरुवातीच्या चुका इंग्लंड आणि वेल्सविरुद्ध भोवल्या. हेच पाकविरुद्धही घडले. यातून आता शिकण्याची नितांत गरज आहे,’ असे हरमनप्रीतने सुनावले.
जोरदार सुरुवात; पण…
- भारतीय आक्रमकांनी सामन्याच्या सुरुवातीस हवेतून चेंडू पास करून खेळाचा वेग वाढवला.
- या व्यूहरचनेमुळे पाकच्या बचावफळीवर दडपण. पहिल्या सत्रात चार पेनल्टी कॉर्नर मिळवून २-० अशी आघाडी.
- हरमनप्रीत आणि अभिषेक यांनीच या वेळी गोलसाठी प्रयत्न केले. ही चिंतेची बाब.
- मनप्रीत सिंगची ही चौथी स्पर्धा. त्याला २९१ सामन्यांचा अनुभव. मात्र, त्याचा फारसा प्रभाव नाही.
- शिलानंद लाक्रा, दिलप्रीत सिंग, सुखजित सिंग यांचा खेळ वेगवान; पण प्रतिस्पध्यांच्या गोलक्षेत्रात भेदकतेचा अभाव.
- प्रतिस्पध्यर्थ्यांना रोखल्यानंतर चेंडू ताब्यात राखण्यात भारतीयांसमोर प्रश्न. हेच पाकिस्तानविरुद्ध दिसले.
- इंग्लंडविरुद्ध बचावातील चुकांचा फटका. याच चुका पाकविरुद्धही.
- गत स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध ३-१ आघाडीनंतर पराभव. या वेळी इंग्लंडविरुद्ध अखेरच्या दोन सत्रांतील खराब खेळाचा फटका.
- पाकच्या तिसऱ्या गोलने हेच दाखवले. हान्नन शाहीदचा सहज गोलक्षेत्रात प्रवेश आणि त्यानंतर गोलही.
