Headlines

Milk Adulteration Row: शुभ्र काही जीवघेणे…. – fda seizes over 1700 litres of milk across maharashtra



-शर्मिला कलगुटकर

दुधाला पूर्णान्न म्हणतात. बाळाला वाढीच्या टप्प्यात आईच्या दुधानंतर गायीच्या दूधाची ओळख होते. पुढे ती आयुष्यभर सोबतही राहते. मात्र या पूर्णान्नात भेसळ होत असल्याची चर्चा गेली कित्येक वर्षे होती. त्याबाबत कारवाई देखील होत होती. मात्र अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हाती घेतलेल्या धडक कारवायांमुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातील दूधभेसळखोरांचा प्रताप उघड होत आहे. ही विषवल्ली किती दूरवर न खोलवर पसरली आहे, ते यावरून कळावे.

एफडीएच्या धडाक्यामुळे भेसळखोरांच्या तोंडाला फेस आला आहे. तर दुसरीकडे, अशा भेसळयुक्त दुधातून आजवर आपण कायकाय रिचवले असेल, या धास्तीने सर्वसामान्यांच्या पोटात गोळाही आला. दुधात होणारी भेसळ ही फक्त ‘पाणीज्यादा’ इतकीच मर्यादित नाही. मागील काही वर्षांत या भेसळीमध्ये रासायनिक पदार्थांचाही वापर प्रचंड वेगाने वाढला आहे. आर्थिक फायदा ओरबाडण्यासाठी लहान मुलांपासून गर्भवती मातांपर्यत, रुग्णांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांच्या जीवाशी खेळ करतोय याचेही भान या भेसळखोरांना राहिलेले नाही.

दुधात पाणी, खायचा सोडा, युरिया घातला म्हणजे भेसळ होते, अशी आजवरची सर्वसाधारण समजूत होती. एफडीएच्या कारवायांनी ती खोटी ठरवली! शंभर लीटर दुधाचे पाचशे लीटर करून ते विकण्याचे कसब या भेसळखोरांनी एका रात्रीत कमावलेले नाही. दूधउत्पादकांपासून ते वितरणापर्यंतच्या साखळीतल्या अनेक कड्या त्यात जोडलेल्या आहेत. भेसळ करणाऱ्यांना सर्वसामान्यांच्या आरोग्याशी काहीएक देणेघेणे नसते.

अशा भेसळखोरांना धडा शिकवण्यासाठी मुंबई, पुणे, नाशिक, लातूर, संभाजीनगर, जळगाव अशा विविध ठिकाणी एफडीएने कारवाई करत हजारो लीटर कृत्रिम भेसळयुक्त दूध नष्ट केले. पाणी, तेल, रसायनांचा वापर करून तयार होणारे विषारी दूधही नष्ट करण्यात आले. राज्यभर कृत्रिम दुधाचा पुरवठा करणारी रॅकेटस् एफडीएने पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेसोत धडक कारवाई करत पकडली.

पुणे, अहिल्यानगर, सोलापूर, जालना आणि ठाणे या पाच जिल्ह्यात एकाचवेळी टाकलेल्या छाप्यांमध्ये तब्बल १ कोटी ४७ लाख ९३ हजार ९४५ रुपयांचे भेसळयुक्त घटक जप्त करण्यात आले; तर २० हजार लीटर संशयित दुधाची विल्हेवाट लावण्यात आली. या दुधामध्ये इमल्सिफायर, डेअरी परमीएट पावडर, पामतेल याचा वापर करण्यात आला होता. मंचरमधील सुशांत हिंगे हा याचा प्रमुख सूत्रधार होता. शेतकरी, दूध संकलन, पॅकिंग केंद्रांनाही हे भेसळीचे घटक पुरवले जात असल्याची धक्कादायक माहिती या तपासामध्ये पुढे आली. दूधभेसळीचा हा बदलता ‘पॅटर्न’ पाहून अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. भेसळ करणाऱ्यांकडून मूळ दुधात पाणी आणि इतर घटक मिसळून दुधाचे प्रमाण कृत्रिमरीत्या वाढवले जात होते. दोन हजार लीटर शुद्ध दुधात भेसळ करुन ते अडीच ते तीन हजार लिटरपर्यंत वाढवल्याचे असंख्य प्रकार या कारवायांदरम्यान उघड झाले.

दूध भेसळीसोबत, कृत्रिम दुधाचे आव्हानही मोठे आहे. अशा दुधाचा पर्दाफाश करणे हे मोठे आव्हान आहे. दुधात पाणी, खाद्यतेल आणि दूध पावडर हे घटक नैसर्गिकरीत्या एकरूप होत नाहीत. त्यामुळे हे मिश्रण एकजीव करून दुधासारखे दिसावे यासाठी त्यात इमल्सिफायर या रासायनिक पदार्थाचा वापर केला जातो. इमल्सिफायरमुळे पाणी आणि तेल यांचे मिश्रण स्थिर राहते. त्यातून दूधसदृश्य द्रव्याचा भास निर्माण होतो. त्याला दुधासारखाच पांढरा रंग, एकसंध पोत अन् किंचित फेसाळ स्वरूप प्राप्त होते. साहजिकच ग्राहकांना ते खरे दूधच वाटते.

दुधातील भेसळ लक्षात का येत नाही, असा प्रश्नही साहजिकपणे मनात येतो. त्याचे कारण म्हणजे, दुधातील घटकद्रव्यांचा अभ्यास करून भेसळीचे हे तंत्र या दूधमाफियांनी व्यवस्थित समजून घेतलेले असते. दुधाच्या मूळ नैसर्गिक गुणधर्मांमध्ये बदल केला की त्याचा समतोल साधण्यासाठी भेसळखोर त्यात बाहेरून इतर पदार्थ मिसळतात. साधारणतः दुधातील फॅट व ‘एसएनएफ’ (सॉलिड नॉट फॅट : दुधातील फॅट आणि पाणी वगळून उरलेले सर्व पोषक व घन घटक.) यांचे प्रमाण अनुक्रमे चार आणि साडेआठ टक्के इतके असते. शंभर लीटर दुधात वीस लीटर पाणी टाकले तर हे प्रमाण ३.३ व ७ टक्के होते. पाणी घातल्यामुळे त्याची तीव्रता कमी होते. डेअरीला दूध देताना दुधातले फॅट किमान साडेतीन तर एसएनएफ हे साडेआठ टक्के असायला हवेत, अशी अट असते.

पाणी घातल्यामुळे या घटकांचे प्रमाण कमी झाल्यास ते दूध नाकारण्याची शक्यताही वाढते. त्यामुळे दुधाचा मूळ गुणधर्म टिकवण्यासाठी त्यात अत्यंत चलाखीने ही भेसळ केली जाते. पाणी घालून दूध वाढवल्यास त्याचा कमी झालेला घट्टपणा टिकावा यासाठी त्यात स्टार्च घातले जाते. त्यामुळे दुधाला कृत्रिम घट्टपणा येतो. साबण पावडर घातल्याने दूध दाट दिसते. त्याला फेस येतो. मात्र यामुळे दूध नासण्याची प्रक्रिया जलदगतीने सुरू होते. हा कालावधी थोडा वाढवण्यासाठी त्यात खाण्याचा सोडाही टाकला जातो. सोड्यामुळे दूध शुभ्र, दाट दिसते. नासण्याची प्रक्रिया लांबणीवर टाकण्यासाठी त्यात किलोकिलोंनी कॉस्टिक सोडा मिसळण्याचे प्रकारही उघडकीस आले आहे. फॉर्मेलिन या रसायनाचाही त्यासाठी वापर करण्यात येतो.

दूधसंकलन केल्यानंतर ते शीतकेंद्रापर्यंत एका ठराविक वेळेत येणे आवश्यक असते. शक्य तितक्या लवकर दूध शितकेंद्रावर येऊन ते चार अंश सेल्सिअस तापमानाच्या शीतसाखळीमध्ये ठेवणे गरजेचे असते. तसे न झाल्यास त्यात जंतुसंसर्ग वाढीस लागल्याची शक्यता असते. तो नियमही अनेक शेतकरी, दुग्धउत्पादक धाब्यावर बसवतात. केंद्रावर जमा होणारे आणि वितरीत होणारे दूध यांतील तफावत किती आहे, हे पाहून यातूनही दूधचोरीच्या छुप्या वाटा पकडण्यात आल्या.

राज्यात लाखो लीटर दूध सुट्या स्वरूपामध्ये सर्वसामान्यांपर्यंत येते. त्याच्या विक्रीवर कोणतेच निर्बंध नव्हते. फॅट, टोन्ड दुधाची भेसळ करून हे सुटे दूधही अनेक ठिकाणी खुलेआम विकले जातं. सुट्या दुधाच्या गुणवत्तेशी तडजोड करणाऱ्यांवरही एफडीएने कारवाईचा बडगा उगारला. यापुढे पाश्चराइज्ड, प्रमाणित किंवा कोणत्याही प्रकारचे उष्णताप्रक्रिया केलेले दूध केवळ सीलबंद पिशव्यांतूनच विकता येणार आहे. वितरकांकडून दुधाचे कॅन, ड्रम किंवा भांड्यात विक्री झाल्यास त्याची जबाबदारी थेट उत्पादक किंवा प्रक्रिया उद्योगावर असेल.

कच्च्या दुधाच्या सुट्या विक्रीवर बंदी घालण्यात आलेली नाही. मात्र ती केवळ वैध परवाना किंवा नोंदणी असलेल्या विक्रेत्यांमार्फतच करता येईल. विक्री करताना ‘कच्चे दूध’ असा स्पष्ट उल्लेख त्यावर असावा. दूध संकलनापासून ग्राहकांपर्यंत संपूर्ण पुरवठा साखळीमध्ये चार अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी तापमान राखणे बंधनकारक केले आहे. दूध काढल्यानंतर शक्य तितक्या लवकर शीतकरण करणे, तापमानाच्या नोंदी ठेवणे, प्रत्येक बॅचमधील दुधामधील फॅट, एसएनएफ, क्लॉट-ऑन-बॉइलिंग आणि भेसळ तपासणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

दुधाच्या पिशवीवरील लेबलवर एसएनएफ मानके, उत्पादन तसेच वापराची अंतिम तारीख, उत्पादकाची माहिती, उष्णताप्रक्रियेचा प्रकार, बॅच क्रमांक द्यायचा आहे. ए१, ए२, नैसर्गिक, ऑर्गेनिक यासारखे कोणतेही दावे दुधाबाबत करता येणार नाहीत. या सूचनांचे पालन न झाल्यास दंडात्मक कारवाईपासून कडक कायदेशीर शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे. या निकषांची काटेकोर अंमलबजावणी झाल्यास घराघरांमध्ये दर्जेदार दूध आणि दुग्धजन्य पदार्थ येतील याबद्दल शंका राहणार नाही.

अशा भेसळयुक्त दुधाच्या सेवनामुळे सर्वसामान्यांच्या, मुलांच्या आरोग्यावर होणाऱ्या घातक परिणामांचा विचार करून एफडीएने राज्यातील दुधव्यवसायाशी संबधित सर्व घटकांशी चर्चा केली. दूधउत्पादकांकडून दूध शीतसाखळीपर्यंत येईपर्यंतचा कालावधी कमाल दोन तासांपर्यंत आणण्याच्या सूचना देण्यात आल्या. दूधसंकलन वाहनांना उशीरा का होतो याचीही चाचपणी करण्यात आली. शेतकरी दूध गोळा करून ते पुढे पाठवण्यासाठी वाट पाहत राहतात, हे त्यामागील कारण समोर आले.

दुग्धव्यवसायामध्ये दुग्धउत्पादक ते सर्वसामान्य ग्राहक ही नियोजनबद्ध साखळी आहे. त्यात सहकारी दूध संघ, उत्पादक, वितरक, किरकोळ विक्रेते, वाहतूकदार अशा अनेक घटकांचा समावेश होतो. या व्यवसायामध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. दुग्धउत्पादक शेतकऱ्याला किरकोळ दाम देऊन नफ्याचे लोणी स्वतःकडे ओढण्याची स्पर्धा अधिकाधिक तीव्र होत चालली आहे, हेही लक्षात येते.

दूधभेसळीतून हळूहळू भिनत जाणारे विष हे दही, पनीर, ताक , खवा या दुग्धजन्य पदार्थांमध्येही उतरत होते. जनावरांना दूधवाढीची इंजेक्शने देण्याचे प्रकारही वाढले होते. त्याचीही झाडाझडती एफडीए घेत आहे. हे सगळे पाहता मुळात ही कीड कुणाच्या जिवावर पोसली गेली, असा प्रश्न साहजिकच पडतो. ही कीड ठेचण्याचे काम एफडीएने धडक कारवायांच्या माध्यमातून हाती घेतले आहे. त्याचे स्वागत करताना हे भेसळखोर इतके मस्तवाल कसे झाले याचाही शोध घ्यायला हवा. अन्न, औषधे, सार्वजनिक आरोग्य हा सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा अन् जीवाशी निगडित असलेला विषय आहे. भेसळखोरांची झाडाझडती घेताना जुनी खोलवर रुजलेली पाळेमुळेही उपटून काढायला हवीत.

दूध, की विष?
युरिया, शाम्पू, सिंथेटिक मेद, ग्लुकोज, फॉर्मालिन, हायड्रोजन पेरॉक्साइड, रासायनिक पावडर तसेच इतर विषारी द्रव्य दुधामध्ये किंवा पाण्यामध्येही मिसळून कृत्रिम दूध तयार केले जाते. फॉर्मेलिन हे विषारी रसायन शरीरातल्या अनेक अवयवांवर गंभीर परिणाम करते. युरियामुळे मूत्रपिंड निकामी होण्यासह इतरही दुर्धर आजार होण्याचा धोका असतो. संप्रेरकांचा समतोल बिघडणे, त्वचारोग, कर्करोग, श्वसनविकार, दमा, अवयव निकामी होणे, गर्भाची वाढ खुंटणे अशा अनेक व्याधी भेसळयुक्त दुधामुळे होऊ शकतात.
——————
(अक्षरलेखन- संदीप आव्हाटे)



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत